लातूर-मुंबई राष्ट्रीय महामार्गाचे काम भाजप कार्यकर्त्यांनीच पाडले बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:25 IST2021-08-20T04:25:44+5:302021-08-20T04:25:44+5:30
अहमदनगर : श्रीगोंदा शहरातून जाणाऱ्या लातूर-मुंबई राष्ट्रीय महामार्गाच्या कामांतर्गत भुयारी गटार व फूटपाथ आदी कामे होत नसल्याने श्रीगोंदा शहरातील ...

लातूर-मुंबई राष्ट्रीय महामार्गाचे काम भाजप कार्यकर्त्यांनीच पाडले बंद
अहमदनगर : श्रीगोंदा शहरातून जाणाऱ्या लातूर-मुंबई राष्ट्रीय महामार्गाच्या कामांतर्गत भुयारी गटार व फूटपाथ आदी कामे होत नसल्याने श्रीगोंदा शहरातील भाजपच्या कार्यकर्त्यांनीच बुधवारी काम बंद पाडले. यासंदर्भात केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांना त्यांनी पत्र पाठविले आहे.
लातूर-मुंबई राष्ट्रीय महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे न्हावरा ते आढळगाव अशा ४८.५ किलोमीटर अंतरासाठी २१६.५१ कोटी रुपयांचा निधी मंजूर आहे. महामार्गाचे काम अंतिम टप्प्यात आहे. मात्र, श्रीगोंदा शहरातील भुयारी गटार, फूटपाथ यावरून तिढा निर्माण झाला आहे. ही कामे न करताच शहरात महामार्गाचे काम सुरू झाल्याने भाजप कार्यकर्त्यांनी ते बुधवारी बंद पाडले.
शहरातील महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालय ते चंद्रमा पेट्रोल पंप दरम्यान काम बंद ठेवावे, भुयारी गटार व फूटपाथला मंजुरी आल्यानंतर काम सुरू करावे, असे भाजप कार्यकर्त्यांनी म्हटले आहे. खासदार डॉ. सुजय विखे यांनी मागील महिन्यात या राष्ट्रीय महामार्गाची पाहणी करून पंचायत समिती कार्यालयात आढावा बैठक घेतली होती. त्यावेळी शहरातून जाणाऱ्या रस्त्याला भुयारी गटार, फूटपाथची व्यवस्था केली जाईल, असे आश्वासन दिले होते. संबंधित कामाचे अंदाजपत्रक करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले होते. मात्र, ठोस कार्यवाही झाली नाही. त्यामुळे भाजपच्याच कार्यकर्त्यांनी काम बंद पाडले.
----
भूसंपादनाअभावी रखडलेले महामार्ग
अहमदनगर-करमाळा, पंढरपूर-पैठण (पालखी मार्ग) या दोन राष्ट्रीय महामार्गांची कामे भूसंपादनाअभावी रखडलेली आहेत.