Studying space and time is a need of the hour | स्पेस आणि टाईम याचा अभ्यास करणे ही काळाची गरज

स्पेस आणि टाईम याचा अभ्यास करणे ही काळाची गरज

अध्यात्म /

विष्णू महाराज पारनेरकर / 

अधिभौतिकाचा अभ्यास म्हणजे त्यात विश्वाचा विचार आला आहे. वैज्ञानिकांनी  जगात खूप प्रगती केलेली आहे. ते जीवनभर धडपडत असतात. जीवनाचा हा सर्व व्यवहार जगत् कल्याणासाठी वापरण्यात येतो. देव विद्येसाठी विज्ञानाची गरज आहे. काही विषय अथवा गोष्टी सुलभ झाल्यानंतर मानवी जीवन सुखी, समृद्धी होईल. भगवंताचा जीवनासंबंधी भाव कसा आहे हे अधिभौतिकातून समजावून घेणे आवश्यक आहे.

अध्यात्मिक विषय जर पिता असेल तर अधिदैविक विषय माता आहे. वैज्ञानिकांपेक्षाही आपण वेगाने विचार करीत असतो. पदार्थातून जीवन विकसित झाले आहे, अशी वैज्ञानिकांची भूमिका आहे. विश्व कसे निर्माण झाले याचे शास्त्रज्ञाचे संशोधन आणि वेदातून विश्वाची झालेली निर्मिती यात फरक आहे. विकास हा सेकंदा, सेकंदाने होत असतो. जाणिवांचा विचार वैज्ञानिकांना करता येत नाही. मॅटर अ‍ॅण्ड माईंड याचा विचार आता वेगळा व्हायला पाहिजे. जीवनाची व्याख्या शास्त्राने कशी करायची? हा अभ्यासाचा विषय आहे. भगवंतांनीं तो त्यांच्या पद्धतीने मांडला आणि वैज्ञानिक हे त्यांच्या पद्धतीने मांडतात. सेन्स आॅफ स्पेस आणि सेन्स आॅफ टाईम या दोन्हीही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. विज्ञानाने सूक्ष्म पद्धतीने त्यांच्या पद्धतीने मांडणी केली आहे. ज्ञानेश्वरांनी त्यांच्या पद्धतीने ज्ञानेश्वरीत मांडणी केली आहे.

मोरोपंत कवी म्हणतात, ‘प्रयत्ने वाळूचे कण रगडता तेलही गळे’... ज्ञानेश्वरीचा जेव्हा अभ्यास केला जातो. तेव्हा तो एकांगी न करता ज्ञानेश्वरी विविध अंगाने समजावून घेतली पाहिजे. ईश्वर सत्ता काय आहे हे आपल्याला पहावे लागेल. कारण, त्यातील एक अंश आपण सुद्धा आहोत. तो ईश्वर शाश्वत आहे. अखंड ज्ञानाची भूमिका ही ज्ञानेश्वरीतून मांडलेली आहे. वैज्ञानिक हे त्यांची भूमिका भौतिक पद्धतीने मांडतात. त्यामुळे स्पेस आणि टाईम याचा अभ्यास म्हणजे काळाची गरज आहे. जीवनाविषयी स्पष्ट संकल्पना आपल्या असल्या पाहिजेत. जेव्हा ब्रह्मांड जन्माला आले, तेव्हा आपणही जन्माला आलो. तुम्ही सुखी होऊन माझ्याकडे जावे असे भगवंतालाही वाटते. वायरमध्ये वीज असते, परंतु योग्य बल्ब बसविल्याशिवाय आणि बटण दाबल्याशिवाय प्रकाश मिळू शकत नाही. तसेच या ठिकाणी सुद्धा आहे. चेतना आणि जड हे वेगळे आहेत. जीवनाच्या प्रत्येक अंगाचा अभ्यास हा करीत असताना लाईफ इज अ‍ॅण्ड आर्ट या भूमिकेतून जावे लागेल.

वामनीय सूत्रांच्या अभ्यासात या अनेक गोष्टी सांगितलेल्या आहेत. अमेरिकेत याबद्दल अभ्यासही सुरू आहे. पाश्चिमात्य आणि पौरात्य यांनी मिळून जर अभ्यास केला तर जगाला पुढील काळ चांगला आहे. ज्याला जीवनाची आतुरता कळावयाची आहे. त्याने भेद करता कामा नये. स्टीफनने काय संशोधन केले आहे हे आपल्यालाही अभ्यासावे लागेल. ज्ञान आणि वैज्ञानिक विज्ञानातून जीवनाची व्याख्या करता आली पाहिजे. जीवनसत्त्व म्हणजे गॉड पार्टीकल आणि त्याचे जड आणि चेतनेतील गुंफण कसे आहे हा विषय महत्त्वाचा आहे. हे अभ्यास करीत असताना अडचणी जरूर येतात. परंतु आता स्पेस आणि टाईम याचा सूक्ष्म अभ्यास करणे ही काळाची गरज आहे. इन्ट्यूशन (अंतप्रेरणा) हा विषय अभ्यासला पाहिजे. जीवन ही एकमेव कला आहे. समर्थांनीही साक्षेपाची मांडणी केली आहे. विश्वाची प्रकृती ही अष्टदा प्रकृतीतून निर्माण झाली असून त्यात पंचमहाभूते आणि रज, तम आणि सत्त्व या गुणांचा समावेश आहे. 

