It is a crime to be silent on drought - Nana Patekar | दुष्काळावर शांत राहणे हा गुन्हा - नाना पाटेकर
दुष्काळावर शांत राहणे हा गुन्हा - नाना पाटेकर
ऑनलाइन लोकमत - 
अहमदनगर, दि. १५ - 'दुष्काळावर सरकारला प्रश्न विचारण्याची गरज आहे, यावर शांत राहणे हा गुन्हा असल्याचं', अभिनेते नाना पाटेकर बोलले आहेत. 'दुष्कळामुळे मोठ्या प्रमाणात शहरांच्या दिशेने स्थलांतर होत आहे. मला सर्वांना सांगायचं आहे जर कोणी तुमच्या गाडीची काच ठोठावत असेल तर त्यांना भिकारी म्हणून वागणूक देऊ नका, ते शेतकरी आहेत. त्यांना मदतीची गरज आहे. त्यांना अन्न, पाणी आणि शौचालयांची सुविधा हवी आहे. आपण प्रत्येकजण एका व्यक्तीची जबाबदारी घेऊया. त्यात जास्त अवघड असं काही नाही आहे', असं भावनिक आवाहनही नाना पाटेकर यांनी केलं आहे. 
 
एनडीटीव्हीला दिलेल्या मुलाखतीत नाना पाटेकर यांनी दुष्काळामुळे राज्यासमोर उभ्या राहिलेल्या पाणी संकटावर चर्चा केली. महाराष्ट्राने आयपीएल सामन्यांचं आयोजन करण्याची गरज नव्हती, असं मत नाना पाटेकरांनी व्यक्त केलं आहे. पाणी वाचवण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाने आयपीएल सामने महाराष्ट्राबाहेर खेळवण्याचे आदेश दिलेल्या निर्णयाचं स्वागत करत यामुळे जास्त फरक पडणार नाही असंदेखील नाना पाटेकर बोलले आहेत. 'आयपीएल सामने नसले तरी त्यांना खेळपट्टी व्यवस्थित ठेवण्यासाठी पाण्याचा वापर करावा लागणार नाही का ? पण हा भावनिक विषय आहे. लोक मरत असताना आपण आनंद कसा काय साजरा करायचा ?', असा प्रश्न नाना पाटेकरांनी उपस्थित केला.
  
'लातूरला पाणी घेऊन रेल्वे पाठवण्यात आली. पण आपण याअगोदर काही उपाय केले होते का ? पुढील दोन महिने परिस्थिती भयानक असणार आहे. आपण अगोदरच उपाय केले असते तर रेल्वेने पाणी पाठवण्याची गरज लागली नसती. लोकांचा आणि राजकारण्यांचा पराभव झाल्याने आपलाही पराभव झाला आहे', असं नाना पाटेकर बोलले आहेत. 
'लोकांना काळजी आहे पण त्यांना हे सुरुवातीला जाणवलं नाही. लोकांनी मराठवड्याला येऊन परिस्थिती पाहण्याची गरज आहे. आपल्या व्यवस्थेला प्रश्न विचारण्याची गरज आहे. शांत राहणे हा गुन्हा आहे. लोक मरताना आपल्याला दिसत नाहीत, आपण आंधळे आहोत का ? जर ती आपली लोक नाहीत तर मग त्यांच्याकडे कोणी लक्ष द्यायचं ?', असा परखड सवाल नाना पाटेकरांनी उपस्थित केला आहे. 
 
यावेळी बोलताना नाना पाटेकर यांनी सनसनाटी बातम्या प्रसिद्ध करणा-या प्रसारमाध्यमांवरही टीका केली. प्रत्युषा बॅनर्जीने आत्महत्या केली याचं दुख:, मात्र प्रत्येक दिवशी तिची बातमी पहिल्या पानावर असण्याची गरज आहे का ? इंद्राणी मुखर्जीने किती वेळा लग्न केलं यामध्ये कोणाला रस आहे ? वृत्तपत्र वाचण्याचा आता मला तिरस्कार येऊ लागला आहे असं नाना पाटेकर बोलले आहेत. 
 
Web Title: It is a crime to be silent on drought - Nana Patekar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.