पात्रता नसलेल्यांना काम!
By Admin | Updated: June 21, 2014 00:47 IST2014-06-20T23:35:33+5:302014-06-21T00:47:14+5:30
संदीप रोडे, अहमदनगर रिलायन्सने केबल टाकण्यासाठी केलेल्या खोदकामानंतर त्यावर डांबरीकरणाच्या कामांची ई-निविदा न काढता एकाचवेळी कामाचे तुकडे पाडून पात्र नसलेल्या संस्थांना काम वाटप केले.

पात्रता नसलेल्यांना काम!
संदीप रोडे, अहमदनगर
रिलायन्सने केबल टाकण्यासाठी केलेल्या खोदकामानंतर त्यावर डांबरीकरणाच्या कामांची ई-निविदा न काढता एकाचवेळी कामाचे तुकडे पाडून पात्र नसलेल्या संस्थांना काम वाटप केले. हे काम वाटप करताना स्थायी समितीलाही अंधारात ठेवल्याचा प्रकार समोर आल्याने त्याची तक्रार नगरविकास विभागाकडे झाले आहे.
महापालिका हद्दीत रिलायन्स जियो इन्फोकॉम कंपनीने शहरातील विविध मार्गावर आॅप्टीकल फायबर केबल टाकण्यासाठी रस्ते खोदाईचा अर्ज केला. ४४ रस्ते खोदाईच्या परवानगी अर्जावर प्रशासनाने ३९ रस्ते खोदाईला परवानगी दिली. रस्ते खोदाईपोटी कंपनीने ५ कोटी ११ लाख रुपये इतकी रक्कम महापालिकेडे जमा केली. या रकमेतून खोदाई होणाऱ्या रस्त्यांचे पॅचिंग, डांबरीकरण, मजबुतीकरणासारखी कामे करण्यास आयुक्तांनी वित्तीय अधिकार वापरून खर्चास मंजुरी दिलेली आहे. कामांचे तुकडे पाडून एकाच दिवशी या कामांना मंजुरी देण्यात आली. त्याची माहिती पंधरा दिवसात स्थायी समितीला देणे बंधनकारक असतानाही प्रशासनाने ही माहिती समितीला दिलीच नाही. कामांचे वाटप करताना ई-निविदा पध्दत न वापरता मजूर संस्थेमार्फत काम करण्याबाबत सुचविले आहे. १० लाखापेक्षा अधिक मुल्यांच्या निविदासाठी निविदा कार्यप्रणालीचा वापर करावा असे स्पष्ट निर्देश शासनाने फेबु्रवारी २०१३ मध्ये सर्व विभागांना दिलेले आहेत.
खोदाई होणारे रस्ते
रेसिडेन्सीअल कॉलेज कॉनर ते ए.सी.डेपो मस्जिद, हॉटेल यशराज कॉर्नर ते कल्याण नगर हायवे, यशोदा हॉटेल कॉर्नर ते रेल्वेस्टेशन, स्टेशनरोड कॉर्नर ते एल अॅण्ड टी सर्कल, भिस्तबाग चौक ते पानसंबळ हॉटेल, कमला हॉस्पिटल ते अप्पू हत्ती गार्डन, मराठा मंदिर कॉर्नर ते पानसंबळ हॉस्पिटल, नगरकर क्लासेस ते फंटा सी कलर वर्ल्ड, साईकृपा कम्युनिकेशन ते वसंत टॉकीज रोड कॉर्नर, आय.सी.ए.आय भवन परिसर, राज हॉस्पिटल ते साई कॉर्नर, नेप्ती नाका ते स्वस्तीक बस स्टॅण्ड, रेल्वे ओव्हर ब्रीज ते कायनेटीक जवळ, सातपुते फार्म ते भूषणनगर कॉर्नर, सारसनगर कॉर्नर ते इवळेनगर कॉर्नर, पाईपलाईन रोड ते औरंगाबाद हायवे, वाय.एम.सी.ए.ग्राऊंड कॉर्नर ते इवळेनगर, हॉटेल हेरा ते हॉटेल इंद्रायणी, मॅनेजमेंट ते आकांक्षा इंडस्ट्रिज रोड, नेप्ती नाका ते न्यू आर्टस कॉमर्स अॅण्ड सायन्स कॉलेज, सातभाई मळा कॉर्नर ते बडोदा बॅँक कॉलनी, दादा चौधरी विद्यालय ते नेता सुभाष चौक, प्रोफेसर कॉलनी चौक ते कुष्ठधाम रोड कॉर्नर, मुकुंदनगर ते सचिन भवन कॉर्नर, मुकुंदनगर ते आर्मी ट्रॅँगल पार्क, कुष्ठधाम रोड कॉर्नर ते आर्यवत आपर्टमेंट, सावेडी बस थांबा ते नाना नानी पार्क, हॉटेल अंबर ते सावेडी पोस्ट आॅफिस, विजयनगर ते रासने आर्कडे, भोसले आखाडा रोड ते आय.सी.ए.आय भवन, हुंदाई शो रूम ते इवळेनगर, नगर कॉलेज कॉर्नर ते इवळेनगर.
काम वाटप करताना मजूर सहकारी संस्थांना ३३ टक्के, सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांना ३३ टक्के, संस्थाव नोंदणीकृत ठेकेदारांना ३४ टक्के कामे देण्याचे निर्देश असतानाही महापालिकेने शंभर टक्के काम मजूर सहकारी संस्थांना दिले आहे. ज्या संस्थांनी हे काम घेतले त्या संस्थाही आता काम करण्यास तयार नसल्याचे महापालिका बांधकाम विभागाचे म्हणणे आहे.
रिलायन्सने खोदाई केलेल्या कामांचे वाटप करताना अनियमितता व गैरप्रकार झालेले आहे. आयुक्तांनी त्यांना दिलेल्या वित्तीय अधिकाराचा वापर करून कामांचे तुकडे करून काम वाटप केले. मजूर संस्थांची पात्रता नसतानाही त्यांना काम दिले आहे. नगरविकास विभागाकडे याबाबतची तक्रार केली आहे.
-शाकीर शेख, तक्रारदार
सुशिक्षित बेरोजगार अभियंते महापालिकेकडे काम घेण्यास येतच नाहीत. पैसे लवकर मिळत नसल्याने ते येत नाहीत. त्यामुळे महापालिकेचे कोणतेही काम मजूर संस्थेमार्फतच करावे लागते. शहरात फक्त तारकपूर परिसरात पॅचिंगचे एकमेव काम झाले आहे. अन्य कामे झालेली नाहीत. ३६ रस्ते खोदाई झाली मात्र त्याचे पॅचिंग अजून झालेले नाही.
-नंदकुमार मगर,
शहर अभियंता