मी जीवाच्या ठिकाणी अंश आहे, असा भाव आपल्याला निर्माण करता आला पाहिजे. पंधराव्या अभिनव अभंगात पृथ्वीचा स्वभाव जिरविते पाणी...असे म्हटले आहे. पूर्ण पुरूषाचा अभ्यासही आठव्या अध्यायात आहे. प्रत्येक वेळेस भगवान श्रीकृष्णाला अर्जुनाला विशेषणे लावावी लागली. त्याला अनेक कला शिकवाव्या लागल्या.  एक बीज असते आणि ते जमिनीत पडते. त्याला  कोंब फुटतो आणि नंतर त्याचा वृक्ष होतो. उत्पत्ती, स्थिती आणि लय या तिन्ही अवस्थेत माणसाला चित्तानंद मिळाला पाहिजे. दृष्टीचे कार्य हे अव्याहत चालू असते. धनंजयाला किरीट असेही म्हटले आहे. पंचमहाभूतांच्या माध्यमातून हा अभ्यास आहे. एखादे शहर एखाद्या राजाने वसविले म्हणून त्याचे हात थकतात का? तद्वतच ब्रह्मांडाचे विस्तारणे चालू असतानाही निर्मिती करणारा ईश्वर थकत नाही. स्वप्नात आणि जागृतीत वेगळा असा तो असतो. राजा, प्रजा ही आपापली कामे करीत असतात. 

ईशसत्ता आणि जनसत्ता याचा अभ्यास  ज्ञानेश्वरीच्या  नवव्या अध्यायात मांडला आहे. पाण्याचा लोट आला तर मिठाच्या घाटाचे काय होणार? तसेच जीवनाचे आहे. सूर्य आला म्हणून अंधार जातो. तरीही लोक अंधार का गेला म्हणून शोध करीत बसतात. जग, जीवन आणि जगद् यासंबंधी ठाम विचार असला पाहिजे. सार्वजनिक जीवनाचा विचारही वैज्ञानिक दृष्टिकोणातून व्हायला पाहिजे. ईश्वर रचनेमागे काही हेतू आहे काय हे तपासता आले पाहिजे. अनेक शास्त्रे आली तरी देवाचा हेतू कळाला नाही. हेतू म्हणजे स्वधर्म कळणे असे आहे. ही सर्व लिला आहे परंतु लोक चेष्टा समजतात.  सूर्याच्या मैत्रीमुळे ब्रह्मांडाची निर्मिती झाली आहे. ई =एमसी स्क्वेअर या समीकरणाप्रमाणे एनर्जीमुळे सर्व निर्माण झाले आहे. आधी सूर्याचा जन्म झाला आणि नंतर पृथ्वी जन्माला आली आणि नंतर जीव आले. ईश्वर जो अनासक्त आहे. प्रत्येक बाप हा अनासक्त असला पाहिजे. त्या ठायी ती लक्षणे असली तरच तो काहीतरी देऊ शकतो. मी स्वल्पसत्ता दिली आहे. मात्र ती परिपूर्ण शक्तिमान आहे हे माझे गूढ आहे ते मी तुला दाखविले आहे. मुलाला हे सर्व दिले की बापाला आनंदच होत असतो. घराण्याचे वैभव तर वाढले पाहिजे, परंतु आपण अनासक्त असलो पाहिजे.

   कोळ्याने पौर्णिमेच्या रात्री पाण्यात टाकलेल्या जाळ्यात पौर्णिमेच्या चंद्राचे बिंब दिसते. परंतु ते जाळे जर बाहेर काढले तर त्या जाळ्यात बिंब अडकेल काय, असे परमेश्वराच्या कृपेचे असते. परमेश्वर आपल्याला मदत करतो. परंतु तो आपला गुलाम नाही.  बोध देव देत असतो आणि प्रतिबोध गुरू देत असतात. प्रत्येकाची शिकवणी वेगवेगळी असते पण ती आपल्याला कळाली पाहिजे.

Web Title: Studying space and time is a need of the hour

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.