यंदा समाधानकारक पाऊस
By Admin | Updated: April 9, 2016 00:30 IST2016-04-09T00:26:19+5:302016-04-09T00:30:27+5:30
पारनेर : यंदा समाधानकारक पाऊस होईल, अशी भविष्यवाणी पारनेरचे ग्रामदैवत श्री नागेश्वर मंदिरासमोर गुढीपाडव्याला होणाऱ्या ‘व्हईक’ ने वर्तवली आहे.

यंदा समाधानकारक पाऊस
पारनेर : यंदा समाधानकारक पाऊस होईल, अशी भविष्यवाणी पारनेरचे ग्रामदैवत श्री नागेश्वर मंदिरासमोर गुढीपाडव्याला होणाऱ्या ‘व्हईक’ ने वर्तवली आहे. यामुळे दुष्काळाने होरपळणाऱ्या पारनेरमधील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
नागेश्वर मंदिरासमोर दरवर्षी गुढीपाडव्याला ‘व्हईक’ वर्तवले जाते. पाडव्याच्या आदल्या दिवशी सायंकाळी बारा महिन्यांचे बारा व दोन अधिक असे चौदा खडे खोदून त्यात वडाच्या पानात धान्य टाकून पाने पूर्ण बांधून त्या खड्ड्यात बुजवून पाणी सोडले जाते. पाडव्याच्या दिवशी ग्रामस्थांच्यावतीने ती पाने उघडली जातात. त्यावेळी धान्याचा ओलावा पाहून पावसाचा अंदाज ठरवला जातो. त्यानुसार शुक्रवारी सकाळी पोलीस पाटील बाळासाहेब औटी, मंदिर देवस्थानचे प्रमुख मुरलीधर बोरूडे, पद्माकर वाघमारे, संजय वाघमारे, शिरीष शेटीया, रमेश अडसुळ, भैरवनाथ मंदिराचे पुजारी व ग्रामस्थांच्या उपस्थितीत ‘व्हईक’ काढण्यात आले.
यावेळी चैत्र, वैशाख, अश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष, पौष व राजांबर मासमध्ये पाऊस बेताचा व धान्य बरोबर होणार आहे. तर ज्येष्ठ, भाद्रपद, फाल्गुनमध्ये पाऊस अधिक व धान्य अधिक होणार आहे. आषाढ, श्रावण, माघमध्ये पाऊस बरोबर व धान्य अधिक होणार असल्याचे नागेश्वर मंदिराचे पुजारी योगेश वाघ यांनी सांगितले. यावेळी नागेश्वर मंदिर जीर्णाेद्धार व कलशारोहण सोहळा तीन ते चार दिवस चालणार असून सामूहिक महापूजा होणार असल्याचे नागेश्वर देवस्थानचे प्रमुख संजय वाघमारे यांनी सांगितले.
(तालुका प्रतिनिधी)
कृतिका नक्षत्रात मांसाहार बंदी कायम
कृतिका नक्षत्रात पारनेर शहरात पशुहत्या बंदी करण्याची परंपरा आहे. सुमारे पंधरा दिवस गावात मांसाहार बंद ठेवण्यात येतो. दरवर्षी हॉटेलसह सर्वांनीच ही परंपरा पाळल्याने ग्रामस्थांच्यावतीने बाळासाहेब पाटील यांनी अभिनंदनाचा ठराव मांडला, त्यास सर्वांनी प्रतिसाद दिला. यावर्षीही कृतिका नक्षत्रात मांसाहार बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या प्रकृतीत सुधारणा होउन दीर्घायुष्य लाभावे, असे साकडे वाघमारे यांच्यासह ग्रामस्थांनी नागेश्वरास घातले.
कर्जतच्या ‘होईक’ मध्ये साधारण पावसाचा अंदाज
कर्जत : उत्तरेकडील राज्यात दुष्काळ पडेल तर पूर्व व पश्चिमेकडील राज्यांत आपत्ती येईल, असे भाकीत शुक्रवारी गोदड महाराज यांच्या संवत्सरीत वर्तविण्यात आले.
ग्रामदैवत गोदड महाराज मंदिरात पुजारी पंढरीनाथ काकडे यांनी गोदड महाराज यांनी लिहून ठेवलेल्या संवत्सरीतील या वर्षीच्या भविष्याचे वाचन केले. यावेळी भाविकांची मोठी उपस्थिती होती. या वर्षीच्या संवत्सराचे नाव दुर्मखी असे आहे. यावर्षी देशभर पावसाचे प्रमाण साधारण राहील. देशाच्या उत्तर भागातील राज्यात तीव्र दुष्काळ पडेल, असे भाकीत वर्तविण्यात आले आहे तर पूर्व व पश्चिमेकडील राज्यातील लोकांना आग, रोगराई, चोऱ्या यांचा त्रास होईल. चैत्र, वैशाख, जेष्ठ या तीन महिन्यात स्वस्ताई होईल. यानंतर तेजी- मंदी चालू राहील.
नक्षत्रवार पावसाचा अंदाज : मृग नक्षत्र - वाहन बेडूक- या नक्षत्रात पाऊस हुलकावण्या देणारा संभवतो, उष्णतामानातील फरकामुळे वारा सुटेल. पर्जन्यमान मध्यम राहील. आर्द्रा नक्षत्र - वाहन उंदिर - पाऊस मध्यम स्वरुपाचा राहील. पुष्य नक्षत्र - वाहन मोर - काही ठिकाणी खंडित तर काही ठिकाणी जोराचा पाऊस होईल. आश्लेषा नक्षत्र - वाहन हत्ती - या नक्षत्रात दमदार पाऊस होईल. मघा नक्षत्र - वाहन बेडूक - या नक्षत्रात चांगल्या पावसाची शक्यता आहे. पूर्वा नक्षत्र - वाहन गाढव - उत्तरार्धात बऱ्यापैकी पाऊस अपेक्षित. उत्तरा नक्षत्र - वाहन घोडा - खंडित वृष्टी, मध्यम स्वरुपाचा पाऊस होईल. हस्त नक्षत्र - वाहन उंदिर - चांगला पाऊस अपेक्षित. चित्रा नक्षत्र - गाढव - मध्यम स्वरुपाचा पाऊस होईल. स्वाती नक्षत्र - वाहन मेंढा - मध्यम स्वरुपाचा पाऊस अपेक्षित, साधारणपणे - पुष्य, आश्लेषा, मघा, हस्त या नक्षत्रात एकंदरीत चांगल्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. इतर नक्षत्रात सरासरीपेक्षा कमी पाऊस येईल. मान्सूनचे आगमन वेळेवर होण्याची शक्यता कमीच आहे, असे भविष्य वर्तविण्यात आले. (तालुका प्रतिनिधी)