अहमदनगर : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे जिल्हा परिषदेतही खबरदारी घेतली जात असून, अभ्यागतांना पूर्णपणे बंदी करण्यात आली आहे. तसेच कर्मचारीही ५० टक्के उपस्थितीतच काम करत आहेत.
गेल्या आठ ते दहा दिवसांपासून जिल्हा परिषदेतील अनेक कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळले. त्यामुळे अनेक विभागांतील कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम करण्याचे आदेश दिले. याशिवाय मागील आठवड्यातच ५० टक्के उपस्थितीत कर्मचाऱ्यांनी काम करावे, अशा शासनाच्या सूचना आल्या. त्यामुळे जिल्हा परिषदेत कर्मचारी, अधिकाऱ्यांची संख्याही घटलेली आहे.
गेल्या आठवड्यापासून अभ्यागतांना जिल्हा परिषदेत येण्यास मज्जाव करण्यात येत आहे. कोणाचे काही काम असेल तर ते टपालात द्यावे, अन्यथा संबंधित विभागाशी फोनवरून संपर्क करावा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदेत अभ्यागत दिसत नाहीत. कर्मचारी ५० टक्के किंवा त्यापेक्षा कमी उपस्थित असल्याने जिल्हा परिषदेत नेहमी असणारी वर्दळ कमी झाली आहे. याशिवाय प्रत्येक विभागात सॅनिटायझर ठेवण्यात आले असून, अधिकाऱ्यांसह इतर कर्मचारी त्याचा वापर करतात. कर्मचाऱ्यांकडे मास्क नसेल तर दंडात्मक तरतूदही जिल्हा परिषदेने केली आहे. एकूणच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात खबरदारी जिल्हा परिषदेत घेण्यात येत आहे.