The headless torso of a woman was found in Shevgaon | शेवगावात आढळले महिलेचे शिर नसलेले धड

शेवगावात आढळले महिलेचे शिर नसलेले धड

शेवगाव : शहरातील पाथर्डी रस्त्यावरील आयटीआयशेजारील ईदगाह मैदानात शिर नसलेला एका साठवर्षीय अज्ञात महिलेचा, तर कवटी फुटलेला एका १४ वर्षीय अज्ञात मुलाचा मृतदेह रविवारी आढळून आला.

शहरात आयटीआयशेजारी असलेल्या नवीन ईदगाह मैदानात रविवारी दुपारच्या सुमारास दोन अनोळखी मृतदेह आढळून आले. त्यात शिर नसलेला व डावा हात कोपरापासून नसलेल्या एका साठ वर्षांच्या महिलेचा तर डोक्याची कवटी फुटलेल्या एका १४ वर्षांच्या मुलाचा मृतदेह आढळून आला. याबाबत दुपारी दोनच्या सुमारास पोलिसांना निनावी व्यक्तीने फोनवर संपर्क साधून याची माहिती दिली.

घटनेची माहिती मिळताच सहायक पोलीस निरीक्षक सुजित ठाकरे, विश्वास पाबरा, पो. कॉ. रवी शेळके, सुधाकर दराडे, अच्युत चव्हाण, अनमोल चन्ने, दिलीप राठोड हे घटनास्थळी दाखल झाले.

महिलेचा शिर नसलेला मृतदेह तेथे होता. महिलेचे शिर आजूबाजूला शोध घेत असतानाच साधारण ८० फुटांवर झुडपात मुलाचा मृतदेह पोलिसांना आढळून आला. त्याच्या अंगावर निळ्या रगांची जिन्स पँट व निळसर रंगाचा शर्ट होता. ते दोघे ईदगाह मैदानावर उघड्यावरच राहत असल्याचे समजते.

तेथे असलेल्या एका पत्र्याच्या पेटीत पिवळ्या धातूचे मोठी घुंगरे, घंटा, संसारोपयोगी वस्तू अस्ताव्यस्त पडलेल्या आढळून आल्या. दुपारी साडेचार वाजता श्वानपथक घटनास्थळी दाखल झाले. मात्र श्वान जागेवरच घुटमळल्याने माग निघू शकला नाही. घटनास्थळापासून काही फुटांच्या अंतरावर वाहनाच्या टायर खुनापर्यंत श्वानाने माग काढला व ते तेथेच थांबले. आरोपी वाहनातून पसार झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला.

मृतांचे मृतदेह विच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी शवविच्छेदन प्रवरानगर येथील रुग्णालयात केले जाणार असल्याचे सांगितले.

फोटो : २४ शेवगाव क्राइम

शेवगाव येथील नवीन ईदगाह मैदानात दोन मृतदेह आढळल्यानंतर घटनास्थळी श्वानपथकाला आणण्यात आले होते.

Web Title: The headless torso of a woman was found in Shevgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.