जिल्हा परिषदेचे कामकाज ठप्प
By Admin | Updated: August 17, 2016 00:46 IST2016-08-17T00:33:57+5:302016-08-17T00:46:22+5:30
अहमदनगर : औरंगाबाद जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश बेदमुथा यांना जिल्हा परिषद सदस्य संभाजी डोणगावकर यांच्याकडून मारहाण झाली होती.

जिल्हा परिषदेचे कामकाज ठप्प
अहमदनगर : औरंगाबाद जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश बेदमुथा यांना जिल्हा परिषद सदस्य संभाजी डोणगावकर यांच्याकडून मारहाण झाली होती. या घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी मंगळवारी नगर जिल्हा परिषदेच्या अधिकारी-पदाधिकारी यांनी काम बंद आंदोलन केले. यामुळे दिवसभर जिल्हा परिषदेचे कामकाज ठप्प झाले. या आंदोलनामुळे जिल्हा परिषद सदस्यांमधून नाराजीचा सूर आहे. ८ आॅगस्टला औरंगाबाद जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी बेदमुथा यांना सदस्य डोणगावकर यांच्याकडून मारहाण झाली होती. या घटनेचे पडसाद मंगळवारी नगर जिल्हा परिषदेत उमटले. सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी परिक्षित यादव यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून काम बंदची हाक दिली. सकाळी ११ च्या सुमारास जिल्हा परिषदेच्या प्रवेशव्दारात अधिकारी कर्मचारी एकत्र येत, त्यांनी डोणगावकर यांचा निषेध नोंदवला. त्यानंतर कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जात निवेदन दिले. राजपत्रित अधिकारी महासंघाने काम बंद आंदोलन पुकारले असून त्यांच्या आवाहनानुसार नगरमध्ये आंदोलन पुकारण्यात आले आहे. नियमबाह्य कामे करून घेण्यासाठी पदाधिकाऱ्यांकडून अधिकारी-कर्मचाऱ्यांना मारहाण करण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. भविष्यात या घटनांची पुनरावृत्ती होवू नये, यासाठी कार्यवाही होणे आवश्यक आहे. यावेळी चंद्रकांत वानखेडे वरिष्ठ लेखाधिकारी, मनोज ससे उपमुख्य कार्यकारी अधिकारी महिला बालकल्याण विभाग, प्रशांत शिर्के उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत, एस.डी. मोरे लघु पाटबंधारे विभाग, शिक्षणाधिकारी लक्ष्मण पोले, बी. एस. भोसले कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग कर्मचारी सोमनाथ भिटे, आश्रू नराटे, अंबादास ठाणगे, महेश साळुंके, विकास साळुंके, भारत बोरू डे, संजय गोसावी यांच्यासह कर्मचारी आंदोलनात सहभागी झाले. दरम्यान, अधिकारी-क र्मचारी यांनी आंदोलन करणे गैर नाही. मात्र, शनिवार, रविवार आणि सोमवार अशी सलग सुट्टी आली. मंगळवारी पुन्हा काम बंद आंदोलन बुधवारी सरकारी सुट्टी यामुळे आधी चार दिवस जिल्हा परिषदेचे कामकाज ठप्प झाले होते. या विषयावर स्थायी समितीच्या बैठकीत चर्चा करणार असल्याचे जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब हराळ यांनी ‘लोकमत’शी बोलतांना सांगितले. (प्रतिनिधी)