अर्बन बँकेच्या लिलावात निघाले बनावट सोने; लिलाव केला स्थगित

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2020 01:03 PM2020-02-13T13:03:33+5:302020-02-13T13:03:40+5:30

अर्बन बँकेत तारण असलेल्या सोन्याच्या लिलावाची प्रक्रिया बुधवारी बँकेच्या येथील मुख्यालयात राबविण्यात आली.

Fake gold goes to Urban Bank auction | अर्बन बँकेच्या लिलावात निघाले बनावट सोने; लिलाव केला स्थगित

अर्बन बँकेच्या लिलावात निघाले बनावट सोने; लिलाव केला स्थगित

Next

अहमदनगर: अर्बन बँकेत तारण असलेल्या सोन्याच्या लिलावाची प्रक्रिया बुधवारी बँकेच्या येथील मुख्यालयात राबविण्यात आली. मात्र, सोनेतारणापोटी ठेवलेले काही सोने बनावट असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. त्यामुळे लिलावाची प्रक्रियाच थांबविण्यात आली. अर्बन बँकेवर सध्या प्रशासक आहे. बँकेच्या थकीत सोनेतारण कर्जाची वसुली करण्यासाठी या सोन्याचा बँकेने लिलाव जाहीर केला होता.

विविध शाखांतील सोन्याचा एकत्रित लिलाव होता. या लिलावासाठी बँकेने सराफ सुवर्णकार संघटनेच्या सर्व सभासदांना उपस्थित राहण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार लिलाव बोलण्यासाठी सराफ व्यावसायिकही उपस्थित होते. दुपारी तीन वाजता ही प्रक्रिया राबविण्यात आली. सुरुवातीला काही दागिन्यांचा लिलाव सुरळीत पार पडला. मात्र, शेवगाव तालुक्यातील शाखेतील सोनेतारणाच्या लिलावाच्या पिशव्या फोडण्यात आल्या त्यावेळी काही सोने बनावट असल्याचे निदर्शनास आले. अनेक पिशव्यांमध्ये असा प्रकार आढळून आला. त्यामुळे बँकेच्या अधिकाºयांनी लिलावाची पुढील प्रक्रियाच स्थगित केली. 

एकूण किती सोने बनावट आढळले व त्या कर्जाची रक्कम किती हा तपशील समजू शकला नाही. बँकेकडून याबाबत काहीही माहिती अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. यासंदर्भात माहिती घेण्यासाठी बँकेचे प्रशासक सुभाषचंद्र मिश्रा यांचेशी रात्री संपर्क साधला असता त्यांनी दूरध्वनीवर माहिती देण्यास नकार दिला. गुरुवारी यासंदर्भातील अधिकृत माहिती देऊ असे ते ‘लोकमत’ला म्हणाले. 
...............
बँकेने केलेल्या आवाहनानुसार आम्ही लिलावासाठी गेलो होतो. मात्र, शेवगाव तालुक्यातून आलेल्या सोनेतारण पिशव्यांमध्ये बनावट सोने आढळले. त्यामुळे त्या दागिन्यांबाबत कुणीही बोली लावू शकले नाही. अनेक पिशव्यांमध्ये अशाच पद्धतीने बनावट सोने आढळल्याने लिलाव थांबविण्यात आला.
- प्रकाश लोळगे, अध्यक्ष, सराफ सुवर्णकार संघटना 

Web Title: Fake gold goes to Urban Bank auction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.