यंदा श्रावण २९ दिवसांचा, मंदिरे कुलूपबंदच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:15 IST2021-07-20T04:15:40+5:302021-07-20T04:15:40+5:30
अहमदनगर : कोरोनामुळे गेल्यावर्षीपासून जिल्ह्यातील मंदिरे बंदच आहेत. त्यामुळे भाविकांसाठी पर्वणीचा महिना असणाऱ्या श्रावण महिन्यातही भाविकांना मंदिरांमध्ये प्रवेश मिळणार ...

यंदा श्रावण २९ दिवसांचा, मंदिरे कुलूपबंदच
अहमदनगर : कोरोनामुळे गेल्यावर्षीपासून जिल्ह्यातील मंदिरे बंदच आहेत. त्यामुळे भाविकांसाठी पर्वणीचा महिना असणाऱ्या श्रावण महिन्यातही भाविकांना मंदिरांमध्ये प्रवेश मिळणार नाही. मंदिरे बंद असल्यामुळे व्यावसायिकांचेही मोठे नुकसान होत आहे. त्याचवेळी मंदिरातील दानपेट्याही वर्षभरापासून रिकाम्याच आहेत.
यावर्षी श्रावण महिना २९ दिवसांचा आहे. पाच श्रावणी सोमवार येतात. जिल्ह्यात १५ पेक्षा अधिक शिवमंदिरे आहेत. या मंदिरांमध्ये श्रावण महिन्यात भाविकांची मोठी गर्दी असते. प्रत्येक सोमवारी शिवमंदिरे भाविकांच्या गर्दीने फुलून जातात. शिवमंदिरांच्या परिसराला यात्रेचे स्वरूप येते. काही ठिकाणी तिसऱ्या सोमवारी यात्रोत्सवही भरविला जातो. त्यामुळे मंदिराच्या परिसरात प्रसाद, हारफुले, खाद्यपदार्थ व इतर साहित्य विक्रीची दुकाने सजतात. मात्र, मागील दोन वर्षापासून कोरोनामुळे जिल्ह्यातील सर्वच शिवमंदिरे बंद आहेत. त्यामुळे मंदिर परिसरातील व्यावसायिकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
......................
९ ऑगस्टपासून श्रावण
९ ऑगस्टपासून श्रावण महिना सुरू होत आहे. महिनाभर सर्व शिवमंदिरांमध्ये पूर्जाअर्चा होत असते. या काळात मंदिर परिसरात लाखोंची आर्थिक उलाढाल होत असते. पाथर्डी तालुक्यातील वृद्धेश्वर देवस्थानच्या दानपेटीत श्रावण महिन्यात सुमारे २ लाखांपर्यंत भाविक देणगी देतात. मात्र, मागील वर्षीपासून देवस्थानची दानपेटी रिकामीच आहे.
...........
मंदिरे उघडण्याबाबत काहीही सूचना प्राप्त नाही
मागील वर्षी श्रावण महिन्यात १ पुजारी, २ पुरोहित, १ विश्वस्त अशा केवळ चार व्यक्तींनाच मंदिरात प्रवेश देऊन पूजा करण्यात आली होती. यंदा प्रशासनाकडून मंदिरे उघडण्याची परवानगी न मिळाल्यास पुजारी, पुरोहित व विश्वस्त अशा मोजक्याच व्यक्तींच्या उपस्थितीत पूजा करण्यात येणार आहे.
-मुरलीधर पालवे, विश्वस्त
.............
दोन वर्षांपासून मंदिरे बंद आहेत. भाविक येत नाहीत. त्यामुळे मंदिर परिसरातील व्यावसायिकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. काही जणांना आपल्याकडील कामगारही कमी करावे लागले आहेत. श्रावण महिन्यात वृद्धेश्वरला मोठी गर्दी होते. या काळात किमान लाखभर रुपयांची उलाढाल होते. मात्र, ते सर्व ठप्प झाले आहे.
-राजेंद्र पुरी, व्यावसायिक, वृद्धेश्वर देवस्थान मंदिर परिसर
...............
श्रावणी सोमवार
पहिला - ९ ऑगस्ट
दुसरा - १६ ऑगस्ट
तिसरा -२३ ऑगस्ट
चौथा -३० ऑगस्ट
पाचवा - ६ सप्टेंबर
............................
जिल्ह्यातील महत्त्वाची शिवमंदिरे
१) वृद्धेश्वर मंदिर, घाटशिरस (ता. पाथर्डी)
२) सिद्धेश्वर मंदिर, सिद्धेश्वरवाडी (ता. पारनेर)
३) बलेश्वर मंदिर, पेडगाव (ता. श्रीगोंदा)
४) काशीविश्वनाथ मंदिर, ढोरजे (ता. श्रीगाेंदा)
५) सिद्धेश्वर मंदिर, टोका (ता. नेवासा)
६) अमृतेश्वर मंदिर, रतनवाडी (ता. अकोले)
७) रामेश्वर मंदिर, डोंगरगण (ता. नगर)
८) कोतुळेश्वर, कोतूळ, (ता. अकोले)
९) लिंगेश्वर, लिंगदेव (ता. अकोले)
१०) सिद्धेश्वर मंदिर, अकोले
११) काळेश्वर मंदिर, गुंफा (ता. शेवगाव)
१२) मध्यमेश्वर मंदिर, नेवासा
१३) मोरेश्वर मंदिर, मोर्विस (ता. कोपरगाव)
१४) सिद्धेश्वर मंदिर, भांबोरा (ता. कर्जत)
१५) हंगेश्वर मंदिर, हंगा (ता. पारनेर)
१६) बेल्हेश्वर, अहमदनगर
१७) शिवचिदंबर मंदिर, देसवंडी, राहुरी
१८) कर्जतेश्वर, करजगाव (ता. राहुरी)
१९) सिद्धेश्वर मंदिर, पळवे (ता. पारनेर)
२०) निर्झणेश्वर मंदिर, संगमनेर
२१) त्रिलिंगी महादेव मंदिर, सोनई (ता. नेवासा)
..............
फोटो वृद्धेश्वर देवस्थान