ढगाळ वातावरणामुळे पिकांवर रोग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2021 04:25 AM2021-02-17T04:25:42+5:302021-02-17T04:25:42+5:30

केडगाव : यंदाच्या मोसमात गेल्या दहा वर्षांच्या तुलनेत सर्वाधिक पाऊस होऊनही शेतकऱ्यांसमोरील अडचणीचे ढग निवळण्याचे नाव घेत नाही. अतिवृष्टीने ...

Diseases on crops due to cloudy weather | ढगाळ वातावरणामुळे पिकांवर रोग

ढगाळ वातावरणामुळे पिकांवर रोग

Next

केडगाव : यंदाच्या मोसमात गेल्या दहा वर्षांच्या तुलनेत सर्वाधिक पाऊस होऊनही शेतकऱ्यांसमोरील अडचणीचे ढग निवळण्याचे नाव घेत नाही. अतिवृष्टीने शेतीमाल सडला. नंतर रोगराईने उत्पन्नाच्या आशाही धुळीस मिळाल्या. गेल्या दोन दिवसांपासून तालुक्यात पुन्हा ढगाळ वातावरण तयार झाले आहे. अवकाळी पावसाचा अंदाजही वर्तविण्यात आला आहे. यामुळे शेतकरी चिंताग्रस्त बनला आहे.

दुष्काळी नगर तालुक्यात रब्बी हंगामात एक लाख हेक्टर क्षेत्रावर रब्बीचे उत्पादन घेतले जाते. कायमस्वरूपी दुष्काळाशी सामना करणाऱ्या नगर तालुक्यातील शेतकऱ्यांना यावर्षी सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्याने मोठा आनंद झाला. पाणी टंचाई हटणार, उत्पादन वाढणार अशी आशा शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाल्या. मात्र अतिपाऊस, रोगराई, विजेच्या खेळखंडोब्यामुळे शेतकऱ्यांच्या आशेवर पाणी फिरले. अतिपावसाने खरीप पिकांना मोठा फटका बसला. पावसामुळे शेत उपाळल्याने कांदा रोपे, भाजीपाला, सोयाबीन, बाजरी, कापूस, भुईमूग, मूग आदी पिके शेतातच सडली. त्यामुळे खरीप पिकांसाठी केलेला खर्च पाण्यात गेल्याने शेतकऱ्यांना मोठी आर्थिक झळ बसली

...

विजेचा खेळखंडोबा सुरूच

नगर तालुक्यातील पिके महावितरणच्या गलथान कारभारामुळे पाण्याअभावी वाया जाण्याची शक्यता वाढली आहे. तालुक्यात यावर्षी मुबलक पाणी आहे. मात्र गावोगावी वीज रोहित्र नादुरुस्त होत आहेत. नादुरुस्त रोहित्र बदलण्यास महावितरणचे कर्मचारी टाळाटाळ करत आहेत. अनेक ठिकाणी थकबाकीसाठी वीजपुरवठा खंडित केला जात आहे. थकबाकी वसुलीसाठी महावितरणकडून शेतकऱ्यांची पिळवणूक होत आहे. सतत नादुरुस्त होणाऱ्या वीज रोहित्रामुळे पाणी असूनही पाण्याअभावी शेत पिके जळण्याच्या मार्गावर आहेत. जळणारी पिके पाहवत नसल्याने शेतकऱ्यांकडून डिझेल इंजिनचा पिकांना पाणी देण्यासाठी वापर केला जात आहे. वाढलेले डिझेलचे दर शेतकऱ्यांना परवडणारे नाहीत.

....

फळांचीही गळ वाढली

संत्रा, मोसंबी, डाळिंब, आंबा फळांना सततच्या ढगाळ हवामानाचा फटका बसत आहे. फळे गळून पडण्याचे प्रमाण वाढले आहे. यामुळे उत्पादन घटण्याची चिन्हे आहेत.

....

पाऊस चांगला होऊनही शेतकऱ्यांसमोरील संकट दूर होत नाही. अति पावसाने पीक मातीमोल झाली. रब्बीतील पिकांना रोगाने ग्रासले. त्यात भर म्हणून विजेचे संकट निर्माण झाले आहे. वारंवार रोहित्र जळत आहे. जळालेले रोहित्र महावितरण वेळेवर दुरुस्त करून देत नाही. पाणी मुबलक आहे, पण वीज नाही. शेतकरी नादुरूस्त रोहित्र बदलण्याची मागणी महावितरणकडे करत आहेत.

-तुकाराम लांडगे, शेतकरी, सारोळा बद्धी, नगर तालुका.

Web Title: Diseases on crops due to cloudy weather

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.