संजय कळमकर यांची ‘शुभमंगल सावधान’ ठरली विद्यार्थीप्रिय कथा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 3, 2019 02:52 PM2019-11-03T14:52:23+5:302019-11-03T14:53:47+5:30

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्रथम वर्ष कला विभागाच्या अभ्यासक्रमात येथील साहित्यिक डॉ़ संजय कळमकर यांची ‘शुभमंगल सावधान’ ही कथा विद्यार्थीप्रिय ठरली आहे़. पुणे विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात स्थान मिळालेले कळमकर हे नगर जिल्ह्यातील पहिलेच साहित्यिक आहेत़.

Sanjay Kalamkar's 'Shubhmangal Aware' became a student-friendly story | संजय कळमकर यांची ‘शुभमंगल सावधान’ ठरली विद्यार्थीप्रिय कथा

संजय कळमकर यांची ‘शुभमंगल सावधान’ ठरली विद्यार्थीप्रिय कथा

googlenewsNext

अहमदनगर : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्रथम वर्ष कला विभागाच्या अभ्यासक्रमात येथील साहित्यिक डॉ़ संजय कळमकर यांची ‘शुभमंगल सावधान’ ही कथा विद्यार्थीप्रिय ठरली आहे़. पुणे विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात स्थान मिळालेले कळमकर हे नगर जिल्ह्यातील पहिलेच साहित्यिक आहेत़.
प्रथम वर्षाच्या अभ्यासक्रमातील ‘समकालिन मराठी कथा’ या क्रमिक पुस्तकात कळमकर यांची ‘शुभमंगल सावधान’ ही कथा आहे़. या पुस्तकाचे संपादन डॉ. शिरीष लांडगे, डॉ. दिलीप पवार, डॉ. संदीप सांगळे यांनी केले आहे. 
कळमकर यांनी विवाहातील प्रथांचा फोलपणा रंजक पद्धतीने या कथेत मांडला आहे. विवाहाचा मूळ हेतू बाजूला पडून भव्यदिव्यता; उत्सवी स्वरुप, श्रीमंतीचा बडेजाव, खोटी प्रतिष्ठा, अमाप खर्च, राजकीय पुढा-यांची सहेतूक हजेरी यालाच आपल्याकडील विवाहात जास्त महत्त्व आले आहे. यावर भाष्य करताना कळमकर यांची कथा विनोदी अंगाने हसता- हसवता अंतर्मुख करते. म्हणूनच नर्मविनोदी शैलीतील ही कथा विद्यार्थ्यांना  भावली आहे. 
कथेमध्ये विवाहातील सोपस्कार, त्यातील संगती -विसंगती, गंमतीजमती प्रत्ययकारीपणे प्रकट झाल्या आहेत. उपरोध, उपहास आणि विविध विनोदी प्रसंगातून हे कथानक लय पकडते. सहज, सोप्या भाषेत वास्तवतेला विनोदाच्या साहाय्याने कथारुप दिल्याने विद्यार्थ्यांमध्ये कळमकर यांची कथा प्रिय झाली आहे़. 
लग्न विधीतील पैशांच्या उधळपट्टीतून निर्माण होणा-या समस्यांचे, प्रथा-परंपरेचे कंगोरे उलगडत त्यांची कथा मानवी स्वभावातील विसंगतीवर प्रहार करते़. प्रसिद्धीचा हव्यास, धूर्तपणा, संधीसाधूपणा यातून साधलेला विनोद कथेची उंची वाढवणारा असल्याने ही कथा विद्यार्थ्यांच्या आवडीची ठरली आहे, असे मराठी विषय शिकविणा-या प्राध्यापकांचा अभिप्राय असल्याची माहिती कळमकर यांनी दिली़.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठांतर्गत असलेल्या महाविद्यालयांमध्ये मराठी विषय शिकविणा-या अनेक प्राध्यापकांकडून मला प्रतिक्रिया येत आहेत़. महाविद्यालयांमध्ये विविध कार्यक्रमांसाठी गेल्यानंतरही विद्यार्थी आवर्जुन ‘शुभमंगल सावधन’ या कथेविषयी प्रतिक्रिया देतात व ही कथा आमची आवडती कथा असल्याचे सांगतात़ या कथेतून विवाहातील अनावश्यक बाबींवर केलेल्या मार्मिक टिपण्या कायम स्मरणात राहत असल्याचेही विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे़. या कथेतील काही उतारे, प्रसंग विद्यार्थ्यांच्या तोंडपाठ झाल्याचे पाहून आनंदाचा सुखद धक्का बसला, असे कळमकर यांनी सांगितले.
 

Web Title: Sanjay Kalamkar's 'Shubhmangal Aware' became a student-friendly story

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.