ठाण्यासमोर ठिय्या
दोघांना अटक : सात जणांवर गुन्हा दाखल
जामखेड (जि.अहमदनगर) : येथील आरोळेवस्तीवर पूर्ववैमनस्यातून सोमवारी सकाळी आठच्या सुमारास एका युवकाचा तलवारीने वार करुन खून करण्यात आला. याप्रकरणी सात जणांवर गुन्हा दाखल केला आहे. दोघांना अटक केली आहे. बाळू जिजाबा माने असे मयताचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, जामखेड शहरातील करमाळा रस्त्यालगत असलेल्या आरोळेवस्ती येथे सरकार व समता असे युवकांचे दोन ग्रुप आहेत. या दोन्ही ग्रुपमध्ये सातत्याने भांडणे होत.
दोन महिन्यापूर्वी दोन्ही ग्रुपमध्ये वाद झाला होता. समता ग्रुपमधील सोनू वाघमारे व इतर पाच जणांविरोधात फिर्याद दाखल झाली होती. त्यानंतर सोमवारी (दि.१७) सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास समता ग्रुपमधील निखिल घायतडक, दत्ता शिंदे, बाळू जिजाबा माने व संजय महादेव विटकर हे तेथील व्यायामशाळेत गेले होते. त्यानंतर सकाळी आठच्या सुमारास सरकार ग्रुपमधील सोनू बबन वाघमारे, विक्रम भगवान डाडर, प्रमोद बबन गव्हाळे, युवा राजू डाडर, सुनील राजू डाडर हे तलवार, गज, काठय़ा तर सागर सुभाष गवासणे हे रिव्हॉल्वर घेऊन आले. या सर्व आरोपींनी बाळू जिजाबा माने याच्या छातीवर व गळ्यावर कोयता, काठी, तलवारीने वार केले. त्यामुळे तो बाळू माने रक्ताच्या थारोळ्यात पडला व जागीच मरण पावला. तर सागर गवासणे याने बाळू माने याच्या सोबत असलेल्या निखिल घायतडक, दत्ता शिंदे व संजय विटकर यांना गोळ्या घालण्याची धमकी दिली. घटनेनंतर वरील सर्व आरोपी दुचाकी व चारचाकी वाहनाने पळून गेले. याबाबत संजय महादेव विटकर यांनी जामखेड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. घटनेची माहिती पोलिसांना समल्यानंतर परीवक्षाधिन पोलीस उपधीक्षक प्रांजली सोनवणे, हे. कॉ. अनिल देवकर, प्रबोध हंचे, श्यामसुंदर जाधव, मोहिते हे घटनास्थळी दाखल झाले. मयताचे प्रेत शवविच्छेदनासाठी येथील शासकीय रुग्णालयात आणण्यात आले. दरम्यान, घटनेच्या निषेधार्थ विविध संघटना व ग्रामस्थांच्या वतीने उद्या (मंगळवारी) जामखेड बंदचे आवाहन केले आहे.
ठाण्यासमोर ठिय्या
■ बाळू माने याचे नातेवाईक व नागरिकांनी पोलीस ठाण्यासमोर ठिय्या मांडला.
■ जोपर्यंत आरोपींना अटक केली जात नाही. तोपर्यंत मृतावर अंत्यसंस्कार केले जाणार नसल्याची भूमिका नातेवाईकांनीघेतली.
■ पोलिसांनी कसून तपास केल्यानंतर सुनील राजू डाडर व युवा राजू डाडर यांना अटक केली. त्यानंतर दुपारी मयताच्या नातेवाईकांची पोलिसांनी समजूत काढून साडेचार वाजण्याच्या सुामरास बाळू माने याच्यावर अंत्यसंस्कार केले.