Nandibalwala became a famous bull trader again | बैलांचा प्रसिद्ध व्यापारी झाला पुन्हा नंदीबैलवाला

बैलांचा प्रसिद्ध व्यापारी झाला पुन्हा नंदीबैलवाला

केडगाव : दारोदारी नंदीबैल घेऊन कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या व नंतर बैलांच्या व म्हशीच्या खरेदी-विक्री व्यवसायात आपले वेगळे अस्तित्व निर्माण करणाऱ्या वाळकीमधील (ता. नगर) व्यापाऱ्याला लॉकडाऊनचा चांगलाच फटका बसला आहे. आपला पारंपरिक व्यवसाय सोडून नव्या व्यवसायात भरारी घेणाऱ्या या व्यापाऱ्याचे कोरोनाने पंखच छाटल्याने त्याला पुन्हा नंदीबैल घेऊन दारोदारी पोटाची खळगी भरण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे.

कोरोनाने भल्याभल्या लोककलावतांचे जगणे मुश्कील केले आहे. वाळकी येथील तिरमली (नंदीवाले) या भटक्या जमातीचा शेटीबा रामा काकडे यांना लहानपणापासून खिलारी बैल, म्हैस यांचे आकर्षण होते. मात्र, भांडवलाअभावी त्यांची व्यापाराची इच्छा अधुरी राहत होती. वडिलांबरोबर त्यांना नाईलाजाने भिक्षेसाठी गावोगाव भटकंती करावी लागली. जनावरांची चांगली पारख असल्याने कोकण, मावळ भागात भटकंती करताना अनेक व्यापाऱ्यांशी त्यांचा संबंध आला. त्यातून मैत्रीचे संबंध जुळले. येथूनच त्यांच्या व्यापार करण्याच्या आशेला बळ मिळाले. वाळकी येथे भरणारा बैल, म्हशींचा बाजार राज्यात प्रसिद्ध असल्याने वाळकीत स्थायिक झाले. येथे खरेदी-विक्रीचा व्यापार करताना नावारूपाला आले. व्यापारातून मिळणाऱ्या पैशातून कुटुंबाच्या गरजा भागू लागल्या. घरची परिस्थिती सुधारली. यामुळे त्यांनी आपला पारंपरिक व्यवसाय बंद करण्याचा निर्णय घेतला. मात्र, मागील वर्षापासून कोरोनाने धुमाकूळ घातला. लॉकडाऊन झाले. त्यानंतर यंदाही पुन्हा कोरोनाचे संकट आले. त्यामुळे दहा जणांचे कुटुंब पोसताना शेटीबा काकडे यांना कसरत करावी लागली. कुटुंबापुढे उपासमारीचे संकट उभे राहिले. यातून मार्ग काढण्यासाठी त्यांना वयाच्या ७३ व्या वर्षी पुन्हा पिढीजात व्यवसायाकडे वळण्याशिवाय मार्गच शिल्लक राहिला नाही. कोरोनामुळे उतारवयात त्यांच्यावर पोटाची भूक भागविण्यासाठी नंदीबैलासह दारोदारी भटकंती करत भिक्षा मागण्याची वेळ ओढवली आहे.

--

१६ नंदीबैल

मागील वर्षापासून कोरोनाच्या संकटामुळे शेटीबा काकडे या नावाजलेल्या व्यापाऱ्यावर उदरनिर्वाहासाठी नंदीबैलासह दारोदार भटकंतीची वेळ ओढवली आहे.

Web Title: Nandibalwala became a famous bull trader again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.