अहमदनगरवर झेंडा कुणाचा?

By सुधीर लंके | Published: December 8, 2018 11:20 AM2018-12-08T11:20:38+5:302018-12-08T11:21:11+5:30

ठरलेल्या आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडत आणि आश्वासनांची खैरात करत महापालिका निवडणूक प्रचाराची सांगता झाली. सर्वच पक्षांनी विकासाचे गाजर दाखविले.

Ahmadnagar is a flag? | अहमदनगरवर झेंडा कुणाचा?

अहमदनगरवर झेंडा कुणाचा?

Next

सुधीर लंके
ठरलेल्या आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडत आणि आश्वासनांची खैरात करत महापालिका निवडणूक प्रचाराची सांगता झाली. सर्वच पक्षांनी विकासाचे गाजर दाखविले. मात्र, मतदारांचा विश्वास संपादन करण्यात कुठलाही एक पक्ष यशस्वी ठरला, असे दिसत नाही. प्रचारात कुणाची अशी लाट दिसली नाही.
नगर महापालिकेत गत अडीच वर्षे सेना-भाजपची सत्ता होती. मात्र, या काळात आम्हाला शहराचा विकास करता आला नाही, अशी जाहीर कबुली या दोन्ही पक्षांनी स्वत:च प्रचारात दिली. अर्थात त्याबाबतचे दोष त्यांनी एकमेकांकडे ढकलले. राज्यात भाजपकडे महत्त्वाची खाती असल्याने त्यांनी जाणीवपूर्वक पालिकेचा निधी अडविला असा सेनेचा आरोप होता, तर आम्ही निधी दिला पण यांनीच खाली कामे केली नाही, असे भाजप म्हणाला. जेव्हा एकमेकांवर आरोप करण्यास वाव शिल्लक राहिला नाही, तेव्हा या दोन्ही पक्षांनी शहराच्या मागासलेपणाचे खापर पूर्वीच्या काँग्रेस सरकारवर फोडले. अशी केवळ मडकी फोडाफोडी झाली.
शिवसेनेने पुन्हा एकदा नगरच्या भयमुक्तीचा नारा दिला. आता त्यांच्या मदतीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही धावून आले. ‘मीच शहर भयमुक्त करु शकतो’ अशी नवीच घोषणा त्यांनी केली. या शहरात सेनेचीच दहशत असून त्यांनाही आत करु शकतो, असा दमही त्यांनी दिला. मी धमकी देत नाही, असे ते म्हणाले खरे, पण अप्रत्यक्षरित्या ही धमकीच होती. अर्थात केडगावमध्ये काँग्रेसचे उमेदवार व कोतकर समर्थक एका रात्रीत भाजपात कसे आले? (त्यासाठी कुणाला धमकावले?) खुनाच्या गुन्ह्यात दोषी असलेले कोतकर व मोदी यांची छायाचित्रे सोबत कशी? या सेनेच्या आरोपांवर मुख्यमंत्र्यांनी सोयीस्कर मौन पाळले. याबाबत जाहीर खुलासा करायला ते घाबरले. भाजपच्या बहुतांश मंत्र्यांची भाषणे ही नगरच्या प्रश्नांपेक्षा राज्य व केंद्राच्या कामगिरीबाबत होती.
भाजपने केंद्र व राज्याच्या निवडणुकीसारखाच ‘कार्पोरेट’ स्टाईलने ‘श्रीमंत’ प्रचार केला. मुंबईच्या वेगवेगळ्या ‘टीम’ त्यांनी तैनात केल्या होत्या. सर्व्हे घ्यायचे व रणनिती ठरवायची असा धडाका होता. मुख्यमंत्र्यांची काही विशेष खासगी पथकेच शहरात तळ ठोकून होती म्हणतात. त्यांनी स्थानिक कार्यकर्त्यांना केवळ सूचना पाळण्यास सांगितले. निर्णयप्रक्रिया बहुतांश मुंबईकरांच्या ताब्यात होती. नगरच्या तरुणांना रोजगाराची साधने नाहीत. मात्र, निवडणुकीने सर्वेक्षण एजन्सीजला भरपूर रोजगार दिला. सेनेचा सर्व प्रचार अनिल राठोड यांच्यावर अवलंबून होता. भाजपच्या तुलनेत त्यांनी