Minimum 10 rupees meals in the city: 5 people avail this service daily | नगरमध्ये अवघ्या दहा रुपयांत भरपेट जेवण: दररोज २०० जण घेतात या सेवेचा लाभ 
नगरमध्ये अवघ्या दहा रुपयांत भरपेट जेवण: दररोज २०० जण घेतात या सेवेचा लाभ 

अरुण वाघमोडे/ 
अहमदनगर : विधानसभा निवडणूक काळात शिवसेना या राजकीय पक्षाने दहा रुपयांत जेवण देण्याची घोषणा केली होती़ या घोषणेची कधी अंमलबजावणी होते हे माहित नाही़ नगरमध्ये मात्र काही संवेदनशील व्यापारी व सेवानिवृत्त सरकारी अधिकारी यांनी एकत्र येत हेल्पिंग हॅण्डस फॉर हंगर्स ग्रुपमार्फत अवघ्या दहा रुपयांत भरपेट जेवण देणारी व्यवस्था सुरु केली आहे. नवरात्रीपासून शहरातील प्रेमदान चौकात हा उपक्रम सुरु करण्यात आला आहे़ 
हेल्पिंग हॅण्डस ग्र्रुपमार्फत अतिशय शुध्द, सात्त्विक व पौष्टिक असा सांबार भात, खिचडी-कढी अथवा पुलाव दहा रुपयांत दिला जातो़ या सेवेचा दररोज १५० ते २०० जण लाभ घेतात़ या उपक्रमासाठी अनेक जण स्वत:हून मदतीचा हात देवून या सेवेचा विस्तार होण्याच्या दृष्टीने योगदान देत आहेत.
या उपक्रमासाठी राजेंद्र मालू यांनी स्वत:ची जागा देवून तेथे पत्र्याचे शेडही उभारुन दिले आहे. ग्रुपचे सदस्य वर्गणी जमा करून रोजच्या स्वयंपाकासाठी लागणारे साहित्य आणतात. समाजातील काही दानशूर या उपक्रमासाठी मदत करीत आहेत़ तयार केलेले अन्न स्वच्छ प्लेटमध्ये सर्वांना उपलब्ध करून दिले जाते. लोकांना आरामशीर भोजन घेता येण्यासाठी येथे उंच टेबलचीही व्यवस्था केली आहे़ जेवणासोबत चवीसाठी लोणचेही दिले जाते. शनिवार वगळता आठवडाभर सकाळी ११ ते दुपारी १ यावेळेत हा उपक्रम सुरु असतो. यासाठी राजेंद्र मालू, महावीर कांकरिया, संगीता भोरे, संजय खोंडे, नाना भोरे, श्रीनिवास खुडे, नंदेश शिंदे, किशोर कुलकर्णी, अपर्णा खुडे, प्रा़मुंडके यांच्यासह अनेक जण या उपक्रमात स्वयंस्फूर्तीने मदत करतात. प्रत्येक जण वेळे मिळेल त्याप्रमाणे या केंद्रावर येवून जबाबदारी सांभाळत आहे़ 
    गरिबांसाठी आधार 
प्रेमदान चौक परिसरात अनेक हॉस्पिटल्स असून याठिकाणी परगावचे रुग्ण व त्यांचे नातेवाईक येत असतात. या उपक्रमामुळे सर्वसामान्यांची कमी पैशांत चांगली व्यवस्था झाली आहे़ हातावर पोट असणारे, मजूर, बेघर, अनाथ यांच्यासाठीही हे केंद्र आधार ठरले आहे़ 

 भुकेलेल्या अन्न व तहानलेल्या पाणी देणे हिच खरी माणुसकी असल्याची शिकवण भारतीय संस्कृतीची महानता आहे. आज एकीकडे अन्नाची प्रचंड नासाडी तर दुसरीकडे आर्थिक क्षमता नसल्याने एक वेळच्या अन्नालाही महाग असलेले लोक आपण पाहतो. या विदारक परिस्थितीवर केवळ चर्चा करण्यापेक्षा आम्ही काही लोकांनी एकत्र येत दहा रुपयांत सकस अन्न देण्याचा उपक्रम सुरू केला आहे़ नगरकरांनाही या उपक्रमात सहभागी व्हावे़ आपले वाढदिवस किंवा संस्मरणाच्या क्षणी या केंद्राला मदतीचा हात देवून ते या सेवेच्या विस्तारात योगदान द्यावे़ 
-महावीर कांकरिया, सदस्य- हेल्पिंग हॅण्डस फॉर हंगर्स ग्रुप.


 

Web Title: Minimum 10 rupees meals in the city: 5 people avail this service daily

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.