निळवंडेचे पाणी कोपरगावच्या शेवटच्या पाझर तलावात जाणार 

By सचिन धर्मापुरीकर | Published: November 18, 2023 07:52 PM2023-11-18T19:52:20+5:302023-11-18T19:52:27+5:30

प्रातांधिकारी व पोलिस उपअधीक्षकांच्या मध्यस्थीने उपोषण स्थगित  

Nilvande water will go to the last seepage pond of Kopargaon | निळवंडेचे पाणी कोपरगावच्या शेवटच्या पाझर तलावात जाणार 

निळवंडेचे पाणी कोपरगावच्या शेवटच्या पाझर तलावात जाणार 

कोपरगाव (जि. अहमदनगर) : निळवंडे धरणाचे पाणी कोपरगाव तालुक्यातील लाभक्षेभातील शेवटच्या गावां पर्यंत पोहचावे यासाठी कोपरगाव तालुक्यातील  रांजणगाव देशमुख या ठिकाणी गेली तीन दिवसांपासून आमरण उपोषण सुरू होते. शिर्डीचे प्रांताधिकारी माणिक आहेर, पोलिस उप अधिक्षक संदिप मिटके यांच्या मध्यस्थीने लाभक्षेत्रातील सर्व पाझर तलाव व लघु बंधारे भरून देणे तसेच यासाठी येणाऱ्या अडचणी प्रशासकीय पातळीवर सोडविल्या जातील असे लेखी आश्वासन दिल्यानंतर उपोषणकर्त्यांनी शनिवारी सायंकाळी सहा वाजता उपोषण स्थगित केले. 

निळवंडे लाभक्षेत्रातील कोपरगाव तालुक्यातील गावे द्वितीय चाचणीच्या प्रथम आवर्तनामध्ये वंचित राहिले होते. ते भरून मिळावे तसेच पाझर तलाव भरताना येणाऱ्या अडचणी दूर कराव्या, संघर्षातील खोटे गुन्हे मागे घ्यावे आदी मांगण्यासाठी गेली तीन दिवसांपासून उपोषण सुरू होते. या उपोषणासाठी अँड. योगेश खालकर, डॉ. अरूण गव्हाणे, सरपंच आण्णासाहेब गांगवे, कैलास रहाणे, गजानन मते, संजय बर्डे आदी शेतकरी प्रातिनिधीक स्वरूपात बसले होते. जो पर्यंत प्रशासन ठोस भूमिका घेत नाही तो पर्यंत उपोषण मागे घेणार नाही अशी भूमीका या उपोषणकर्त्यांनी घेतल्याने गेली तीन हे उपोषण सुरू राहिले. या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन देखील केले. तरी देखील प्रशासनाकडून कोणताही प्रतिसाद मिळत नव्हता. मात्र उपोषणकर्ते अँड. योगेश खालकर यांनी आत्मदहनाचा इशारा दिल्यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले. 

उपोषणकर्त्यांच्या मागणीची दखल घेत उपविभागीय अधिकारी माणिक आहेर, पोलिस उप-अधिक्षक संदिप मिटके, तहसिलदार संदिपकुमार भोसले, शिर्डीचे पोलिस निरिक्षक संदिप शिरसाठ, निळवंडेचे उप- कार्यकारी अभियंता महेश गायकवाड आदींनी उपोषणस्थळी भेट दिली. या सर्वांनी आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली. यावर नियोजनाची बैठक लावून अधिकाऱ्यांच्या नियोजनात पाझर तलाव भरले जातील असे आश्वासन दिले. त्यानंतर उपोषणकर्त्यांनी उपोषण स्थगित करण्याचा निर्णय घेतला व लेखी आश्वासनानंतर उपोषण स्थगित केले.जर शेवटच्या पाझर तलावापर्यंत पाणी पोहचले नाहीतर कोणतीही पूर्व सुचना न देता आम्ही आंदोलन करू असा इशाराही यावेळी शेतकऱ्यांनी दिला.  यामध्ये कोपरगावचे तहसिलदार संदिपकुमार भोसले यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली व त्यांचे कौतुक रांजणगावच्या सर्व शेतकऱ्यांनी केले. लहान मुलगा पवन वर्पे व उपस्थित अधिकारी यांच्या हस्ते लिंबू पाणी घेवून उपोषण स्थगित केले. 

नियोजनासाठी शिर्डीत समन्वय बैठक 

कोपरगाव तालुक्यातील पाझर तलाव भरण्यासाठी येणाऱ्या अडचणी संदर्भात उपविभागीय अधिकारी, पोलिस उपअधिक्षक, कार्यकारी अभियंता कैलास ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत सोमवारी शिर्डी मध्ये बैठक होणार आहे. कोपरगाव व संगमनेरचे तहसिलदार, शिर्डी, राहाता व संगमनेर ग्रामीणचे पोलिस निरिक्षक, कोपरगाव व संगमनेरचे गटविकास अधिकारी, तळेगाव शाखेच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व गावांचे तलाठी, ग्रामसेवक, उपोषणकर्तेसह प्रत्येक गावातील प्रतिनिधी यांना बैठकीसाठी निमंत्रित करण्यात आले आहे. या सर्वांच्या समन्वयातून सर्व पाझर तलाव भरून देण्यात येणार आहे.    

 

Web Title: Nilvande water will go to the last seepage pond of Kopargaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.