कमांडर जानकरांना भाजपाने डिमांडरही ठेवले नाही; रासपचा विधानसभेला एकही उमेदवार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2019 12:26 PM2019-10-09T12:26:45+5:302019-10-09T12:27:34+5:30

‘मी डिमांडर नव्हे तर कमांडर आहे’ असे म्हणणा-या महादेव जानकरांच्या राष्ट्रीय समाज पक्षाला विधानसभा निवडणुकीत भाजपाने एकही जागा सोडली नाही. अखेर दौंड आणि जिंतूर हे दोन मतदारसंघ तरी पक्षाला मिळतील अशी अपेक्षा असताना शेवटच्या क्षणी येथील दोन्ही उमेदवारांना भाजपानेच एबी फॉर्म देत विधानसभेत ‘रासप’चा कप रिकामाच ठेवला.  

BJP did not keep commander Janakar on demand; Rasap has no candidate in the Assembly | कमांडर जानकरांना भाजपाने डिमांडरही ठेवले नाही; रासपचा विधानसभेला एकही उमेदवार नाही

कमांडर जानकरांना भाजपाने डिमांडरही ठेवले नाही; रासपचा विधानसभेला एकही उमेदवार नाही

Next

अरुण वाघमोडे ।  
अहमदनगर : ‘मी डिमांडर नव्हे तर कमांडर आहे’ असे म्हणणा-या महादेव जानकरांच्या राष्ट्रीय समाज पक्षाला विधानसभा निवडणुकीत भाजपाने एकही जागा सोडली नाही. अखेर दौंड आणि जिंतूर हे दोन मतदारसंघ तरी पक्षाला मिळतील अशी अपेक्षा असताना शेवटच्या क्षणी येथील दोन्ही उमेदवारांना भाजपानेच एबी फॉर्म देत विधानसभेत ‘रासप’चा कप रिकामाच ठेवला.  
महादेव जानकर यांनी २००३ साली स्थापन केलेल्या राष्ट्रीय समाज पक्षाने गेल्या पंधरा ते सोळा वर्षात महाराष्ट्रासह २७ राज्यात पक्षाची ओळख निर्माण केली.  महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक आणि उत्तरप्रदेश या चार राज्यात रासपला पक्ष म्हणून मान्यता मिळाली आहे. धनगर समाजासह बहुजनांच्या प्रश्नांवर आवाज उठविणा-या जानकरांची सर्वव्यापक ओळख निर्माण झाली.  जानकरांच्या पक्षाचा विस्तार पाहता २०१४ च्या निवडणुकीत भाजपाने रासपला जवळ करत मंत्रिमंडळात त्यांना कॅबिनेट मंत्रिपद दिले. वर्षभरापूर्वी जानकरांचे पक्षस्थापनेपासूनचे सहकारी असलेल्या बाळासाहेब दोडतले यांना शेळी-मेंढी पालन महामंडळाचे अध्यक्षपद दिले. सत्तेत सहभागी झालेल्या जानकरांचा आवाज मात्र गेल्या पाच वर्षात क्षीण झालेला दिसला. 
विधानसभा निवडणुकीत जानकरांनी रासपला प्रथमच ५७ जागा देण्याची भाजपाकडे मागणी केली. त्यानंतर १४ अन् शेवटच्या क्षणी दोन जागांवर समाधान मानले होते.  भाजपाने मात्र या दोन जागाही जानकरांच्या पदरात टाकल्या नाहीत. पक्षाच्या वाट्याला एकही जागा न आल्याने उद्विग्न झालेल्या जानकरांनी दौंडचे विद्यमान आमदार राहुल कुल आणि पक्षाने जिंंतूर मतदारसंघातून घोषित केलेल्या उमेदवार मेघना बोर्डीकर यांची रासपमधून हकालपट्टी केल्याचे जाहीर केले.  ‘भाजपाने फसविले असले तरी महायुतीचे उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार आहे’ असे सांगत जानकरांनी महायुतीतच राहण्याचे संकेत दिले आहेत.
पक्षाची अवहेलना कार्यकर्त्यांच्या जिव्हारी 
रासपच्या महाराष्ट्रात शहरासह ग्रामीण भागातही शाखा स्थापन झालेल्या असून, कार्यकर्त्यांची संख्या मोठी आहे. विधानसभा निवडणुकीत मात्र पक्षालाही महायुतीकडून एकही जागा न मिळाल्याने ही अवहेलना कार्यकर्त्यांच्या जिव्हारी लागली आहे. सर्वसामान्य जनतेची कामे मार्गी लावता यावीत, यासाठी पक्षाचे प्रमुख महादेव जानकर यांनी भाजपासोबत जाण्याचा निर्णय घेतला. विधानसभा निवडणुकीत पक्षाला हक्काच्या जागा मिळणे अपेक्षित होते.  मात्र एकही जागा मिळाली नाही. पक्षप्रमुख जो निर्णय घेतील त्यानुसार आमची पुढील वाटचाल राहणार असल्याचे रासपचे अहमदनगरचे उत्तर जिल्हाध्यक्ष शरद बाचकर यांनी सांगितले़. 
जिल्ह्यातही रासपचे पदाधिकारी निवडणुकीपासून दूर 
निवडणुकीत जागा न मिळाल्यानंतरही रासप पक्ष महायुतीत आहे़ पक्षाचे स्थानिक पदाधिकारी मात्र सध्या निवडणुकीपासून दूर असल्याचे चित्र दिसत आहे. स्थानिक कार्यकर्त्यांनी नेमकी काय भूमिका घ्यावयाची याबाबत पक्षश्रेष्ठींकडून काही आदेश आलेला नाही. त्यामुळे सध्या तरी आम्ही अजून निवडणुकीपासून अलिप्त असल्याचे रासपचे दक्षिण जिल्हाध्यक्ष रवींद्र कोठारी यांनी सांगितले़ 

Web Title: BJP did not keep commander Janakar on demand; Rasap has no candidate in the Assembly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.