जि.प. पदाधिकारी निवडीचा कार्यक्रम जाहीर
By Admin | Updated: September 2, 2014 01:56 IST2014-09-02T01:17:39+5:302014-09-02T01:56:27+5:30
अहमदनगर : विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांना मुदतवाढ मिळण्याची शक्यता व्यक्त होत होती. मात्र, राज्य सरकारच्या ग्रामविकास विभागाने मुदत

जि.प. पदाधिकारी निवडीचा कार्यक्रम जाहीर
अहमदनगर : विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांना मुदतवाढ मिळण्याची शक्यता व्यक्त होत होती. मात्र, राज्य सरकारच्या ग्रामविकास विभागाने मुदत संपणाऱ्या जिल्हा परिषद पदाधिकारी आणि पंचायत समिती सभापती- उपसभापती यांच्या निवडीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. या कार्यक्रमानुसार जिल्हाधिकाऱ्यांना निवडीची प्रक्रिया पार पाडावी लागणार आहे.
जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांची अडीच वर्षाची मुदत येत्या २० सप्टेंबरला संपत आहे. तर पंचायत समिती सभापती आणि उपसभापती यांची मुदत १३ सप्टेंबरला संपत आहे. महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती अधिनियमन १९६१ च्या कलम ५९(१) आणि कलम ११(१) मधील तरतुदीनुसार सार्वत्रिक निवडणुकीत निवडून आलेल्या सदस्यांतून जिल्हा परिषदेत पदाधिकारी म्हणून निवड केलेल्या सदस्यांचा कार्यकाळ संपल्यानंतर या ठिकाणी नवीन पदाधिकाऱ्यांची निवडी करण्याचे शासनाचे आदेश आहेत.
त्यानुसार येत्या १४ आणि २१ तारखेला या निवडी होणार आहेत. या जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांची विशेष बैठक बोलविण्यात येणार असून त्या ठिकाणी बहुमताच्या जोरावर बिनविरोध अथवा मतदान होऊन नूतन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात येणार आहे. यावेळी लोकनियुक्त सदस्यांना आवश्यकता असल्यास मतदान प्रक्रियेत भाग घेता येणार आहे.
जिल्हा परिषदेच्या निवडीसाठी पीठासीन अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी तर पंचायत समितीच्या निवडीसाठी पीठासीन अधिकारी म्हणून प्राधिकृत करण्याचे अधिकार शासनाने जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. (प्रतिनिधी)