The husband killed his wife | पतीनेच केला पत्नीचा खून

पतीनेच केला पत्नीचा खून

टाकळी ढोकेश्वर : पारनेर तालुक्यातील धोत्रे बुद्रुक येथील पाइनच्या तलावात आढळलेल्या महिलेच्या खुनाचे रहस्य उलगडण्यात पोलीस प्रशासनाला यश मिळाले. त्या महिलेचा पतीनेच खून करून मृतदेहाला दगड बांधून तलावात टाकून दिल्याचे तपासातून पुढे आले.

नंदा पोपट जाधव (वय २४, रा. चौधरीवाडी, ढवळपुरी, ता. पारनेर), असे मृत महिलेचे नाव आहे. पोपट मारुती जाधव (रा. चौधरीवाडी, ढवळपुरी, ता. पारनेर) असे आरोपी पतीचे नाव असून त्याला पोलिसांनी अटक केली आहे.

धोत्रे बुद्रुक येथील तलावात ३ एप्रिल रोजी एका अनोळखी स्त्रीचे प्रेत कुजलेल्या अवस्थेत आढळले होते. याबाबत पोपट पंजाब गांगुर्डे यांनी पारनेर पोलीस ठाण्यात खबर दिली होती. मृतदेहाला दगड बांधलेला होता. त्यामुळे घातपाताचा संशय व्यक्त करत पोलीस प्रशासनाने त्या दिशेने तपास सुरू केला. मयताचे फोटो काढून पोलीस पथक तयार करण्यात आले होते. चौधरीवाडी-ढवळपुरी येथील एक महिला तीन ते चार दिवसांपासून बेपत्ता असल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यांनी महिलेचा मृतदेह नातेवाइकांना दाखविला. त्यांनी हा मृतदेह नंदा पोपट जाधव यांचा असल्याचे सांगितले. त्यानंतर, म्हैसगाव (ता. राहुरी) येथील मयताचा भाऊ सुरेश सीताराम केदार यांच्या फिर्यादीवरून पारनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी अधिक तपास केला असता २९ मार्च रोजी नंदा जाधव व पती पोपट जाधव या दोघांमध्ये वाद झाला होता. त्यातून त्यांचे भांडणही झाले होते. त्यावेळी पतीने पत्नीला मारहाणही केल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी पोपट जाधव याला पोलीस ठाण्यात आणून त्याची चौकशी केली. सुरुवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र, त्यानंतर पोलिसांनी त्याला विश्वासात घेऊन विचारपूस केली. त्याने पत्नीचा खून केल्याचे कबूल केले.

पुढील तपास पोलीस निरीक्षक घनश्याम बळप यांच्या मार्गदर्शनाखाली प्रमोद वाघ, सत्यजी शिंदे, सुरज कदम करत आहेत.

---

दुचाकीहून नेला मृतदेह...

पोपट जाधव याने ढवळपुरी येथे पत्नी नंदा जाधव हिचा २९ मार्च रोजी रात्री साडेदहा वाजता खून केला. ३० मार्चला पहाटे ५ च्या सुमारास मृतदेह दुचाकीवर बांधला. दुचाकीवरून हा मृतदेह धोत्रे बुद्रुक येथील पाइनच्या तलावाजवळ आणला. मृतदेह पाण्यावर तरंगू नये, यासाठी त्याने मृतदेहाला दोरीच्या साहाय्याने दगड बांधला. त्यानंतर मृतदेह पाण्यात टाकला होता.

Web Title: The husband killed his wife

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.