आपण राष्ट्रवादीतच खूश
By Admin | Updated: August 19, 2014 23:26 IST2014-08-19T23:06:12+5:302014-08-19T23:26:54+5:30
राहुरी : आपण राष्ट्रवादीतच खूश असून, राष्ट्रवादीला पोषक वातावरण असल्याने पक्षाचा उमेदवारच येथे विजयी होईल, असा दावा करत माजी खासदार प्रसाद तनपुरे यांनी पक्षांतराच्या चर्चेला पूर्णविराम दिला.

आपण राष्ट्रवादीतच खूश
राहुरी : आपण राष्ट्रवादीतच खूश असून, पक्षांतराची चर्चा व्यर्थ आहे. येत्या विधानसभा निवडणुकीत राहुरीतून राष्ट्रवादीला पोषक वातावरण असल्याने पक्षाचा उमेदवारच येथे विजयी होईल, असा दावा करत माजी खासदार प्रसाद तनपुरे यांनी पक्षांतराच्या चर्चेला पूर्णविराम दिला.
बबनराव पाचपुते यांच्यापाठोपाठ जिल्ह्यातील अनेक ज्येष्ठ नेते राष्ट्रवादीतून बाहेर पडणार असल्याच्या चर्चेला गेल्या काही दिवसांपासून उधाण आले आहे. त्यात राहुरीतून प्रसाद तनपुरे हेही राष्ट्रवादी पक्ष सोडणार असल्याचे बोलले जात होते. प्रसाद तनपुरे सध्या मुंबईत असून त्यांच्याशी संपर्क साधून यासंदर्भात छेडले असता त्यांनी स्पष्ट शब्दांत पक्षांतराचा इन्कार केला. ज्येष्ठ नेते शंकरराव कोल्हे व आपण राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून एकत्र आहोत़ तेव्हापासून पक्षसंघटना वाढवण्याचे काम केले. आघाडीच्या जागावाटपात राहुरी मतदारसंघ राष्ट्रवादीकडे असून येथे पक्षाला अनुकूल वातावरण आहे. त्यामुळे आगामी लोकप्रतिनिधी राष्ट्रवादीचाच असेल, असा दावाही तनपुरे यांनी केला.
विरोधकांनी हा खोडसळपणा केला असून, कोणी त्यावर विश्वास ठेवू नये, आपण पक्षातच खूश असल्याचे तनपुरे यांनी स्पष्ट केले.
(तालुका प्रतिनिधी)