Pawar is the chief minister to Pawar | पवारांना मुख्यमंत्री करणारे पवार
पवारांना मुख्यमंत्री करणारे पवार

ठळक मुद्दे वसंतदादा पाटील मुख्यमंत्री असताना त्यांच्यावर अविश्वास ठराव आणण्याचे धाडस शरद पवार यांनी ऐन तारूण्यात केलेत्यामागील सूत्रधार काशिनाथ पवार उर्फ भाऊ होते. तब्बल ४० आमदारांची जबाबदारी भाऊंनी घेतली पवारांनी भाऊंंना सहकार मंत्री हे पद न मागता देऊ केलेमात्र भाऊंनी मंत्रिपदावर पाणी सोडून नाराजांना मंत्रिपद दिलेत्यामुळेच शरद पवार वारंवार भाऊंचा उल्लेख शेलार मामा म्हणून करीत असत.

अहमदनगर : वसंतदादा पाटील मुख्यमंत्री असताना त्यांच्यावर अविश्वास ठराव आणण्याचे धाडस शरद पवार यांनी ऐन तारूण्यात केले होते. त्यामागील सूत्रधार भाऊ होते. तब्बल ४० आमदारांची जबाबदारी भाऊंनी घेतली. राहुरी तालुक्यात आमदारांना आणून सांभाळण्याचे काम केले. भाऊंनी हे आमदार सांभाळले नसते तर शरद पवार पुलोदचे मुख्यमंत्री झाले नसते. याच भाऊंना शरद पवार यांनी एस. काँग्रेसची स्थापना करताना शेलार मामा ही उपाधी दिली.

राहुरीपासून सात किलोमीटर अंतरावर बारावाड्यांचे मिळून बनलेले बारागाव नांदूर हे ऐतिहासिक गाव. माजी आमदार काशिनाथ पवार उर्फ भाऊ यांचा जन्म १२ एप्रिल १९२२ रोजी बारागाव नांदूर येथे शेतकरी कुटुंबात झाला. भाऊंचे पंतोबा हरिबा पवार हे सुपा (ता. पारनेर) येथील. पण ते बारागाव नांदूर येथे वतनावर आले. भाऊंचे वडील लक्ष्मण पाटील हे बारागाव नांदूरसह बारावाड्याचे पाटील होते. मुळा धरण होण्याच्या अगोदर लक्ष्मण पाटील यांची शंभर एकर जमीन होती. अशा पाटील घराण्यात जन्मलेल्या भाऊंना समाजसेवेचा वारसा वडिलांकडून मिळाला.

भाऊंचे प्राथमिक शिक्षण बारागाव नांदूर येथील शाळेत झाले. शिक्षण घेत असताना त्यांना व्यायामाची आवड निर्माण झाली. कुस्तीची आवड निर्माण झाल्यानंतर अनेक पहिलवान मित्रांशी भाऊंची मैत्री वाढली. सर्जेराव गाडे, बाबूलाल शेख, बशीर देशमुख असे अनेक पहिलवान बारागाव नांदूर परिसरात उदयास आले. चौथीपर्यंत शिक्षण झाल्यानंतर भाऊंनी शेती व समाजकारणासाठी शिक्षणाला रामराम ठोकला. राहुरीची मोसंबी परदेशात प्रसिद्ध होती. म्हसका डाळिंब राहुरी तालुक्यात प्रथम भाऊंनी आणले. मोसंबी व डाळिंबाच्या शेतीमध्ये व्यापारी पद्धतीने पीक घेतले.

राहुरी तालुक्यातील अनेक गावांतील मुलांना भाऊंनी पहिलवानकी करण्याचा मार्ग दाखविला. भाऊंनी अनेक कुस्त्यांचे फड गाजविले. त्यामुळे राहुरी तालुक्यातील पहिलवानांचा जिल्ह्यात दरारा निर्माण झाला होता. सामाजिक कामाची गती लक्षात घेता गावक-यांनी भाऊंना सरपंचपदाची संधी दिली. सरपंचपदाच्या संधीचे भाऊंनी सोने केले. बारा वाड्या परिसराला भयमुक्त करण्याचे काम केले. बारागाव नांदूर परिसरात दरोडेखोरांचे पेव फुटले होते. परिसरात शांतता प्रस्थापित व्हावी, म्हणून प्रबोधनही केले. त्यानंतर शिल्लक दरोडेखोरांचाही बंदोबस्त केला. मित्रांच्या मदतीने दरोडेखोरांना भाऊंनी पोलिसांच्या ताब्यात दिले़ त्यानंतर भयमुक्त बारागाव नांदूर अशी ओळख निर्माण झाली. नंतर भाऊंनी समाजामध्ये वाढलेल्या व्यसनाधीनतेवर प्रहार केला. दारू, विड्या, गांजा ही व्यसने अनेक युवकांना सोडण्यास भाऊंनी भाग पाडले. युवकांना लाठीकाठी, कुस्त्या, दांडपट्टा, मल्लखांब आदी मैदानी खेळांकडे वळविले. सरपंच पदाच्या काळात भाऊंनी ‘पाणी आडवा, पाणी जिरवा’ ही मोहीम हाती घेतली. शासनाच्या विविध योजना गावात राबविल्या. बारागाव नांदूर सहकारी सोसायटीची स्थापना केली.

