माघारीनंतर प्रचाराचे महायुद्ध
By Admin | Updated: October 2, 2014 00:34 IST2014-10-02T00:32:46+5:302014-10-02T00:34:37+5:30
अहमदनगर: माघारीनंतर विधानसभा निवडणुकीचे बाराही मतदारसंघातील लढतीचे चित्र बुधवारी स्पष्ट झाले़ त्यामुळे आता प्रचाराचे महायुद्ध चांगलेच रंगणार असून, प्रचाराच्या तोफा धडाडणार आहेत़

माघारीनंतर प्रचाराचे महायुद्ध
अहमदनगर: माघारीनंतर विधानसभा निवडणुकीचे बाराही मतदारसंघातील लढतीचे चित्र बुधवारी स्पष्ट झाले़ त्यामुळे आता प्रचाराचे महायुद्ध चांगलेच रंगणार असून, प्रचाराच्या तोफा धडाडणार आहेत़ बारा मतदारसंघातील १३७ उमेदवारांनी माघार घेतली असून, १३८ उमेदवार निवडणूक मैदानात असल्याची माहिती जिल्हाधिकारी अनिल कवडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
विधानसभा निवडणुकीतून माघार घेण्याचा बुधवारी अखेरचा दिवस होता़ माघारीनंतर बारा मतदारसंघातील लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे़ बदलत्या राजकीय परिस्थितीत चारही प्रमुख राजकीय पक्ष स्वबळावर निवडणूक लढवित आहेत़ काँग्रेस, राष्ट्रवादी, सेना आणि भाजपाचे उमेदवार निवडणुकीच्या मैदानात आहेत़ मनसेने तीन मतदारसंघात उमेदवार दिल्याने त्याठिकाणी पंचरंगी लढत होत आहे़ कोण कोठून लढणार, कोण कुणाच्या विरोधात मैदानात उतरणार, याबाबत केवळ ठोकताळे बांधले जात होते़ राजकीय नेत्यांतर्फे विरोधी पक्षांना संभ्रमात ठेवणारे स्टेटमेंट दिले जात होते़ त्यामुळे जोपर्यंत माघारीचा दिवस येत नाही, तोपर्यंत निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार नव्हते़ या काळात केवळ सर्वच राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी प्रचाराचे नियोजन केले़
अपेक्षेप्रमाणे निवडणुकीतील लढतीचे चित्र स्पष्ट झाले़ त्यामुळे कागदावरील नियोजन आता प्रत्यक्षात उतरेल़ प्रचाराच्या महायुद्धाला खऱ्या अर्थाने आता सुरुवात झाली आहे़ गावोगावी फिरणे, रिक्षा फिरविणे, रॅली, नेते, पदाधिकाऱ्यांच्या बैठका, गावातील महत्वाच्या व्यक्तींना बोलावून कानमंत्र देणे, साहित्य वाटप करणे सुरू झाले आहे़ निवडणुकीचा आखाडा चांगलाच रंगात आला आहे़ विरोधी पक्षांकडून राष्ट्रीय नेत्यांच्या सभा घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत़ विशेषत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा घेण्यासाठी जिल्ह्यातील भाजपातर्फे प्रयत्न सुरू आहेत़ तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांकडून पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या सभेसाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली जात आहे़ गुरुवारी पवार यांच्या चार सभा होत आहेत़ या सभेत पवार काय बोलतात, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे़ भाजपाचे श्रीगोंदा मतदारसंघाचे उमेदवार बबनराव पाचपुते यांच्यासाठी नितीन गडकरी यांनी नुकतीच सभा घेतली़
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांचीही सभा झाली असून, शेवगाव- पाथर्डी मतदारसंघाच्या उमेदवार मोनिका राजळे यांच्यासाठी पंकजा मुंडे यांची सभा होणार असल्याचे बोलले जाते़ (प्रतिनिधी)