उद्योजक देणार गावच्या शाळेला दहा खोल्या बांधून; साडेतीन कोटींच्या सीएसआर फंडाची तरतूद  

By चंद्रकांत शेळके | Published: March 7, 2024 07:11 PM2024-03-07T19:11:14+5:302024-03-07T19:12:36+5:30

नगर तालुक्यातील निमगाव वाघा येथील रहिवासी उद्योजक राजेंद्र शिंदे यांनी हे दातृत्व दाखवले आहे.

entrepreneur will build ten rooms for the village school Provision of CSR fund of 3.5 crores | उद्योजक देणार गावच्या शाळेला दहा खोल्या बांधून; साडेतीन कोटींच्या सीएसआर फंडाची तरतूद  

उद्योजक देणार गावच्या शाळेला दहा खोल्या बांधून; साडेतीन कोटींच्या सीएसआर फंडाची तरतूद  

अहमदनगर: जिल्हा परिषदेच्या शाळा खोल्यांची अपुरी संख्या लक्षात घेता, तसेच सामाजिक भावनेतून गावच्या शाळेसाठी तब्बल साडेतीन कोटींची मदत करण्याचा निर्णय निमगाव वाघा येथील उद्योजकाने घेतला आहे. या पैशातून गावातील जिल्हा परिषद शाळेला १० वर्ग खोल्या, सुसज्ज ग्रंथालय, सभागृह व मैदान विकसित केले जाणार आहे.

नगर तालुक्यातील निमगाव वाघा येथील रहिवासी उद्योजक राजेंद्र शिंदे यांनी हे दातृत्व दाखवले आहे. ते पुण्यातील पीआरएम सॉफ्ट सोल्युशन्स प्रा. लि.चे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. त्यांनीही याच जिल्हा परिषद शाळेतून शिक्षण घेतले आहे. याच सामाजिक भावनेतून त्यांनी गावातील शाळा विकसित करण्याचा ध्यास घेतला आहे. मंगळवारी (दि. ५) या शाळेच्या वर्गखोल्यांचे भूमिपूजन पद्मश्री पोपटराव पवार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी लांगोरे, उपवनसंरक्षक संतोष रास्ते, जि. प.चे लेखाधिकारी रमेश कासार, उपवनसंरक्षक सुवर्णा माने, सरपंच लता फलके, खासेराव शितोळे, गटशिक्षण अधिकारी बाबूराव जाधव, संजय कळमकर, डॉ. सुनील गंधे, संजय धामणे, युवराज कार्ले, अरुण फलके, भरत फलके, साहेबराव बोडखे, अरुण कापसे, अनिल डोंगरे आदी उपस्थित होते.

शिक्षण विभागासाठी शासनाकडून निधीची तरतूद होते; मात्र ती अपुरी असते. इतर सोयीसुविधांसाठी निधीची तरतूद नाही. त्यामुळे जिल्हा परिषदेने मिशन आपुलकी उपक्रम सुरू केला असून, आतापर्यंत सामाजिक भावनेतून या उपक्रमास दानशूरांनी २५ कोटींपर्यंत मदतीचा हात दिला आहे. निमगाव वाघा येथे जिल्हा परिषदेची चौथीपर्यंत शाळा असून, वर्गखोल्या जुन्या झाल्या आहेत. शाळांची ही अवस्था पाहिल्यानंतर याच गावचे भूमिपूत्र उद्योजक राजेंद्र शिंदे यांनी संपूर्ण शाळाच बांधून देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी आपल्या कंपनीच्या सीएसआर फंडातून त्यांनी साडेतीन कोटी रुपये निधी देण्याचे मान्य केले आहे. शाळा खोल्यांचे भूमिपूजन झाले असून, वर्षभरात पुण्यातील वाबळेवाडीच्या धर्तीवर ही सुसज्ज सभागृह असलेली जिल्ह्यातील पहिली जिल्हा परिषदेची शाळा वर्षभरात उभी राहणार आहे.
 
उद्योजक राजेंद्र शिंदे यांनी शाळा बाह्यअंगाने विकसित करण्याचे ठरवले आहे. आता शिक्षकांनी गुणवत्तेत वाढ करून शाळा अंतरंगाने सुधारावी. -पद्मश्री पोपटराव पवार
 
आपणास ज्या समाजाने घडवले, त्या समाजाप्रति उतराई म्हणून प्रत्येकाने खारीचा वाटा उचलला पाहिजे. शिंदे यांनी जिल्हा परिषद शाळेप्रति दाखवलेले दातृत्व इतरांसाठी आदर्शवत आहे. -आशिष येरेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी, जि. प.
 
ज्या शाळेने मला घडवले, त्या शाळेतून आदर्श विद्यार्थी घडावेत, त्यांनी शाळेचे, गावाचे नाव देशपातळीवर न्यावे, या हेतूने ही मदत करत आहे. मुलांनी आपली गुणवत्ता सिद्ध करून शाळेचा नावलौकिक वाढवावा. - राजेंद्र शिंदे, उद्योजक
 
ही आहेत शाळेची वैशिष्ट्ये

  • आरसीसी तळ आणि पहिल्या मजल्यावर १० शाळा खोल्या.
  • एकूण बांधकाम क्षेत्रफळ : १४ हजार ५६९ चौरस फूट
  • मुलांसाठी भव्य स्वयंपाकगृह.
  • सुसज्ज ग्रंथालय, डिजिटल क्लासरूम
  • मुख्याध्यापक केबिनसह सर्व सुविधांसह कार्यालय
  • मीटिंग हॉल, स्टाफ रूम, दोन खोल्यांसह २६० आसनक्षमतेचे सभागृह.
  • मुला-मुलींना स्वतंत्र स्वच्छतागृह. भव्य मैदान (कुंपनासह)

 
मिशन आपुलकीने उभा केले २५ कोटी
जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी लांगोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षा अभियानचे लेखाधिकारी रमेश कासार व त्यांच्या टीमने गेल्या दोन वर्षांपासून मिशन आपुलकी हा उपक्रम सुरू केला असून, या माध्यमातून शाळांसाठी मोठी मदत उभी राहत आहे. माजी विद्यार्थी, दानशूर गावकरी आपल्या जिल्हा परिषद शाळेप्रती आपुलकी दाखवून शालेय साहित्यापासून थेट शाळा खोल्या बांधून देण्यापर्यंत मदतीचा हात पुढे करत आहेत. आतापर्यंत २५ कोटींहून अधिकची मदत या उपक्रमातून उभी राहिलेली आहे. राज्यासाठी हे एक आदर्शवत अभियान ठरत आहे.

Web Title: entrepreneur will build ten rooms for the village school Provision of CSR fund of 3.5 crores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.