मुळा धरण मोरवाडी येथे होणार होते. त्यामुळे पाण्याचा फायदा राहुरी तालुक्याला होणार नव्हता. बाबूराव दादा तनपुरे व भाऊ या जोडीने मुळा धरण बारागाव नांदूर येथे आणण्याचा आटोकाट प्रयत्न केला. बारागाव नांदूरला धरण उभे राहिले तर शेतकरी सुखी होईल, हे लक्षात घेऊन प्रकल्पासाठी स्वत:ची शंभर एकर जमीन दिली. त्यानंतर अनेकांनी जमिनी धरणासाठी दिल्या. त्यातून मुळा धरणासारखा जिल्ह्यातील सर्वात मोठा २६ हजार दशलक्ष घनफूट क्षमतेचा प्रकल्प उभा राहिला.

बारागाव नांदूरचे आदर्श सरपंच म्हणून भाऊंच्या कामाची नोंद समाजाने घेतली.  त्यामुळे राहुरी पंचायत समितीचे पहिले सभापती म्हणून भाऊंना संधी मिळाली. बारावाड्या व डोंगर पठारात काम करणा-या धडाडीच्या व्यक्तिमत्त्वाला तालुक्याचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली. यशवंतराव चव्हाण यांच्या कार्यातून प्रेरणा घेत भाऊंनी सभापती असताना एकाच दिवशी तालुक्यात ११० विहिरी खोदाईचे काम सुरू केले. कोळेवाडीचा टेलटँक उभारला. पश्चिम भागात सिंचन बंधारे उभारले. राहुरी तालुक्यात विविध ठिकाणी जलसिंचनाच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या.

सहकारामध्ये भाऊंचा कर्तृत्वाचा आलेख उंचावत असताना बाबूराव दादा तनपुरे यांच्याशी घनिष्ठ संबंध आला. दादा-भाऊंच्या जोडीने राहुरी तालुक्याचा राज्यात दबदबा निर्माण केला. राहुरी कारखान्याचे उपाध्यक्ष म्हणून भाऊंनी भरीव काम केले. उसाला चांगला भाव, वेळेवर पेमेंट, शेतक-यांनी पिकविलेल्या उसाला राज्यात एक रूपया अधिक भाव दिला जात होता. दादा वरिष्ठ पातळीवरील काम सांभाळीत तर भाऊ राहुरी तालुक्याची धुरा सांभाळत असे. या जोडगोळीमुळे राहुरीच्या विकासाचा गतिमान रोडमॅप आखला.
राम-लक्ष्मणाची जोडी काळाच्या ओघात फुटली. यशवंतराव चव्हाण यांनी भाऊंना आमदारकीचे तिकीट दिले. सकाळी भाऊ राहुरी साखर कारखान्याचे अध्यक्ष झाले. संध्याकाळी आमदारकीचा निकाल लागला. विशेष म्हणजे भाऊंच्या गळ्यात आमदारकीची माळ पडली. विरोधक व सत्ताधारी कसा असावा, याचे मूर्तिमंत उदाहरण राहुरी विधानसभा मतदार संघात पहायला मिळाले. भाऊ आमदार झाले, त्या दिवशी रंगपंचमी होती. निवडणुकीत भाऊंचे विरोधक म्हणून मतमोजणीच्या ठिकाणी अण्णासाहेब कदम व पी. बी. कडू हे उपस्थित होते. तिघांनी राजकारणाचे जोडे बाजूला ठेऊन एकमेकांच्या अंगावर पेनातील शाई फेकून आगळीवेगळी रंगपंचमी साजरी केली.

कारखान्यासह राहुरी तालुक्यातील खरेदी विक्री संघ सोडून इतर संस्था भाऊंच्या ताब्यात आल्या होत्या. विधानसभा हे एक मंदिर आहे, याची प्रचिती भाऊंच्या एका कृतीतून अवघ्या देशाला आली. विधानसभेत शपथ घेताना भाऊंनी पायातील चप्पल काढली. या घटनेची सर्वत्र चर्चाही झाली. भाऊंना केवळ अडीच वर्ष आमदाकीची खुर्ची मिळाली. मुख्यमंत्री शरद पवार यांना मुख्यमंत्री करण्यात भाऊंचा सिंहाचा वाटा होता. ४० आमदारांचे मन वळविण्यात त्यांना यश आले. त्यामोबदल्यात पवारांनी भाऊंंना सहकार मंत्री हे पद न मागता देऊ केले. मात्र काहीजण मंत्री पदासाठी नाराज असल्याचे भाऊंच्या लक्षात आले. त्यामुळे भाऊंनी मंत्रिपदावर पाणी सोडून नाराजांना मंत्रिपद दिले. त्यामुळे पुलोद सरकार सत्तेवर आले. त्यामुळेच शरद पवार वारंवार भाऊंचा उल्लेख शेलार मामा म्हणून करीत असत. त्यामागे पवारांना भाऊंनी दिलेली ताकद हेच कारण होते. इंदिरा गांधी यांनी पुलोद सरकार बरखास्त केले. त्यामुळे अवघे अडीच वर्षच भाऊंना आमदारकी मिळाली. मात्र, या काळात भाऊंनी घेतलेले निर्णय अत्यंत धाडसी होते. शरद पवार यांनी एस. काँग्रेसची स्थापना केली. भाऊंना त्यामध्ये अहमदनगर जिल्हाध्यक्षपद मिळाले. त्यावेळी अनेक आमदार पवारांना सोडून गेले होते. मात्र भाऊंसह पद्मसिंह पाटील, अंकुशराव टोपे, मालोजीराव मोगल व दत्ता मेघे एवढेच शरद पवार यांच्याबरोबर होते. एस. काँग्रेसच्या तिकिटावर भाऊ निसटत्या मतांनी पराभूत झाले.

