नगर तालुक्यातील पदाधिकाऱ्यांची कोरोनाविरोधात झुंज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 04:26 AM2021-04-30T04:26:43+5:302021-04-30T04:26:43+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क केडगाव : नगर तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यात हक्काचा आमदार नसल्याने सारी भिस्त ...

Nagar taluka office bearers fight against Corona | नगर तालुक्यातील पदाधिकाऱ्यांची कोरोनाविरोधात झुंज

नगर तालुक्यातील पदाधिकाऱ्यांची कोरोनाविरोधात झुंज

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

केडगाव : नगर तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यात हक्काचा आमदार नसल्याने सारी भिस्त प्रशासनावरच असल्याने आता पंचायत समितीचे आजी-माजी पदाधिकारी कोरोनाविरोधात लढण्यासाठी सरसावले आहेत.

तालुक्यात आतापर्यंत ९ हजार जणांना कोरोनाची लागण झाली असून, १९३ जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. तालुक्यातील सर्वच्या सर्व १०६ गावांमध्ये कोरोनाचे रूग्ण आढळत आहेत. सध्या तालुक्यात पाच ठिकाणी कोविड सेंटर सुरू आहेत. मात्र, ऑक्सिजन बेड नसल्याने ऑक्सिजनची गरज असणाऱ्या रूग्णांचे हाल होत आहेत.

तालुक्याला स्वतंत्र आमदार नसल्याने सर्व भिस्त प्रशासनावर होती. मात्र, अशा कठीण काळात पंचायत समितीचे सभापती सुरेखा गुंड, उपसभापती डॉ. दिलीप पवार, माजी सभापती प्रवीण कोकाटे, माजी उपसभापती रवींद्र भापकर, जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले, जिल्हा परिषद उपाध्यक्ष प्रताप शेळके, गोविंद मोकाटे, बाळासाहेब हराळ, शरद झोडगे, आदी पदाधिकारी गावोगावी भेट देऊन सर्वसामान्यांना आधार देत आहेत.

माजी सभापती प्रवीण कोकाटे यांनी पाच दिवसात चार गावांमध्ये हजारो ग्रामस्थांची कोरोना तपासणी मोहीम राबवली. सारोळा बद्दी, नारायणडोह, उक्कडगाव वाटेफळ आदी गावांमध्ये लसीकरण मोहीम पार पडली.

त्याचबरोबर चिचोंडी पाटील शासकीय रुग्णालयामध्ये स्वखर्चाने नेटचे नियोजन केल्यामुळे येथे तीस बेड प्रशासनाकडून वाढविण्यात आले. त्याचबरोबर स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार करण्यासाठी पुढाकार घेत माणुसकीचे दर्शन घडवले. यासाठी सरपंच मनोज कोकाटे, ग्रामपंचायत सदस्य अशोक कोकाटे यांचे सहकार्य मिळत आहे.

पंचायत समितीच्या सभापती सुरेखा गुंड यांनी तालुक्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये कोरोना चाचणी वाढविण्यासाठी पाठपुरावा केला. कोरोना तपासणी शिबिरे आयोजित केली तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र याठिकाणी लसीकरण वाढविण्यात आले.

चिचोंडी ग्रामीण रुग्णालयात बेडची असलेली अडचण पाहून तातडीने ठिकाणी बेड, गाद्या, सॅनिटायझर, मास्क, हँडवॉश यांचा पुरवठा करण्यासाठी प्रयत्न केले. मेहेकरी प्राथमिक आरोग्य केंद्र, टाकळी काझी प्राथमिक आरोग्य केंद्र येथे लसीकरण व चाचणीसाठी आलेल्या नागरिकांना बसण्यासाठी तत्काळ सिमेंटचे बाकडे बसविण्यात आले.

उपसभापती डॉ. पवार यांनीही तालुक्यातील सर्व आरोग्य केंद्र व कोविड सेंटर येथे भेट दिली. याठिकाणी उपलब्ध असणारी सर्व साहित्य व औषधे यांची माहिती घेऊन तुटवडा भरुन काढण्यास प्राधान्य दिले.

कोविड सेंटरमधील रुग्ण व नागरिकांच्या भेटी घेऊन त्यांच्याशी संवाद साधत आहेत. गुंडेगाव, रूईछत्तीसी, वाटेफळ, साकत, दहिगाव, आंबिलवाडी आदी गावात अँटिजेन रॅपिड शिबिराचे आयोजन करून पॉझिटिव्ह रूग्णांना तालुक्यातील विविध ठिकाणच्या कोविड सेंटरला दाखल करण्यासाठी माजी उपसभापती रवींद्र भापकर धडपडत आहेत.

Web Title: Nagar taluka office bearers fight against Corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.