अपहरण करून पत्रकाराची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2021 04:22 AM2021-04-08T04:22:00+5:302021-04-08T04:22:00+5:30

राहुरी : पत्रकार व माहिती अधिकार कार्यकर्ते रोहिदास राधुजी दातीर यांची अपहरणानंतर हत्या झाल्याची बाब समोर आली आहे. त्यांचा ...

Journalist kidnapped and killed | अपहरण करून पत्रकाराची हत्या

अपहरण करून पत्रकाराची हत्या

Next

राहुरी : पत्रकार व माहिती अधिकार कार्यकर्ते रोहिदास राधुजी दातीर यांची अपहरणानंतर हत्या झाल्याची बाब समोर आली आहे. त्यांचा मृतदेह मंगळवारी रात्री शहरातील रोटरी ब्लड बँक परिसरात आढळून आला. दरम्यान, पोलिसांनी चार संशयिताना ताब्यात घेतले असून, त्यांची कसून चौकशी सुरू आहे.

दातीर (वय ४८, रा. उंडे वस्ती, राहुरी) हे मंगळवारी दुपारी त्यांच्या दुचाकीवरून (एमएच १२, जेएच ४०६३) राहुरी शहरातील मल्हारवाडी रोडने आपल्या घरी जात होते. ते सातपीर बाबा दर्गा ते पाटाच्या दरम्यान असताना स्कॉर्पिओतून आलेल्या अज्ञातांनी त्यांना जबरदस्तीने गाडीत बसवून मल्हारवाडीच्या दिशेने पळवून नेले. यावेळी त्यांची दुचाकी व पायातील चप्पल घटनास्थळी आढळून आली. घटनेची माहिती मिळताच त्यांच्या पत्नीने त्यांना मोबाइलवर संपर्क केला असता मोबाइल बंद होता.

पोलिसांना खबर मिळताच पोलीस उपनिरीक्षक गणेश शेळके व नीलेशकुमार वाघ हे फौजफाटा घेऊन त्यांचा शोध घेत होते. त्यांची पत्नी सविता दातीर यांच्या फिर्यादीवरून राहुरी पोलिसांत अज्ञातांवर अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता; मात्र दिवसभर त्यांचा काही शोध लागला नव्हता. मंगळवारी रात्री ९ ते १० वाजेदरम्यान त्यांचा मृतदेह राहुरी शहरातील काॅलेज रस्त्याला असलेल्या रोटरी ब्लड बँकेजवळील मोकळ्या प्लाॅटमध्ये आढळून आला.

दातीर यांचे अपहरण करणाऱ्या अज्ञात लोकांनी त्यांना बेदम मारहाण करून त्यांचा निर्घृणपणे खून केला असल्याचे पोलिसांनी सांगितले. घटनेची माहिती मिळताच संगमनेर येथील उपअधीक्षक राहुल मदने, राहुरीचे पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ, संगमनेर येथील पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख, शनिशिंगणापूर पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक सचिन बागुल, राहुरीचे पोलीस उपनिरीक्षक गणेश शेळके, नीलेशकुमार वाघ, नीरज बोकिल, श्रीरामपूर येथील पोलीस निरीक्षक सानप, अहमदनगर येथील श्वानपथक, ठसेतज्ज्ञ असा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला होता. अपहरण करताना वापरण्यात आलेले वाहन कान्हू मोरे यांच्या मालकीचे असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

...........

संशयिताना घेतले ताब्यात

पोलिसांनी चार संशयिताना ताब्यात घेतले आहे. आरोपींना लवकरच अटक करण्यात येईल, अशी माहिती उपअधीक्षक राहुल मदने यांनी दिली. हत्या का करण्यात आली ही माहिती अद्याप समोर आलेली नाही.

............

हत्येची दुसरी घटना

अगोदर अपहरण व नंतर हत्या असा दुसरा गुन्हा महिनभरातच जिल्ह्यात घडला आहे. गत महिन्यात श्रीरामपूर तालुक्यात बेलापूर येथे व्यापारी गौतम हिरण यांचे अपहरण करून हत्या करण्यात आली. ती घटना ताजी असताना दुसरेही तसेच प्रकरण समोर आले आहे.

Web Title: Journalist kidnapped and killed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.