In the city of Parmakahani in Rajasthan, Karan has been the ultimate favorite for the villain | राजस्थानातील प्रेमकहाणीचा नगरमध्ये करुण अंत : प्रियकरच ठरला खलनायक

राजस्थानातील प्रेमकहाणीचा नगरमध्ये करुण अंत : प्रियकरच ठरला खलनायक

अरुण वाघमोडे


अहमदनगर : तिने त्याच्यावर जिवापाड प्रेम केले. माता-पित्यांच्या विरोधात जाऊन त्याच्याशी लग्न केले. लग्नानंतर मात्र अवघ्या दीड वर्षातच पतीचा द्वेष आणि छळ तिच्या वाट्याला आला. एक महिन्यापूर्वीच तिने एका बाळाला जन्म दिला. आता तरी संसार सुखाचा होईल, असे स्वप्न ती पाहत असताना पतीने तिचा छळ करत अवघ्या एक महिन्याच्या बाळाचाही जीव घेतला. राजस्थानच्या वाळवंटात उमललेल्या अर्चना कुमावत हिच्या प्रेमकहाणीचा नगरमध्ये करुण अंत झाला.
राजस्थानातील फुलोरा (जि. जयपूर) तालुक्यातील पंचमुखी या गावात राहणारा तरुण सोहन पुशाराम कुमावत याची याच गावातील अर्चना (वय २१) हिच्याशी मैत्री झाली. मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. तब्बल चार वर्षे त्यांचे हे प्रेमप्रकरण सुरू होते. अखेर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. आंतरजातीय विवाह असल्याने दोघांच्याही घरच्यांनी या लग्नाला नकार दिला. या प्रेमयुगुलांनी घरच्यांच्याविरोधात बंडखोरी करत मध्यप्रदेश येथे पलायन केले. १८ जानेवारी २०१८ रोजी उज्जैन येथे मंदिरात लग्न केले. सोहन हा फरशी बसविण्याचे काम करत होता. लग्नानंतर उपजीविका भागविण्यासाठी अर्चना आणि सोहन नगरमध्ये आले. येथे ते तपोवन रोडवर घर घेऊन राहू लागले. लग्नानंतर मात्र सोहनचे अर्चनावरील पे्रम कमी होऊ लागले. त्याला दारुचे व्यसन लागले. ‘तुझ्यामुळेच मला माझे घर सोडावे लागले. तुझ्यामुळेच माझे नातेवाईक मला घरी येऊ देत नाहीत’ असे म्हणत सोहन अर्चना हिला वारंवार मारहाण करून मानसिक आणि शारीरिक छळ करू लागला. अर्चना त्याला समजावून सांगत होती. मीही तुझ्यामुळे माझ्या आई-वडिलांना सोडून आले. आता आपण सुखाचा संसार करु असे अर्चना त्याला वारंवार सांगत होती. सोहन याने मात्र तिला त्रास देण्याचे थांबविले नाही.

महिनाभरापूर्वी अर्चना हिने एका बाळाला जन्म दिला होता. बाळ झाल्यानंतरही तिला सोहन त्रास देतच होता. १० जुलै रोजी याच कारणातून सोहन याने अर्चना हिला मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी त्याच्या अवघ्या एक महिन्याच्या बाळालाही मारहाण करण्यास सुरुवात केली. अर्चना त्याची याचना करत होती. सोहन याने मात्र बाळाला जमिनीवर आपटून त्याचा जीव घेतला. ज्याच्यावर पे्रम केले तोच सोहन अर्चनाच्या आयुष्यात सर्वात मोठा खलनायक ठरला. या घटनेनंतर तोफखाना पोलिसांनी आरोपी सोहन याला अटक केली आहे.

अर्चना हिच्या बाळाच्या मृत्युनंतर पोलिसांनी तिचा पती सोहन याला अटक केली आहे. सध्या तो पोलीस कोठडीत आहे. अर्चना हिने सोहनसाठी माता-पित्यांना सोडल्याने ती घरीही जाऊ शकत नाही. पतीच्या कृत्यामुळे अर्चनाचे आयुष्य तरुण वयातच उद्ध्वस्त झाले.

Web Title: In the city of Parmakahani in Rajasthan, Karan has been the ultimate favorite for the villain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.