Dasakriya ritual performed in front of Municipal Office for protest | निषेधासाठी महावितरणच्या कार्यालयासमोरच केला दशक्रिया विधी
निषेधासाठी महावितरणच्या कार्यालयासमोरच केला दशक्रिया विधी

      अहमदनगर : श्रीगोंद्यातील तरुण शेतकरी संदेश अनिल आढाव (वय १७, रा.सारोळा सोमवंशी, ता.श्रीगोंदा) याच्या दशक्रियाविधीचा कार्यक्रम त्यांच्या कुटुंबीयांनी महावितरणाच्याअहमदनगरमधील मुख्य कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर सोमवारी सकाळी केला. 
प्रहार संघटनेच्या नेतृत्वाखाली हा विधी कार्यक्रम झाला. या विधी कार्यक्रमामुळे महावितरणाच्या अहमदनगर जिल्ह्यातील गलथान कारभाराचा विषय चर्चेत आला आहे. मयत संदेशचे वडील अनिल आढाव व त्यांचे कुटुंब हे शेतकरी आहेत. सारोळा सोमवंशी येथे घटनेच्या ३ नोव्हेंबरला दुपारी साडेतीन वाजता आढाव कुटुंब शेतात गवत आणण्यासाठी गेले होते. घरी येत असताना शेतात पडलेल्या विद्युत तारेचा शॉक संदेशला लागला होता. संदेशला वाचविण्यासाठी त्याची बहीण प्रतीक्षा हे देखील पुढे सरसावली होती. हे दोघे तारेच्या विद्युत प्रवाहाशी चिकटलेले असताना त्यांना वाचविण्यासाठी संदेश आणि प्रतिक्षाची आई रोहिणी धावल्या. त्यांनाही शॉक बसला. रोहिणी यांनी धाडस व प्रसंगावधान दाखवून हाताला कपडा गुंडाळून प्रतिक्षाला सुरूवातीला तारेला चिकटलेल्या संदेशपासून वेगळे केले. त्यानंतर प्रतीक्षा बेशुद्ध पडली होती. तर संदेश याचा जागीच मृत्यू झाला होता.
वीज खांबावरील विद्युत तार शेतात पडली असल्याची माहिती देऊनही त्याची दुरूस्ती झाली नाही. घटनेच्या दुसºया दिवशीही विद्युत तारा शेतात तशाच पडून होत्या. त्यातून विद्युत प्रवाह चालू होता. या घटनेचा निषेध म्हणून आढाव कुटुंबीयांनी सोमवारी महावितरणच्या अहमदनगरमधील मुख्य कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर संदेश याच्या दशक्रिया विधीचा कार्यक्रम घेतला. या कार्यक्रमात श्रीगोंद्यातील सारोळा सोमवंशी येथील गावकरी मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. प्रवचनकार अजय बारस्कर महाराज, माजी महापौर अभिषेक कळमकर, प्रहारचे जिल्हाध्यक्ष विनोद परदेशी, अजित धस, प्रकाश बेरड, विजू बाळू भंडारी, कृष्णाभाऊ खांबकर, वामन बधे, सत्यवान शिंदे, संतोष गायकवाड, विजू बापू भंडारी आदी यावेळी उपस्थित होते.
पोलीस बंदोबस्तात विधी
संदेशच्या दशक्रिया विधीला होणारे सर्व विधी यावेळी अहमदनगर येथील महावितरणच्या मुख्य कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर करण्यात आले. हा प्रकार पाहण्यासाठी महावितरण कार्यालयात आलेले ग्राहक आणि कार्यालयातील अधिकाºयांनी प्रवेशद्वारावर गर्दी केली होती. विधी कार्यक्रमात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त होता. 
 

Web Title: Dasakriya ritual performed in front of Municipal Office for protest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.