अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुण ठार; एक जखमी
By शिवाजी पवार | Updated: December 25, 2023 15:09 IST2023-12-25T15:09:16+5:302023-12-25T15:09:53+5:30
पोलिसांनी दोघांनाही शहरातील साखर कामगार रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. श्रीरामपूर नेवासे मार्गावरील घटना

अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुण ठार; एक जखमी
श्रीरामपूर (जि. अहमदनगर) : श्रीरामपूर नेवासे मार्गावर रेल्वे उड्डानपुलावर रविवारी रात्री ११ वाजेच्या दरम्यान अज्ञात वाहनाने दुचाकीला दिलेल्या धडकेत एका तरुणाचा मृत्यू झाला. अपघातात एक जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
मयताचे नाव अजय सिताराम फोफसे (वय २५, रा.गोंडेगाव, ता.श्रीरामपूर) असे आहे. त्याचा मित्र वैभव वाघ (राहुरी) हा जखमी झाला. अजय हा श्रीरामपुरातील एका फायनान्स कंपनीत नोकरीस होता. रविवारी तो वैभव याच्या समवेत नेवासेला गेलेला होता. रात्रीच्या वेळी श्रीरामपूरला परतत असताना उड्डानपुलाजवळ त्यांचा अपघात झाला. त्यांची दुचाकी (एमएच १७ सी १५७०८) रस्त्याच्या बाजूला फेकली गेली. स्थानिक लोकांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांना माहिती देण्यात आली.
पोलिसांनी दोघांनाही शहरातील साखर कामगार रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र अजय याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. वैभव याच्यावर उपचार सुरू आहेत. अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत मृत्यू झाल्याची नोंद शहर पोलिसांनी केली आहे.