The mother's soul survived with courage; Brother too | गौरवच्या धैर्याने वाचले आईचे प्राण; भावालाही जीवदान
गौरवच्या धैर्याने वाचले आईचे प्राण; भावालाही जीवदान

चंद्रकांत शेळके । 
अहमदनगर : शाळेत शिकवलेल्या आपत्ती व्यवस्थापनाच्या मार्गदर्शनातून अचूक धडा घेत चौथीतील गौरव जाधवने वीज धक्क््यापासून आपल्या कुटुंबाचे प्राण वाचवले. राहाता तालुक्यातील वाकडी येथील जाधव कुटुंबावर लक्ष्मीपूजनाच्या पूर्वसंध्येला हा दुर्दैवी प्रसंग ओढवला होता. परंतु गौरवच्या चाणाक्ष बुद्धीने व धैर्याने त्याच्या आईसह लहान भावाला जीवदान मिळाले. 
गौरव हा वाकडी येथे जिल्हा परिषदेच्या शाळेत इयत्ता चौथीत शिकतो. त्याचे वडील रवींद्र जाधव यांचे गावात स्टेशनरीचे दुकान आहे. आई अर्चना जाधव गृहिणी असून लहान (चार वर्षांचा) भाऊ यशही घरी असतो. लक्ष्मीपूजनाच्या पूर्वसंध्येला सर्वत्र दिवाळीची तयारी सुरू होती. आधी आठवडाभर झालेल्या पावसामुळे सर्वत्र ओलेचिंब वातावरण होते. दि. २६ आॅक्टोबर रोजी सकाळी गौरव व त्याचा भाऊ यश अंगणात खेळत होते. आई कपडे धूत होती. काही वेळाने घराच्या मागील बाजूने आईचा ओरडण्याचा आवाज आला. गौरव धावत आईकडे पळाला. पाहतो तर काय, आई वीजतारेचा धक्का बसून जमिनीवर पडली होती. ज्या तारेवर आईने कपडे वाळत टाकले होते, त्यात पावसामुळे विद्युतप्रवाह उतरल्याने आईला जोरदार धक्का बसला. परंतु वजनामुळे तार तुटून खाली पडली. आईला तारेपासून वाचवण्यासाठी गौरव धावाधाव करू लागला. त्याने आईला हात लावला, परंतु त्यालाही विजेचा धक्का बसला. प्रसंगावधान राखून गौरव पळतच पुन्हा बाहेर गेला व पायात स्लिपर चप्पल घालून आला. दरम्यान,  बाहेर खेळत असलेल्या लहान भावाला त्याने घरात न येण्याचे बजावले. आईजवळ पडलेली वीजप्रवाह उतरलेली तार बाजूला करण्याचा त्याचा प्रयत्न होता. जवळच पडलेला झाडू उचलून त्याने काही प्रमाणात तार बाजूला केली. परंतु त्यातून ठिणग्या पडत होत्या. त्यामुळे घाबरलेल्या गौरवने शेजारील मंगल हुरे काकूला मोठ्याने आवाज देऊन मदतीला बोलावले. काकू धावतच आल्या. शेजारील लोकही जमले. 
गौरवने पुन्हा आपल्या वडिलांना बोलावून आणण्यासाठी दुकानात धूम ठोकली. काही वेळातच तो वडिलांना घेऊन आला. तोपर्यंत घरासमोर मोठी गर्दी जमली होती. परंतु घरात वीजप्रवाह उतरला असल्याच्या भितीने कोणी आत जाण्यास धजावत नव्हते. गौरवचे वडील पटकन घरात केले व त्यांनी ती तार बाजूला केली. गौरवची आई तोपर्यंत बेशुद्ध पडली होती. तोंडातून फेस आलेला होता. क्षणाचाही विलंब न करता गौरवच्या वडिलांनी गाडी बोलावून पत्नीला शिर्डी येथे दवाखान्यात हलवले. दरम्यानच्या प्रवासात पत्नीचा श्वास सुरू राहावा म्हणून ह्रदयावर वारंवार दाब दिला. तसेच तोंडातून श्वास भरला. शिर्डीत गेल्यावर डॉक्टरांनी प्रथमोपचार करून लोणी येथील प्रवरा हॉस्पिटलला नेण्यास सांगितले. प्रवरा हॉस्पिटलध्ये उपचार झाल्यानंतर गौरवच्या आईला शुद्ध आली. त्यांची प्रकृती सुधारत आहे. 
चिमुकल्या गौरवने दाखवलेल्या प्रसंगावधान व साहसामुळे आज त्याच्या आईला जीवदान मिळाले आहे. ‘एवढे भान तू कसे राखले,’ असे विचारले असता, गौरवने शाळेत वर्गशिक्षक राजू बनसोडे यांनी वीजप्रवाहापासून कशी काळजी घ्यावी, याबाबत केलेले मार्गदर्शन उपयोगात आणल्याचे सांगितले. 
आज माझे संपूर्ण कुटुंब गौरवमुळे वाचले आहे. एवढ्या लहान वयात त्याने दाखवलेल्या समयसूचकतेचे कौतूक वाटते. त्याच्यावर योग्य संस्कार केलेल्या शिक्षकांनाही याचे श्रेय जाते. सुदैवाने मोठ्या संकटातून माझे कुटुंब वाचले आहे, असे गौरवचे वडील रवींद्र जाधव यांनी सांगितले. 
 

Web Title: The mother's soul survived with courage; Brother too

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.