एकट्याने किल्ला लढविला. सेनेचे नितीन बानगुडे व नीलम गोºहे वगळता कुणीही प्रचारात आले नाहीत. असे का? हे समजले नाही. राष्टÑवादीत तर अघोषित शांतता दिसली. कुणावरच आरोप करायचे व बोलायचे नाही. स्थानिक पातळीवर घरोघर जाऊन प्रचार करायचा, असे बहुधा आमदार जगताप पिता-पुत्रांनी ठरविले होते. त्यांची भिस्त ही सभा व शक्तिप्रदर्शनापेक्षा स्थानिक उमेदवारांच्या ताकदीवर दिसली. राष्टÑवादीने केवळ धनंजय मुंडे यांची सभा घेतली. दिलीप वळसे व राष्टÑवादीचे इतर नेते प्रचारात फिरकले नाहीत. लोकसभा जवळ आल्याने राष्टÑवादीने या निवडणुकीत तयारीनिशी उतरणे अभिप्रेत होते. मात्र, त्यांच्यात प्रचंड सामसूम जाणवली. त्यामुळे हा पक्ष लोकसभा लढेल की नाही? अशीही शंका निर्माण झाली. जगताप यांच्यावर गुन्हे दाखल असल्याने सरकारच्या दबावामुळे त्यांनी प्रचारात मवाळ भूमिका घेतली, अशीही चर्चा सुरु आहे. जगताप यावेळी केडगावात प्रचाराला फिरकलेच नाहीत. तेथील कोतकर समर्थकांचा भाजप प्रवेश व केडगाव हत्याकांड अशी दोन्ही कारणे त्या पाठीमागे असावीत. केडगावात भाजपची गत पोटनिवडणुकीत अनामत जप्त झाली. तेथे झेंडा रोवायचा असेल तर कोतकरांशिवाय पर्याय नाही, असे भाजपलाही वाटले. म्हणून भाजपने कर्डिले यांच्यावर बहुधा ही पक्षप्रवेशाची विशेष मोहीम सोपवली होती. कर्डिले यांनाही पक्षाचे ऐकण्याशिवाय पर्याय नव्हता. या सोयरिकीमुळेही जगताप तिकडे गेले नाही, असाही एक सूर आहे. जगतापांनी रेल्वे पुलाच्या पलीकडे व कर्डिले यांनी अलीकडे यायचे नाही, असे बहुधा ठरलेले असावे. हत्यांकाडाचे सेनेने राजकारण केल्याने सेनेला केडगावात व शहरात भाजपच्या माध्यमातून रोखणे हाही अजेंडा यात असू शकतो.
काँग्रेसकडून या निवडणुकीत फारशा अपेक्षा नव्हत्या. कारण त्यांचे संघटन शहरात खिळखिळे झाले आहे. सुजय विखे यांच्याकडे जबाबदारी आल्यानंतर त्यांनी ताकद लावण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना शहरात अद्याप फारसा रसच नाही. ‘आधी लगीन लोकसभेचे, नंतर काय ते बाकीचे’ असे त्यांचे सरळ धोरण आहे. तरीही या निवडणुकीत त्यांनी अल्पसा प्रयत्न केला. विखे-थोरात एक दिसले. मनसे, भाकप, आप, रिपाइं, रासप, सपा, भारिप हे पक्ष निवडणुकीच्या मैदानात होते. मात्र, ते बोटावर मोजण्याइतक्याच जागांवर लढत आहेत. या निवडणुकीत मतदार गोंधळात आहेत. कारण, एका प्रभागात चार उमेदवार असल्याने कोणत्या पक्षातून कोण लढतेय हे समजत नाही. दुसरी बाब म्हणजे मतदारांचा पक्षांवरचा विश्वास उडाला आहे. त्यामुळे कुठलाही एक पक्ष सत्तेत येईल, असे दिसत नाही. निवडणुकीनंतर त्रिशंकू अवस्था राहू शकते. अशावेळी काहीही समीकरणे साकारतील. निवडणुकीत काही अपक्षांनीही आव्हान निर्माण केल्याचे दिसले. मराठा आरक्षण, छिंदम हे मुद्दे प्रचारात दिसले नाहीत. छिंदमला असलेला विरोध मावळला. कारण त्यामागे मतांची गणिते होती. मतदार काय करतात? हे उद्या ठरेल.

Web Title: Ahmadnagar is a flag?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.