शाळा खोल्यांसाठी राज्य स्तरावर पाठपुरावा करु : पालकमंत्री राम शिंदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2018 05:48 PM2018-09-05T17:48:49+5:302018-09-05T17:48:54+5:30

जिल्हा परिषदेच्या शाळा खोल्यांसाठी निधी आणि शिक्षकांची रिक्त पदे भरण्याबाबत राज्य स्तरावर पाठपुरावा केला जाईल, असे प्रतिपादन पालकमंत्री राम शिंदे यांनी केले.

Follow up on the state level for school rooms: Guardian Minister Ram Shinde | शाळा खोल्यांसाठी राज्य स्तरावर पाठपुरावा करु : पालकमंत्री राम शिंदे

शाळा खोल्यांसाठी राज्य स्तरावर पाठपुरावा करु : पालकमंत्री राम शिंदे

Next

अहमदनगर : जिल्हा परिषदेच्या शाळा खोल्यांसाठी निधी आणि शिक्षकांची रिक्त पदे भरण्याबाबत राज्य स्तरावर पाठपुरावा केला जाईल, असे प्रतिपादन पालकमंत्री राम शिंदे यांनी केले. जिल्हा परिषदेच्या वतीने दरवर्षी दिल्या जाणा-या जिल्हा शिक्षक पुरस्काराचे वितरण पालकमंत्री शिंदे यांच्या हस्ते आज झाले. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शालिनी विखे होत्या.
पालकमंत्री शिंदे म्हणाले, उपक्रमशीलता आणि नावीन्यपूर्ण उपक्रमातून जिल्हा परिषदेने शाळांचा दर्जा उंचावला आहे. विद्यार्थ्यांप्रती असलेली येथील शिक्षकांची बांधीलकी ही कौतुकास्पद आहे. विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी सुरु असलेले उपक्रम आणि त्यासाठी येथील शिक्षक घेत असलेले प्रयत्न सर्वच ठिकाणी घेण्याची गरज आहे. चांगला माणूस घडवण्याचे काम शिक्षकांचे आहे. आता ई-लर्निंग आणि डिजीटल तंत्रज्ञानाचा जमाना आहे. त्यामुळे शहरी आणि ग्रामीण भागातील अंतर कमी झाले आहे. जिल्हा परिषदेतील विद्यार्थ्यांना या तंत्रज्ञानाचा लाभ मिळत आहे. आपला विद्यार्थी या स्पर्धात्मक युगात टिकू शकेल, असे बनविण्याचे काम शिक्षक करीत आहेत. अप्रगत विद्यार्थ्यांसाठी जादा तास, मुलांसाठी आनंदनगरी, बाळमेळा असे उपक्रम निश्चितच इतर जिल्ह्यांसाठी मार्गदर्शक आहेत. जिल्ह्यातील शाळा खोल्यांसाठी अधिक निधी उपलब्ध करुन देण्यासाठी राज्यस्तरावर पाठपुरावा करु. सध्या जिल्हा नियोजन निधीतून पुनर्विनियोजन प्रस्तावातून साडेतीन कोटी, श्री साईबाबा विश्वस्त संस्थानकडून तीस कोटीपैकी १० कोटी निधी बांधकामासाठी मिळाल्याचे त्यांनी सांगितले.
जिल्हा परिषद अध्यक्षा शालिनी विखे म्हणाल्या, जिल्हा परिषदेच्या माध्यमातून कृतिशील शिक्षण दिले जात आहे. ग्रामीण भागातील शिक्षण स्तर उंचावण्यासाठी जिल्हा परिषदेचा शिक्षण विभाग आणि सर्व शिक्षक कार्यरत आहेत. त्याचे फलित आपल्याला शिष्यवृत्ती परीक्षेत दिसून आले. शिक्षकांनी यापुढेही असेच विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी योगदान देण्याचे आवाहन केले.
यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वजीत माने, उपाध्यक्षा राजश्री घुले, महिला व बालकल्याण सभापती अनुराधा नागवडे, अर्थ व बांधकाम सभापती कैलास वाघचौरे, कृषी सभापती अजय फटांगरे, राजेश परजणे, शिवाजी गाडे, प्रभावती ढाकणे, पंचायत समिती सभापती राहुल झावरे, अनुसया होन, बाळासाहेब लटके, व्याख्याते जितेंद्र मेटकर आदींची यावेळी व्यासपीठावर उपस्थिती होती.

Web Title: Follow up on the state level for school rooms: Guardian Minister Ram Shinde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.