वखार महामंडळाच्या गोडाऊनला भीषण आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 04:23 AM2021-04-28T04:23:17+5:302021-04-28T04:23:17+5:30

संगमनेर (जि. अहमदनगर) : संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या गोडाऊनला मंगळवारी (दि. २७) रात्री ...

Fierce fire at Warehousing Corporation's godown | वखार महामंडळाच्या गोडाऊनला भीषण आग

वखार महामंडळाच्या गोडाऊनला भीषण आग

Next

संगमनेर (जि. अहमदनगर) : संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या गोडाऊनला मंगळवारी (दि. २७) रात्री पावणेनऊ वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीचे नेमके कारण समजू शकले नाही. गोडऊनमध्ये युरिया, कापूस, सोयाबीन, गहू, मका यांचा मोठा साठा होता. रात्री उशिरापर्यंत आग आटोक्यात आलेली नव्हती. महामंडळाच्या गोडाऊनला आग लागल्याचे समजताच संगमनेर नगरपरिषद, सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या अग्निशमन दलाच्या गाड्या बाजार समितीच्या आवारात दाखल झाल्या होत्या. आगीने रौद्ररूप धारण केले होते. गोडाऊनच्या चारही बाजूंनी पाण्याचा मारा करण्यात येत होता. मात्र, आग आटोक्यात येत नव्हती. घटनेची माहिती मिळताच संगमनेर तहसीलदार अमोल निकम, शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख, उपनगराध्यक्ष शैलेश कलंत्री, माजी नगराध्यक्ष विश्वास मुर्तडक, माजी नगरसेवक सोमेश्वर दिवटे, सामाजिक कार्यकर्ते भूपेश भळगट, सोमनाथ मुर्तडक हे घटनास्थळी पोहोचले. नागरिकांनी बाजार समितीत मोठी गर्दी केली होती. गर्दी हटविण्यासाठी पोलिसांना बळाचा वापर करावा लागला. आग वाढतच होती. रात्री साडेदहानंतरही आगीवर नियंत्रण मिळविण्यात अग्निशमन दलाला यश आले नव्हते. त्यामुळे अकोले, राहुरी, सिन्नर, प्रवरानगर येथील अग्निशमन गाड्यांना पाचारण करण्यात आले होते. जेसीबीच्या साहाय्याने भिंत तोडून पाण्याचा फवारा मारण्यात आला. रात्री उशिरापर्यंत ही आग आटोक्यात आलेली नव्हती. या आगीत नेमके किती नुकसान झाले, हे आग पूर्ण विझल्याशिवाय समजू शकणार नाही. मात्र, या गोडाऊनमध्ये लाखो रुपये किमतीचा साठा असल्याचे सांगण्यात येते.

Web Title: Fierce fire at Warehousing Corporation's godown

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.