‘मेक इन इंडिया’ कोणासाठी?

By admin | Published: October 2, 2014 11:46 PM2014-10-02T23:46:30+5:302014-10-02T23:50:06+5:30

आश्वी : खुर्चीच्या राजकारणासाठी सुरू झालेली भाऊबंदकी ही राज्याच्या हिताची नाही. तुमच्या या राजकारणाने गावपातळीवरील नेतृत्व आता संपवले आहे.

'Make in India' for whom? | ‘मेक इन इंडिया’ कोणासाठी?

‘मेक इन इंडिया’ कोणासाठी?

Next

आश्वी : खुर्चीच्या राजकारणासाठी सुरू झालेली भाऊबंदकी ही राज्याच्या हिताची नाही. तुमच्या या राजकारणाने गावपातळीवरील नेतृत्व आता संपवले आहे. या राजकारणातून महाराष्ट्र तुम्ही कुठे नेणार आहात, असा सवाल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब विखे पाटील यांनी केला. मेक इन इंडिया, मेड इन इंडियाचे वातावरण केले जात असले तरी सहकाराप्रमाणे हे उत्पादकांच्या मालकीचे असले पाहिजे, असे ठाम मत त्यांनी व्यक्त केले.
शिर्डी विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या निवडणूक प्रचाराचा प्रारंभ श्रीक्षेत्र निझर्णेश्वर येथे करण्यात आला. त्याप्रसंगी सभेत विखे बोलत होते. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रा. श्रीकांत बेडेकर अध्यक्षस्थानी होते. यावेळी माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे, अण्णासाहेब म्हस्के, शालिनीताई विखे, डॉ. भास्करराव खर्डे, बाबासाहेब डांगे, अ‍ॅड. बापूसाहेब गुळवे, अ‍ॅड. आप्पासाहेब दिघे, अ‍ॅड. रघुनाथ बोठे, सोमनाथ नवले, डॉ. सुजय विखे पाटील, ताराचंद कोते आदी उपस्थित होते.
विखे म्हणाले की, जग घडवा, राष्ट्र घडवा असा नारा दिला जात आहे. मात्र समाज एकसंघ ठेवण्याचे काम महाराष्ट्रातीलच फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचारांनी केले. तो विचार आज गरजेपुरता वापरला जातो. राजकारणापायी सामाजिक जीवन उद्ध्वस्त करण्याचे काम होत आहे. भाऊबंदकीतून खुर्चीसाठी सुरू झालेल्या या राजकारणातून महारष्ट्र खड्ड्यात घालणार का? असा प्रश्न त्यांनी केला. पद्मश्रींनी सहकार चळवळ जोपासताना संकुचीतपणा ठेवला नाही. त्यामुळेच शेतकऱ्यांच्या उत्पादनाला शेतातच भाव मिळाला.
निळवंडे धरणाबाबत नेहमीच चर्चा होते मात्र हा इतिहास समजून घेण्याची गरज आहे. कालव्यांची कामे आपणच पूर्ण करणार आहोत. सर्वात प्रथम अकोले तालुक्याने बंदिस्त जलवाहिनीतून पाण्याची मागणी केली. जमिनी वाचवण्याचा त्यांचा विचार होता. या मागणीला पाठिंबा देत पिचडांबरोबर राहण्याची भूमिका घेतली. केवळ गैरसमज पसरवू नका असे सूचित करून विखे म्हणाले की, सत्तेपेक्षा सेवा आणि जनहिताला आम्ही प्राधान्य दिले. सध्या सत्तेसाठी हपापलेली माणसे केवळ लबाडांचे रक्षण करण्यासाठी एकमेकांचा पानउतारा करीत राज्यात फिरत आहेत.
राधाकृष्ण विखे म्हणाले की, मतदारसंघात सामाजिक न्यायतत्त्वाने आपण बंधूभाव जोपासला त्यामुळेच या मतदारसंघात कुठे जातीय दंगली झाल्या नाहीत. विकासाचा अजेंडा हा सर्वांसाठी लाभल्यानेच या तालुक्याचा मानवी विकास निर्देशांक हा सर्वात उच्च राहिला. राज्यात पुन्हा विजेच्या संकटाने डोके वर काढले आहे. वाढते भारनियमन हे जाणीवपूर्वक केले जात आहे का, असा प्रश्न निर्माण होऊ लागला आहे. लोकसभा निवडणुकीच्या वेळी ही असेच षडयंत्र रचले गेले. या पाठीमागे कोण आहे, याचा विचार करा, असे आवाहन करून राज्यात काँग्रेसचीच सत्ता पुन्हा येणार, असा दावा विखे यांनी केला.
प्रारंभी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी रॅली काढून विखे यांचे स्वागत केले. (वार्ताहर)

Web Title: 'Make in India' for whom?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.