पोलिसांची १५ जूनला लेखी परीक्षा
By Admin | Updated: June 12, 2014 00:07 IST2014-06-11T23:31:23+5:302014-06-12T00:07:04+5:30
गुरुवारी महिलांची चाचणी : शुक्रवारी होणार सांगता
पोलिसांची १५ जूनला लेखी परीक्षा
अहमदनगर : जिल्ह्यातील पोलीस दलातील भरती प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. भरती प्रक्रियेच्या पाचव्या दिवशी पुरुष पोलिसांची भरती प्रक्रिया संपली. गुरुवारी महिलांची मैदानी चाचणी घेण्यात येणार आहे. चाचणी झालेल्या उमेदवारांची शनिवारी यादी जाहीर करण्यात येणार असून त्यांची १५ जूनला लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे.
जिल्ह्यातील १७९ जागांसाठी नऊ हजार उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. बुधवारी भरती प्रक्रियेचे पाच दिवस संपले. राज्यात एकाच वेळी भरती प्रक्रिया सुरू असल्याने यंदा निम्म्या उमेदवारांनी भरती प्रक्रियेला दांडी मारली. प्रत्येक दिवशी दीड हजार उमेदवारांना बोलविण्यात आले होते. त्यापैकी पहिल्या दिवशी निम्म्या उमेद्वारांनी हजेरी लावली होती. त्यानंतरच्या प्रत्येक दिवशी एक हजार ते अकराशे उमेद्वारांनी चाचणी दिली. बुधवारी फक्त एक हजार उमेद्वारांनाच चाचणीसाठी बोलविण्यात आले होते. त्यापैकी ५५० उमेदवारांनी चाचणीसाठी सहभाग घेतला.
शुक्रवारी महिलांची धावण्याची स्पर्धा झाल्यानंतर सहा दिवसांची पोलीस भरती प्रक्रियेची सांगता होणार आहे. शारीरिक चाचणी, तसेच अन्य चाचण्यांनुसार शनिवारी लेखी परीक्षेसाठी पात्र झालेल्या उमेदवारांची यादी जाहीर होणार आहे. रविवारी (दि.१५) उमेदवारांची लेखी परीक्षा घेण्यात येईल, असे पोलीस अधीक्षक रावसाहेब शिंदे यांनी सांगितले.
(प्रतिनिधी)