राहुरी कारखान्यात सत्ता परिवर्तन घडविण्याचे कामही भाऊंनीच केले. त्यांनी विकास मंडळाची स्थापना केली. कारखान्यातील सत्ताधा-यांविरोधात सर्वांची मोट बांधली अन् कारखान्यात सत्तांतर घडवून आणले. दादापाटील इंगळे यांना अध्यक्ष करण्यात आलेत्यानंतर सर्जेराव गाडेंना अध्यक्षपद देण्यात आले. त्याकाळात कारखान्याच्या माध्यमातून महिन्याला सभासदांना पेमेंट मिळत असे. सभासदांना पाकिटात घालून पेमेंट घरपोहोच करणारा राहुरी हा देशातील पहिला सहकारी साखर कारखाना ठरला होता. सभासदांना संसारोपयोगी साहित्यही कारखान्याने दिले होते. श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ कायमस्वरूपी ऊस उत्पादकांच्या मालकीचे राहावे म्हणून यशस्वी प्रयत्न केले.
भाऊंनी २५ हजार हेक्टर क्षेत्राला शासनाकडून पाणी मंजूर करून घेतले. राहुरी, संगमनेर, राहाता या तालुक्यांच्या दृष्टीने निळवंडे धरण प्रकल्प महत्वाचा होता. तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांना कानडगाव येथे निळवंडे धरणाच्या उजव्या कालव्याच्या भूमिपूजनासाठी निमंत्रित केले. कालव्याचे भूमिपूजनही झाले. मुळा धरणाच्या योजनेत डावा कालवा नव्हता. तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्याकडे दादा-भाऊंनी पाठपुरावा करून डावा कालवा मंजूर करून घेतला.

विकास मंडळ ही राहुरी तालुक्यातील कार्यकर्त्यांची कार्यशाळा असल्याची भावना भाऊंची होती. अनेक छोट्या मोेठ्या कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन काम करण्याची हातोटी भाऊंकडे होती. त्यांनी आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात विकास मंडळाची धुरा धडाडीचे नेते रामदास पाटील धुमाळ यांच्या खांद्यावर दिली. धुमाळ यांच्याकडे सूत्रे हाती देताना भाऊंना गहिवरून आले होते. भाऊ पुणे येथील रूग्णालयात दाखल झाले होते. त्यावेळी शरद पवार भेटण्यास आले. पवारांकडे पाहत भाऊ म्हणाले, यापुढील धुरा रामदास पाटील धुमाळ यांनी सांभाळावी, असे माझे मत आहे. तसेच एस काँग्रेसची धुरा रावसाहेब पाटील म्हस्के, डॉ.नाथ पाऊलबुद्धे, दादाभाऊ कळमकर, अ‍ॅड. दौलतराव पवार, शंकरराव घुले यांच्याकडे सोपविण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानंतर भाऊ सक्रिय राजकारणातून निवृत्त झाले.

२५ मे १९७५ मध्ये भाऊंनी अखेरचा श्वास घेतला. त्यांचा वारसा पुढील पिढी चालवित आहे. धर्मपत्नी गंगुबाई पवार यांनी राहुरी कारखान्याचे उपाध्यक्ष म्हणून काम पाहिले होते. शिवाजीराव पवार हे महात्मा गांधी तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. सत्यवान पवार यांनी राहुरी कारखान्यात संचालकपद भूषविले होते. सोमनाथ पवार हे रोकडेश्वर पाणी वाटप संस्थेचे अध्यक्ष म्हणून कार्यरत आहे. राहुरी तालुक्याच्या जडणघडणीत अनेक विभूतींचे योगदान महत्वपूर्ण ठरले आहे. त्यामध्ये का.ल. तथा काशिनाथ पाटील पवार यांचे योगदान उल्लेखनीय आहे.

लेखक : सत्यवान पवार
(लेखक प्रगतशिल शेतकरी व स्व. काशिनाथ पवार यांचे सुपूत्र आहेत)

Web Title: Pawar is the chief minister to Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.