"नाव मोठे, लक्षण खोटे"; इंडिया आघाडीच्या बैठकीवर राजनाथसिंहांचा मराठीत टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2023 11:06 PM2023-08-31T23:06:51+5:302023-08-31T23:07:22+5:30
संरक्षणमंत्री राजनाथसिंह हे प्रवरानगर येथील विठ्ठलराव विखेपाटील यांनी सुरु केलेल्या साखर कारखान्यावरील कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होते
मुंबई/अहमदनगर - देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज श्री साईबाबा समाधी मंदिरात साई समाधीचे दर्शन घेतले. त्यांच्या समवेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही दर्शन घेतले. यावेळी संरक्षणमंत्र्यांनी द्वारकामाई व गुरूस्थानचे दर्शनही घेतले. त्यानंतर, प्रवरानगर येथे आयोजित पुरस्कार सोहळ्याला उपस्थिती दर्शवत राजनाथसिंह यांनी उपस्थितांना संबोधित केले. यावेळी, मुंबईत होत असलेल्या इंडिया आघाडीच्या बैठकीवरुन विरोधकांना टोला लगावला.
संरक्षणमंत्री राजनाथसिंह हे प्रवरानगर येथील विठ्ठलराव विखेपाटील यांनी सुरु केलेल्या साखर कारखान्यावरील कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होते, यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हेही उपस्थित होते. आपल्या भाषणात राजनाथ सिंह यांनी विरोधी पक्षांच्या आघाडीवर टीका करताना केवळ नाव इंडिया ठेवलं म्हणून कोणी मोठं होतं नाही. तर, कर्तृत्व मोठं असायला हवं, असे म्हणत इंडिया आघाडीवर बोचरी टीका केली. नाव मोठे, लक्षण खोटे असं मराठीत म्हणत सिंह यांनी इंडिया आघाडीचा उल्लेख आय.एन.डी.आय.ए आघाडी असा केला. तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशभरात भारताची मान उंचावल्याचही ते म्हणाले.
रशिया आणि युक्रेन यांच्यात गेल्या वर्षभरापासून युद्ध सुरू आहे. हे युद्ध सुरू असताना आपल्या भारतातील हजारो विद्यार्थी तिथे अडकून पडले होते. त्यांचे पालक मोदींकडे आले आणि त्यांनी मुलांना भारतात परत आणण्याची विनंती केली. त्यानंतर, मोदींनी दोन्ही राष्ट्राच्या प्रमुखांना फोन करुन ४ तास युद्ध थांबवलं होतं. त्यानंतर, भारताचे सर्व विद्यार्थी मायदेशी परतले, असा किस्साही राजनाथसिंह यांनी सांगितला.
नाव मोठे, लक्षण खोटे.. pic.twitter.com/rzBeZfDYwL
— Rajnath Singh (@rajnathsingh) August 31, 2023
दरम्यान, येथील कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही इंडिया आघाडीवर टीका केली. तसेच, इंडिया आघाडीवर टीका करताना त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना टोलाही लगावला.
आगीशी खेळू नका - CM शिंदे
हे सरकार शेतकऱ्यांचे, सर्वसामान्यांचे आहे. त्यामुळे अडचणीच्या काळात सरकार शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. शेतकऱ्यांच्या पाठिशी सरकार खंबीरपणे उभे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात संरक्षण मंत्र्यांनी जी आत्मनिर्भरतेकडे पाऊले उचलली त्यामुळे देशाची ताकद वाढली आहे. आज विरोधी पक्ष सगळे एकत्र आलेत. मोदींसोबत कसं लढायचे याचा विचार करण्यासाठी ते एकत्र आलेत. परंतु आगीशी खेळू नका, तुमचे हात जळतील असा इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी इंडिया आघाडीच्या नेत्यांना दिला.