संगमनेरहून गोवंशांचे मांस घेऊन जाणारा टेम्पो पकडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 04:21 AM2021-04-17T04:21:07+5:302021-04-17T04:21:07+5:30

संगमनेर : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने राज्यात ‘बेक्र द चेन’च्या माध्यमातून कडक निर्बंध घालत १ मेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात ...

Caught a tempo carrying beef from Sangamner | संगमनेरहून गोवंशांचे मांस घेऊन जाणारा टेम्पो पकडला

संगमनेरहून गोवंशांचे मांस घेऊन जाणारा टेम्पो पकडला

Next

संगमनेर : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने राज्यात ‘बेक्र द चेन’च्या माध्यमातून कडक निर्बंध घालत १ मेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. अशा गंभीर परिस्थितीतही अवैध कत्तलखान्यात गोवंश जनावरांची कत्तल सुरूच आहे. संगमनेरहून पुणे जिल्ह्यातील खेड येथे गोवंश जनावरांचे मांस घेऊन जाणारा टेम्पो मानद पशू कल्याण अधिकारी शिवशंकर राजेंद्र स्वामी यांनी व बजरंग दल कार्यकर्त्यांनी गुरूवारी (दि. १५) मध्यरात्री बाराच्या सुमारास पाठलाग करून पकडला.

मुशरिफ महमंद फकीर (वय ३१, रा उमदा प्लाझा, जुना एस. टी. स्टँड जुन्नर, ता. जुन्नर, जिल्हा. पुणे) असे गोमांस वाहतूक करणाऱ्या टेम्पो चालकाचे नाव आहे. त्याच्याविरोधात कृष्णा प्रताप माने (रा. नारायणगाव, ता. जुन्नर, जि. पुणे) यांनी तक्रार दिली आहे. संगमनेरहून टेम्पोतून (एम. एच. १४, जे. यू. ९७८९) गाेवंशांचे मांस नाशिक-पुणे महामार्गाहून पुण्याकडे जाणार असल्याची माहिती माने यांना मानद पशू कल्याण अधिकारी शिवशंकर राजेंद्र स्वामी यांच्याकडून मिळाली होती. त्यानंतर माने यांनी त्यांच्या मित्रांना व बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना नारायणगाव बसस्थानकासमोर बोलावून घेतले. रात्री बाराच्या सुमारास सदर टेम्पो तेथून जात असताना माने व त्यांचे मित्र व बजरंग दल कार्यकर्ते यांनी टेम्पोचालकास हात दाखवून थांबण्याचा इशारा केला. मात्र, चालकाने टेम्पो न थांबविता पुढे नेला. या टेम्पोचा पाठलाग करत कार्यकर्त्यांनी तो वारूळवाडीच्या हद्दीत मांजरवाडी फाटा येथे पकडला.

कार्यकर्त्यांनी या टेम्पोच्या मागील बाजूस पाहिले असता त्यांना गाय व बैल या जनावरांचे मांस आढळून आले. हा टेम्पो नारायणगाव पोलीस ठाण्यात नेण्यात आला. एक हजार किलो गोमांस जप्त करत याप्रकरणी नारायणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्याचे पोलीस उपनिरीक्षक स्मिता नवघरे यांनी सांगितले.

Web Title: Caught a tempo carrying beef from Sangamner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.