Death of a retired soldier who was beaten | मारहाण झालेल्या सेवानिवृत्त सैनिकाचा मृत्यू

मारहाण झालेल्या सेवानिवृत्त सैनिकाचा मृत्यू

पाथर्डी : तालुक्यातील टाकळी फाटा येथे शुक्रवारी (दि.९) हॉटेल साईप्रेमसमोरील वाहन बाजूला लावण्याच्या वादातून झालेल्या मारहाणीत सेवानिवृत्त सैनिकाचा शनिवारी (दि.१०) सकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी पाथर्डी पोलीस ठाण्यात नऊ जणांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे.

विश्वनाथ कारभारी फुंदे (वय ४१, फुंदेटाकळी, रा.पाथर्डी) असे मृत्यू झालेल्या माजी सैनिकाचे नाव आहे.

विश्वनाथ फुंदे हे शुक्रवारी सकाळी ८.३० वाजता त्यांच्या साईप्रेम हॉटेल येथे होते. त्यावेळी सुधीर संभाजी शिरसाट याने त्याचे वाहन हॉटेलसमोर लावलेले होते. विश्वनाथ फुंदे यांनी हॉटेल समोरून वाहन दुसरीकडे लावा, असे शिरसाट यांना सांगितले. याचा राग शिरसाट याला आला. त्याने त्याच्या आठ साथीदारांना बोलावून घेऊन विश्वनाथ फुंदे यांना लोखंडी पाइप व रॉड, लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यांना बळजबरीने चारचाकी वाहनातून दुसरीकडे नेले. बाहेर नेऊन त्यांना दारू पाजली. पाथर्डी येथील तिलोक जैन शाळेच्या पाठीमागे नेऊन शिवीगाळ करून पुन्हा लोखंडी पाइप, रॉडने मारहाण केली. ते गंभीर जखमी झाल्याने उपचारादरम्यान मृत्यू झाला, असे फिर्यादीत म्हटले आहे. मयताचे भाऊ मच्छिंद्र कारभारी फुंदे (रा.फुंदेटाकळी) यांच्या फिर्यादीवरून सुधीर संभाजी शिरसाटसह आठ जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Death of a retired soldier who was beaten

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.