साईनगरीत यंदा अमृतमहोत्सवी गणेशोत्सव
By Admin | Updated: September 2, 2014 23:58 IST2014-09-02T23:39:48+5:302014-09-02T23:58:34+5:30
प्रमोद आहेर, शिर्डी लोकमान्य टिळकांनी सुरू केलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाला १२१ वर्षे पूर्ण होत असताना साईनगरीतही या उत्सवाने अमृत महोत्सवी टप्पा गाठला आहे़

साईनगरीत यंदा अमृतमहोत्सवी गणेशोत्सव
प्रमोद आहेर, शिर्डी
लोकमान्य टिळकांनी सुरू केलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाला १२१ वर्षे पूर्ण होत असताना साईनगरीतही या उत्सवाने अमृत महोत्सवी टप्पा गाठला आहे़ शिर्डीतील शाळा मास्तरांनी १९३९ साली शाळेतील मुलांकडून साईनगरीतील पहिल्या सार्वजनिक गणेशोत्सवाचा श्रीगणेशा करवून घेतला होता़
१६ ते २६ सप्टेंबर १९३९ दरम्यान शिर्डीतील पहिला सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यात आला. शिर्डीतील सर्व शाळा मास्तरांनी मिळून शाळेतील मुलांकडून हा गणेशोत्सव साजरा करून घेतला. यात साईबाल मेळावा साजरा करण्यात आला. गणेश चतुर्थीपासून दहा दिवस व्याख्यान, पोवाडे, भजन, गायन, नाट्य प्रयोग असे अनेक कार्यक्रम करण्यात आले.गावातील लोकांना व शाळेतील मुलांना शिर्डी ही संतभूमी आहे असे सांगून त्याचे महत्व पटवून देण्यात आले.
मंगळवार,२६ सप्टेंबर रोजी श्री गणेशाची मिरवणूक काढून सर्व मंडळींना खोबरे,खडीसाखर,डाळ वाटून गणपती विसर्जन करण्यात आले.
पहिल्या गणेशोत्सवाचे साक्षीदार असलेल्या ९० वर्षांच्या नानासाहेब उर्फ शंकरराव बाळाजी जगताप यांनी ‘लोकमत’ला सांगितले की,‘आमची शाळा त्यावेळी मारूती मंदिराशेजारी भरत असे.गणपती मात्र जुन्या चावडी (खुले नाट्यगृह) शेजारी रावसाहेब तात्याजी गोंदकरांच्या सध्या असलेल्या लॉजच्या जागेत बसवण्यात आला होता. यावेळी नरहर अनंत पिटके शाळेचे हेडमास्तर होते.तर आमले,परदेशी आदी शिक्षक होते. या गणेशोत्सवात संभाजीचा वध हे नाटक बसवण्यात आले होते. यात आमले मास्तरांनी संभाजीची भूमिका केली होती.
त्यावेळी आमच्या बरोबर रामचंद्र सजन कोते, रहेमान भिकन दारूवाले, सखुबाई चिमाजी सजन, शंकर कचरू शेजवळ, रामराव ठमाजी शेळके, रामचंद्र कचरदास लोढा, रावसाहेब तात्याजी गोंदकर, तुळशिराम निवृत्ती गोंदकर तसेच रूई येथील तात्या शंकर वाणी, ताराचंद शंकर कडू, रामराव विठ्ठलराव वाबळे, बाजीराव वाबळे आदी विद्यार्थी होते़
यंदा शिर्डीत तीस सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी गणेशाची स्थापना केली आहे़ सन्मित्र, हिंदुराष्ट्र, राजा शिवछत्रपती, मोरया, साईबाबा कर्मचारी, साईश्रद्धा प्रतिष्ठान, साईमुद्रा प्रतिष्ठान, समर्थ प्रतिष्ठान, बाळासाहेब ठाकरे मित्रमंडळ, हिंदवी स्वराज्य, सावता महाराज, साई प्रतिष्ठान, क्रांती, राज ठाकरे मित्रमंडळ, राधाकृष्ण विखे रिक्षा युनियन, एकता, लहुजी सेना, साई विश्वा युवा मंच, जय महाराष्ट्र, साईनगर, श्रीरामनगर, द्वारकामाई प्रतिष्ठान आदींचा समावेश आहे़अनेक मंडळांनी धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केलेले आहे़
रामदास स्वामींनी १६५९ साली रचलेल्या सुखकर्ता दु:खहर्ता़़़या गणपती आरतीच्या निर्मितीला ३५५ तर रामदास स्वामींनीच ५ आॅगस्ट १६७४ रोजी सुंदरमठात स्थापन केलेल्या पहिल्या गणेशोत्सवालाही यंदा ३४० वर्षे होत आहेत़