BJP should support Vikram Rathore | भाजपने विक्रम राठोडांना पाठिंबा द्या

भाजपने विक्रम राठोडांना पाठिंबा द्या

लोकमत न्यूज नेटवर्क

अहमदनगर: राज्यात भाजप व सेनेत टोकाचा संघर्ष निर्माण झाला असताना, खासदार दिलीप गांधी यांचे चिरंजीव सुरेंद्र गांधी यांनी श्रीपाद छिंदमच्या प्रभागातील पोटनिवडणुकीत भाजपने विक्रम राठोड यांना पाठिंबा देण्याची मागणी शहर भाजपकडे केली आहे. भाजपचे गांधी यांनी केलेली मागणी राजकीय वर्तुळातील चर्चेचा विषय ठरला आहे.

माजी नगरसेवक सुरेंद्र गांधी यांनी शहर अध्यक्ष महेंद्र गंधे यांना दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे, महानगरपालिका प्रभाग ९ कमध्ये पोट निवडणूक होत आहे. या निवडणुकीत भाजपने उमेदवार न देता, शिवसेनेचे उपनेते स्व.अनिल राठोड यांचे पुत्र विक्रम राठोड यांना पाठिंबा द्यावा. स्व.अनिल राठोड यांच्यासाठी हीच खरी श्रद्धांजली ठरेल.

गेल्या ४० ते ५० वर्षांपासून स्व.अनिल राठोड यांनी हिंदुत्वाचा झेंडा हाती घेत शहरात काम केले होते. त्यांचा राजकीय प्रवास खडतर होता. सर्वसामान्य नागरिकांसाठी ते आयुष्यभर लढले. त्यांच्या अकाली निधनाने निर्माण झालेली पोकळी भरून काढण्यासाठी मोठा निर्णय घेणे आवश्यक आहे.

माजी केंद्रीय मंत्री दिलीप गांधी व स्व.अनिल राठोड यांना कोणताही राजकीय वारसा नव्हता. दिलीप गांधी व अनिल राठोड यांच्यात गेल्या काही वर्षांपासून ताणतणाव व राजकीय वाद होता, परंतु त्यांनी सुमारे २५-३० वर्षे भाजप-सेना युतीत बरोबर काम केले होते. खासदार म्हणून निवडून येण्यात अनिल राठोड यांनी सहकार्य केले, तर आमदार म्हणून निवडून येण्यासाठी दिलीप गांधी यांनी एकमेकांना सहकार्य केले आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्व.अनिल राठोड हे जवळचे स्नेही होते. प्रभाग ९ मध्ये होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी भाजपने उमेदवार न देता, विक्रम राठोड यांना पाठिंबा द्यावा, अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष आ.चंद्रकांत पाटील यांच्याकडेही करणार असल्याचेही गांधी निवेदनात म्हटले आहे.

...

Web Title: BJP should support Vikram Rathore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.