कांद्याच्या शेतात आढळले नवजात अर्भक; स्नेहालयाकडे बाळ सुपूर्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2020 03:43 PM2020-04-29T15:43:39+5:302020-04-29T15:44:15+5:30

शेवगाव तालुक्यातील ढोरसडे गावाच्या शिवारात कांद्याच्या शेतात स्त्री जातीचे नवजात अर्भक सापडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

Newborns found in onion fields; Baby handed over to Snehalaya | कांद्याच्या शेतात आढळले नवजात अर्भक; स्नेहालयाकडे बाळ सुपूर्द

कांद्याच्या शेतात आढळले नवजात अर्भक; स्नेहालयाकडे बाळ सुपूर्द

Next

शेवगाव : तालुक्यातील ढोरसडे गावाच्या शिवारात कांद्याच्या शेतात स्त्री जातीचे नवजात अर्भक सापडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. ही बाब शेतात काम करणा-या मजुरांच्या लक्षात आली. त्यानंतर तात्काळ पोलिसांना पाचारण करण्यात आले.
ढोरसडे येथील शेतकरी बाबासाहेब खंबरे यांच्या शेतात कांदा लागवड केलेल्या क्षेत्रात अज्ञात व्यक्तीने स्त्री जातीचे नवजात अर्भक एका झाडाच्या बाजूला ओलसर जमीन थोडी उकरुन त्यात ठेवले होते. सकाळी अकराच्या सुमारास बाळाचा रडण्याचा आवाज आल्याने ही बाब शेतात काम करणा-या लोकांच्या लक्षात आली. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक रामराव ढिकले हे कर्मचा-यांसमवेत घटनास्थळी दाखल झाले. ढिकले यांनी दहिगावने येथील प्राथमिक आरोग्य विभागाला संपर्क साधून डॉक्टरांना पाचारण केले. डॉ. कैलास कानडे यांनी त्या नवजात बालकाची आरोग्य तपासणी केली. त्यानंतर शेवगाव येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी बालकाला पाठवण्यात आले आहे. दरम्यान ढिकले यांनी अहमदनगर येथील स्नेहालय संस्थेला संपर्क साधून त्या बाळाचे संगोपन करण्याबाबत विनंती केली आहे. सायंकाळपर्यंत स्नेहालयाचे कर्मचारी बालकाला स्वीकारणार आहेत. 
सदर घटनेची माहिती परिसरात वा-यासारखी पसरली. अनेकांनी धाव घेऊन घटनास्थळ गाठले. यावेळी उपस्थितांनी मन हेलावणारी घटना पाहून हळहळ व्यक्त केली. या प्रकरणी अज्ञात आरोपीविरुद्ध शेवगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास ए. एस. आय गिरी करीत आहेत. 

Web Title: Newborns found in onion fields; Baby handed over to Snehalaya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.