Balasaheb Thorat is not in dispute over friendship over account allocation | खाते वाटपावरून मित्रपक्षात वाद नाहीत-बाळासाहेब थोरात
खाते वाटपावरून मित्रपक्षात वाद नाहीत-बाळासाहेब थोरात

शिर्डी : मंत्र्यांच्या खातेवाटपावरील चर्चा अंतिम टप्प्यात आली आहे. दोन दिवसात त्यासंबधी निर्णय होईल. खातेवाटपावरून मित्रपक्षांत कोणताही वाद नाही. सरकारमध्ये तीन पक्ष आहेत. तेव्हा चर्चा करूनच निर्णय घेतला जाईल, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व राज्याचे कॅबिनेट मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.
 मंत्री थोरात यांनी शिर्डी येथे शनिवारी साईसमाधीचे दर्शन घेतल्यानंतर शासकीय विश्रामगृह येथे पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, शेतकरी कठीण प्रसंगातून जात असल्याने शेतक-यांना जास्तीत जास्त मदत व्हावी यासाठी आमचा प्रयत्न सुरू आहे. सरकारमध्ये तीन पक्ष वेगवेगळ्या विचाराचे असले तरी तीनही पक्षांचा राज्य घटनेवर विश्वास आहे़. त्यामुळेच आम्ही तीन्ही पक्ष एकाच विचाराने कारभार करण्यासाठी पुढे जात आहोत. पाच वर्षें सरकार टिकवायचे असल्याने चर्चेतून निर्णय घेण्याची काळजी घेतली जात आहे. राज्य मंत्रीमंडळाचा विस्तार झाल्यावरच महामंडळे व साईसंस्थान विश्वस्त मंडळांच्या नियुक्तीबाबत निर्णय होणार आहे. राज्य मंत्रीमंडळात आपण कोणत्याही एका विशिष्ट खात्यासाठी अडून बसलेलो नाही. जे मिळेल ते खाते स्वीकारणार आहे. 
लोकसभा आणी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसमधील मोठे नेतेमंडळी पक्ष सोडून गेले. आज त्यांना पक्ष सोडल्याचा पश्चाताप होत आहे. त्यांना पक्षात घेण्याबाबत कोणतीही चर्चा सध्या सुरू नाही. पक्ष सोडून गेलेल्या नेत्यांना पक्षात प्रवेश देण्यापूर्वी त्यांची जागा घेतलेल्या युवा कार्यकर्त्यांना विश्वासात घेतले जाईल. गेली पाच वर्षे मी विधानसभेचा विरोधी पक्षनेता असतो तर मला आज अधिक फायदा झाला असता, असेही थोरात म्हणाले. 

Web Title: Balasaheb Thorat is not in dispute over friendship over account allocation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.