Mental illnesses increasing daily; Companies also deny insurance protection |  दिवसागणिक वाढताहेत मानसिक रुग्ण; कंपन्याही नाकारतात विमा संरक्षण

 दिवसागणिक वाढताहेत मानसिक रुग्ण; कंपन्याही नाकारतात विमा संरक्षण

साहेबराव नरसाळे / 
अहमदनगर : मानसिक रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, जिल्हा रुग्णालयात रोज सुमारे ६० ते ७० रुग्ण उपचारासाठी येतात. तर खासगी दवाखान्यांमध्ये हा आकडा शेकड्यात असल्याचे सांगण्यात येते. मानसिक आजारांवरील महागड्या उपचारांवर लाखो रुपये खर्च होत आहेत. मात्र, आरोग्य विमा कंपन्यांनी मानसिक आजाराला विमा संरक्षण नाकारले आहे.
मानसिक आजारांचे रुग्ण वाढत आहेत. मानसिक आजारांवरील उपचारपद्धती ही दीर्घ काळाची असते. त्यामुळे त्यावरील खर्चही सामान्य कुटुंबांच्या आवाक्याबाहेर जातात. मानसिक आजारांमध्ये नैराश्य व चिंतारोग हे प्रामुख्याने आढळून येतात.  कॅन्सर, मधुमेह, रक्तदाब असे आजार असलेल्या रुग्णांमध्ये नैराश्याचे प्रमाण अधिक आढळून येते. स्किझोफ्रेनिया, बायपोलर, ओसीडी या विकारांनी ग्रस्त रुग्णांची संख्याही वाढत आहे. स्किझोफ्रेनिया रुग्णांमध्ये संशयी वृत्ती वाढीस लागते. बाळंतीण महिलांच्या मनात सातत्याने भीती दाटून येते. यामुळे काही प्रसंगात असे रुग्ण अगदी टोकाची पावले उचलतात.
 एखाद्यावर हल्ला करणे, जीव घेणे असे प्रकार घडतात. तर काही रुग्ण घराबाहेर पडायला घाबरतात. यातून मानसिक प्रकृती अधिक ढासळते, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. बायपोलर या आजारात रुग्ण काही आठवडे किंवा महिने नैराश्यात तर काही आठवडे किंवा महिने संबंधित रुग्ण हर्षवायू झाल्यासारखा वावरतो. त्याच्या मनात अचाट कल्पना येत राहतात आणि काहीतरी तो अद्भूत असल्यासारखे बरळतो. 
सध्या नैराशातून होणा-या आत्महत्या हा सरकार व सर्वांपुढील मोठा गहन प्रश्न आहे. सतत आत्महत्येचे विचार मनात घोळत असणारे अनेक रुग्णही डॉक्टरांकडे उपचारासाठी येत आहेत. या उपचारांवरील इलेक्ट्रोकन्वल्सिव्ह थेरपी म्हणजे शॉक ट्रिटमेंट हा उपचार प्रभावी मानला जातो. तसेच रिपिटेटिव्ह ट्रान्सक्रॅनिअल मॅग्नेटिक (आरटीएमएस), थीटा बर्स्ट असे विविध उपचार आहेत. काही उपचार प्रदीर्घ काळ घ्यावे लागतात. मात्र, हे सर्व उपचार खर्चिक आहेत. अनेक रुग्णांना आर्थिक चिंतेमुळे मानसिक आजार जडलेले असतात. त्याशिवाय उपचारांवरील खर्चही परवडणारा नसतो. त्यामुळे अनेकदा उपचार टाळले जातात. त्यामुळे मानसिक आजारांना आरोग्य विम्याचे संरक्षण मिळणे गरजेचे आहे. मात्र, आरोग्य विमा कंपन्या कोणत्याच पॅकेजमध्ये मानसिक आजारांचा समावेश करीत नाहीत. मानसिक आजारात ‘इंटरनेट’ची भर सध्या इंटरनेट प्रत्येकाच्या हातात आले आहे. या इंटरनेटच्या अतिवापरामुळेही मानसिक रुग्णांमध्ये वाढ होत आहे. इंटरनेटवरील विविध अ‍ॅप्लीकेशन, त्यातून वाढलेले नैराश्य आणि त्वरित उपचार न घेतल्यामुळे वाढणारी हिंसक प्रवृत्ती ही सध्या सर्वांपुढील गंभीर समस्या आहे. 

विभक्त कुटुंबपद्धती, बेरोजगारी, व्यसनाधिनता, कौटुंबिक हिंसा, स्त्रियांचे समाजातील दुय्यम स्थान, आर्थिक चिंता अशा अनेक कारणांमुळे मानसिक आजार बळावत आहेत, अशी माहिती मानसोपचार तज्ज्ञ डॉ़. अशोक कराळे यांनी दिली.

Web Title: Mental illnesses increasing daily; Companies also deny insurance protection

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.