जिल्हा परिषद निवडणूक प्रक्रिया आॅनलाईन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2016 00:30 IST2016-06-30T22:51:19+5:302016-07-01T00:30:31+5:30
अहमदनगर: जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या पुढीलवर्षी होऊ घातलेल्या सार्वत्रिक निवडणुका आॅनलाईन होणार आहेत़ निवडणुकीसाठी मतदार याद्या तयार करणे

जिल्हा परिषद निवडणूक प्रक्रिया आॅनलाईन
अहमदनगर: जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या पुढीलवर्षी होऊ घातलेल्या सार्वत्रिक निवडणुका आॅनलाईन होणार आहेत़ निवडणुकीसाठी मतदार याद्या तयार करणे व नामनिर्देशनपत्र स्वीकारणे, आदी कामकाज आॅनलाईन प्रक्रियेव्दारे करण्यात येणार असून, यासंदर्भात मंत्रालयात खास प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे़ प्रशिक्षणासाठी दोन मास्टर ट्रेनर पाठविण्याच्या सूचना राज्य निवडणूक आयुक्त सहारिया यांनी गुरुवारी व्हिडीओ कॉन्फरन्सव्दारे दिल्या आहेत़
जिल्हा परिषदेच्या २०१७ मध्ये होऊ घातलेल्या निवडणुकांची तयारी राज्य निवडणूक आयोगाने केली आहे़ या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयुक्त सहारिया यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सव्दारे गुरुवारी निवडणूक पूर्वतयारीचा आढावा घेतला़ आॅनलाईन निवडणूक प्रकियेबाबत यावेळी चर्चा झाली़
निवडणूक आयोग जिल्हा परिषद निवडणूक आॅनलाईन घेण्यासाठी आग्रही आहे़ त्यासाठी खास प्रणालीदेखील विकसित करण्यात आली़ या प्रणालीबाबत येत्या २१ जुलै रोजी मंत्रालयात प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहेत़ प्रशिक्षणासाठी नायब तहसीलदार दर्जाच्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून, नियुक्त अधिकाऱ्यांची नावे यावेळी कळविण्यात आली़
महाआॅनलाईन ने विकसित केलेल्या प्रणालीबाबत जिल्ह्यातील दोन मास्टर ट्रेनरला प्रशिक्षण दिले जाईल़ ते ही माहिती जिल्हा परिषद व पंचायत समिती कर्मचाऱ्यांना देतील आणि कर्मचारी प्रत्यक्षात कार्यवाही करतील, त्यावर मास्टर ट्रेनरचे नियंत्रण राहिल, अशी ही संकल्पना आहे़ त्याचबरोबर जिल्हाधिकारी कार्यालय व राज्य निवडणूक आयोग, यांच्याशी हे मास्टर ट्रेनर समन्वय ठेवतील़ जिल्ह्यात ही प्रकिया पार पाडण्यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याचे अधिकारही मास्टर ट्रेनरला देण्यात आले आहेत़
जिल्हा परिषदेची आगामी निवडणुकांसाठी २०११ ची लोकसंख्या ग्राह्य धरण्यात येणार आहे़ त्यानुसार नगर जिल्ह्यातील ग्रामीण भागाची लोकसंख्या ३६ लाख ८ हजार ६३९ एवढी आहे़ ही लोकसंख्या राज्य निवडणूक आयोगाला कळविण्यात आली आहे़ प्राप्त लोकसंखेच्या आधारे जिल्हा परिषद सदस्यांची संख्या सर्वप्रथम राज्य निवडणूक आयोगाकडून निश्चित केली जाईल़ सदस्य संखेच्या आधारे जिल्ह्यातील गट व गणांची फेररचना करण्यात येणार आहे़ त्यानंतर आरक्षण सोडत होईल. (प्रतिनिधी)