Crisis of unseasonal rains including corona on the district | जिल्ह्यावर कोरोनासह अवकाळी पावसाचेही संकट

जिल्ह्यावर कोरोनासह अवकाळी पावसाचेही संकट

अहमदनगर : सध्या जिल्ह्यात कोरोना कहर सुरू असतानाच शनिवारी सायंकाळी अवकाळी पावसाचेही संकट आले. नगर शहरासह श्रीगोंदा, राहाता, पारनेर, कोपरगाव तालुक्यांत वादळासह पाऊस झाला. अचानक आलेल्या पावसाने काही ठिकाणी कांदा भिजला, तर आंब्याच्या कैऱ्यांचा सडा पडला. महिनाभरात अवकाळीचा शेतकऱ्यांना दुसऱ्यांदा तडाखा बसला.

जवळपास महिनाभरापासून जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. त्यामुळे व्यवसायांवर अनेक निर्बंध आले आहेत. त्यातच गेल्या दोन ते तीन दिवसांपासून वातावरणात कमालीचा बदल झाला आहे. सकाळी व सायंकाळी काहीसे ढगाळ वातावरण राहत होते. हवामान विभागानेही १०, ११ एप्रिलला अवकाळी पावसाचा अंदाज व्यक्त केला होता.

वातावरणातील उष्माही प्रचंड वाढला होता. शनिवारी दुपारपासूनच उष्मा अधिक जाणवत होता. ढगाळ वातावरण व वाराही वाहू लागला. सायंकाळी चार ते पाचच्या दरम्यान नगर शहरासह जिल्ह्यातील कोपरगाव, श्रीगोंदा, राहाता, पारनेर तालुक्यांतील काही भागात वादळी वाऱ्यासह पाऊसही झाला. सध्या जिल्ह्यातील बहुतांश ठिकाणी कांदा काढणी सुरू आहे. अचानक आलेल्या पावसाने कांदा उत्पादक शेतकऱ्यांची धांदल उडाली. काहींचा कांदाही भिजला. आंब्याच्या कैऱ्याही गळाल्या. यामळे शेतकरी हवालदिल झाले आहेत.

महिनाभरापूर्वीच अवकाळी पावसासह वादळ, गारपिटीने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले होते. शेवगाव, पाथर्डी तालुक्यात त्यावेळी कांदा, गहू, हरभरा, आदी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. त्यातून बाहेेर पडत असतानाच पुन्हा एकदा अवकाळी पावसाने तडाखा दिल्याने शेतकऱ्यांमागील शुक्लकाष्ट काही केल्या थांबायचे नाव घेईना.

---

सलग दुसऱ्या वर्षी रब्बीला फटका..

गेल्या वर्षी रब्बी हंगामातील गहू, हरभरा, कांदा अशा पिकांना कोरोनामुळे अपेक्षित भाव मिळाला नव्हता. त्यानंतर खरीप हंगामही अतिवृष्टीने हिरावून घेतला होता. त्यानंतर कांद्याच्या बियाणांमुळेही शेतकऱ्यांपुढे अडचणी होत्या. सोयाबीन, बाजरी अशी बियाणेही निकृष्ट प्रतीची मिळाल्याने शेतकरी हैराण झाले होते. त्यात आता रब्बी हंगामातही सलग दुसऱ्यांना अवकाळीचा फटका बसला. त्यामुळे सलग दुसऱ्या वर्षी शेतकऱ्यांना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे.

Web Title: Crisis of unseasonal rains including corona on the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.