A song about the teaching of karma yoga | कर्मयोगाची शिकवण देणारी गीता
कर्मयोगाची शिकवण देणारी गीता

गीता जयंती विशेष/  
श्रीमद्भगवद गीता केवळ धर्मग्रंथ नाही तर मानवी जीवनमूल्यांचा तो आधार ग्रंथ आहे. भारतीय तत्वज्ञानाने जगाला दिलेली ती अनुपम भेट आहे. म्हणूनच या ग्रंथावर जगात सर्वाधिक टीका लिहिल्या गेल्या. संत ज्ञानेश्वरांनी भावार्थ दीपिका म्हणजे ज्ञानेश्वरी, लोकमान्य टिळकांचे गीता रहस्य, विनोबाजींची गीताई अशी कितीतरी नावे लिहिता येतील. सशस्त्र क्रांतिचा नारा देणा-या भगतसिंगपासून अहिंसेचा मंत्र देणा-या गांधीजींपर्यंत सर्वांनाच हा ग्रंथ प्रिय वाटला, मार्गदर्शक झाला. भगवद्गीता हा योगशास्त्रांना सोपे करून सांगणारा, नकारात्मकतेला सकारात्मकतेत बदलून पडलेल्या मनाला ऊर्जा देणारा आणि विवेक जागविणारा ग्रंथ आहे. अनेकांनी मला प्रश्न विचारला की भगवद्गीता वाचून त्याचा अर्थ समजून घेतला की झाले. गीता पाठ करण्याचे काय कारण? साखर केवळ दुधात घालून चालत नाही ती चमच्याने घोळवली तरच साखरेची गोडी दुधात विरघळते. त्याच प्रमाणे गीता केवळ वाचून कळाली तरी जीवनात घोळवायची असेल तर पाठांतर मदत करते. त्या निमित्ताने आपण पुन्हा पुन्हा ती समजावून घेतो. जीवनात जेव्हा द्वंद निर्माण होते तेव्हा परिवार, धर्म आणि क्षेत्र धर्म द्वंदात गोंधळलेल्या अर्जुनाला निमित्त करून सांगितलेली गीता आपल्यालाही पदोपदी मार्गदर्शन करते. 
मुलांना तर संस्कृत कळतही नाही मग केवळ पाठांतर करून काय उपयोग? असाही प्रश्न मला अनेकांनी विचारला. बालवयात स्मरणशक्ती तीव्र असते. पाठांतर पटकन होते. मोठेपणी पाठांतराला मर्यादा येतात. पण त्यावेळी समज वाढलेली असते. लहानपणी पाठ केलेले सर्व मोठेपणीही लक्षात रहाते. तेव्हा अर्थ कळाला की आपण लहानपणी हे पाठ करून ठेवले याचा मोठा आनंद मनाला झाल्याशिवाय राहत नाही. मला गीतेचे १८ अध्याय पाठ करायला तीन वर्ष लागली. मुलांनी केवळ पंधरा-वीस दिवसात दोन अध्याय सहज पाठ
 केलेत. बालवयात पाठांतराचा हा मोठा फायदा मिळतो. या शिवाय संस्कृत उच्चारणामुळे स्पष्ट उच्चार करण्याची 
सवय जडते. वाणी शुध्द होते. स्वरयंत्राला व्यायाम मिळून आवाजालाही धार लागते. गीता कर्मयोगाची शिकवण देते. सातत्याने सत्कर्म करत रहायला प्रेरित करते. निर्भयता, शुध्दता, स्वच्छता, ज्ञानोपासना, योगाचरण, व्यवस्थित रहाणे, दान, दमन, अर्पण, स्वाध्याय, तप, आर्जव, अहिंसा, सत्य, क्र ोध, त्याग, शांती, दया, अलोलुप्त्व, मार्दव, लज्जा, तेज, क्षमा, धैर्य, शुध्दता, निर्वेरता, निरभिमान अशा दैवी संपदा म्हणजेच जीवनातील सद्संस्कारांचे प्रतिपादन करते. बालवयात या संस्कार सिंचनाची सर्वाधिक  आवश्यकता असते. शालेय शिक्षणाला सदाचरणाच्या शिक्षणाची जोड असणे किती महत्त्वाचे आहे. याचे भान आता जगाला येऊ लागले आहे. भारतीय शिक्षण पध्दतीत संस्कारांचे अनन्यसाधारण महत्त्व होते. कितीही मान, सन्मान, पद, प्रतिष्ठा, पैसा कमावला तरीही मनाची शांती नसेल तर हे सर्व निरर्थक असते. 
मनाची शांती आणि समत्वाचे शिक्षण गीता देते. या दृष्टीने आजच्या प्रचंड स्पर्धेच्या युगात ‘सुख दु:खे समे कृत्वा लाभालाभौ जयाजयौ’ असे विचारांनी समत्व साधण्याचे प्रशिक्षण गीतेकडून मिळते. अंतरंग योगात प्रवेश कसा करावा याचे सुरेख विवेचन गीता करते. म्हणूनच गीतेचा अभ्यास सर्वार्थाने उपयुक्त आहे. 
एखाद्या ग्रंथाची जयंती साजरी व्हावी असा एकमात्र गं्रथ गीता आहे. आज गीता जयंतीच्या निमित्ताने या ग्रंथाचा परिसस्पर्श आपल्याही जीवनाला व्हावा, असा संकल्प प्रत्येकाने करायला हवा!
- डॉ.संजय मालपाणी, गीता परिवाराचे प्रमुख, संगमनेर.

Web Title: A song about the teaching of karma yoga

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.