हा धक्का पिचडांना की लहामटेंना?

By सुधीर लंके | Published: March 17, 2021 03:00 PM2021-03-17T15:00:27+5:302021-03-17T15:04:29+5:30

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सीताराम गायकर यांच्या गळ्यात राष्ट्रवादीचे उपरणे टाकले.

Is this a shock to the pitched or Lahamate? | हा धक्का पिचडांना की लहामटेंना?

हा धक्का पिचडांना की लहामटेंना?

Next

अहमदनगर : पिचड पिता-पुत्रांवर टीका करत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सीताराम गायकर यांच्या गळ्यात राष्ट्रवादीचे उपरणे टाकले. गायकरांना पक्षात प्रवेश देऊन आपण पिचड यांना धक्का दिला असा आनंद कदाचित अजित पवार यांना असेल. मात्र, पवारांनी पिचड यांच्यापेक्षाही राष्ट्रवादीचे कार्यकर्ते, मतदार आणि पक्षाचे आमदार डॉ. किरण लहामटे यांनाच एक प्रकारे धक्का दिला आहे.

राजकारणात नैतिकता, आश्वासने याला काडीचीही किंमत नसते. अजित पवार हे स्वत:ही शब्द पाळणारे नेते नाहीत, हे स्वत: त्यांनीच या पक्षप्रवेश सोहळ्यातून दाखवून दिले आहे. त्यामुळे गायकरांचा पक्ष प्रवेश हा राष्ट्रवादीला फायदेशीर ठरेल की पिचड यांना? अशी वेगळी चर्चा जिल्ह्याच्या राजकारणात सुरू झाली आहे.

अकोले हा डाव्या चळवळीचा तालुका आहे. येथील मतदार भाषण हे गंमत म्हणून ऐकत आलेले नाहीत. येथील लोक कान, डोळे सतत उघडे ठेवतात. पवार हे राष्ट्रवादीचे नेते आहेत म्हणून अकोलेकर राष्ट्रवादीसोबत आहेत, असे अजित पवार समजत असतील, तर तो त्यांचा भ्रम ठरू शकतो. पुरोगामी विचारांमुळे हा तालुका धर्मनिरपेक्षतेचे राजकारण करणाऱ्या पक्षांसोबत राहत आलेला आहे. त्यामुळेच पिचड पिता- पुत्रांचा भाजप प्रवेश येथील मतदारांना पटला नाही. त्यांनी पिचड यांना जसे डोक्यावर घेतले होते, तसेच एका दणक्यात खालीही आपटले. येथील मतदारांना कुणीही गृहीत धरू नये, असाच संदेश यातून अकोलेने दिला.

अजित पवार यांना मात्र हे जनमानस समजले आहे की नाही? याबाबत साशंकता आहे. कारण, तेदेखील अकोलेच्या मतदारांना गृहीत धरू लागले आहेत, हे गायकर यांच्या पक्षप्रवेश सोहळ्यातून दिसले. विधानसभा प्रचारासाठी अजित पवार हे अकोले येथे आले होते. त्यावेळी सीताराम गायकर यांच्याबद्दल त्यांनी कठोर टीका केली होती. त्यांचे ‘ते’ वाक्य आजही जिल्ह्याच्या स्मरणात आहे. तेव्हा ते गायकर यांना नागवे करायला निघाले होते. आता मात्र त्यांनी गायकरांच्या गळ्यात शाल टाकली. यात अजित पवारांनी आपले शब्द व भाषणे बदलली. आपल्याजवळ आला की माणूस ‘नायक’ बनतो व दूर गेला की ‘खलनायक’ बनतो, असा मतलबी संदेश यातून अजितदादांनी दिला. यातून त्यांनी गायकर व कार्यकर्त्यांचाही फार सन्मान केला, असे नव्हे. पिचड यांच्यावर सूड उगविण्यासाठी त्यांचा त्यांनी वापर केला.

गायकर व त्यांच्या समर्थकांना राष्ट्रवादीत प्रवेश देताना राष्ट्रवादीने त्यांचेच आमदार डॉ. किरण लहामटे यांनाही विश्वासात घेतलेले दिसत नाही. राष्ट्रवादीच्या अनेक कार्यकर्त्यांचा या प्रवेशासाठी बहुधा विरोध होता. तशी एक बैठकही झाल्याचे समजते. लहामटे यांना अकोले मतदारसंघाने भरघोस मताने विजयी केले. कारण त्यांची स्वत:चीही एक प्रतिमा निर्माण झाली होती. हा मांडवली करणारा व प्रस्थापितांना शरण जाणारा नेता नाही, असे लहामटे यांच्याबाबतचे जनमत आहे. प्रस्थापित नेत्यांना त्यांनी अंतर राखून दूर ठेवले होते. पिचड यांच्याभोवती जो गोतावळा भाजपमध्ये होता त्याचाच लहामटे यांना फायदा झाला. आता हा गोतावळा राष्ट्रवादीत आल्याने राष्ट्रवादी पुन्हा जुन्या वळणावर जाण्याचा धोका आहे. त्यामुळे लहामटे हेसुद्धा या पक्षप्रवेश सोहळ्याने अस्वस्थ असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

राष्ट्रवादीत डॉ. लहामटे व अशोक भांगरे यांच्यामध्ये विधानसभा उमेदवारीसाठी चुरस होती. त्यात लहामटे यांना संधी मिळाली. आता राष्ट्रवादीतच लहामटे व भांगरे यांचा अंतर्गत संघर्ष सुरू होण्याची शक्यता आहे. अमित भांगरे हेही आता नवीन नेतृत्व म्हणून पुढे येत आहेत. जिल्हा बँकेवर त्यांना संधी देऊन तो संदेश राष्ट्रवादीने दिला आहे. त्यामुळे पिचड यांना सोडून राष्ट्रवादीत आलेला गायकर व त्यांच्यासोबतचा गोतावळा, लहामटे-भांगरे हे राष्ट्रवादीत सौख्यभरे नांदणार का? याबाबत साशंकता आहे. पर्यायाने या पक्षप्रवेशाने राष्ट्रवादी मजबूत होणार की ‘डॅमेज?’

 

गायकर राष्ट्रवादीत का?

सीताराम गायकर यांनी राष्ट्रवादीत प्रवेश का केला? याला अनेक कंगोरे दिसतात. त्यांचे व वैभव पिचड यांचे फारसे सख्य नव्हते, अशी चर्चा आहे. अगस्ती कारखाना ताब्यात ठेवायचा असेल, तर जिल्हा बँक व शरद पवार आणि अजित पवारांशिवाय पर्याय नाही, असा त्यांचा आडाखा असू शकतो. जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष असताना त्यांच्या कार्यकाळात झालेली नोकरभरती कमालीची वादग्रस्त ठरलेली आहे. न्यायालयाच्या आदेशाचा गैरफायदा घेत सहकार विभागाने ही भरती पूर्ववत केली असली तरी या भरतीच्या उत्तरपत्रिकांबाबतचा संशयकल्लोळ मिटलेला नाही. गायकर भाजपमध्ये गेल्याने अगोदर भाजप सरकार या भरतीबाबत गप्प झाले. आता महाविकास आघाडीही मौनात आहे. या भरती प्रकरणावर पडदा टाकण्यासाठीही ते सरकारसोबत गेल्याचे मानले जाते.

Web Title: Is this a shock to the pitched or Lahamate?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.