अत्याचार पीडित महिलांना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:16 IST2021-06-26T04:16:15+5:302021-06-26T04:16:15+5:30
पावणेदोन कोटींचे अर्थसाह्य लोकमत न्यूज नेटवर्क अहमदनगर : बलात्कार, ॲसिड हल्ला व इतर अत्याचाराच्या बळी ठरलेल्या ८४ पीडित महिलांना ...

अत्याचार पीडित महिलांना
पावणेदोन कोटींचे अर्थसाह्य
लोकमत न्यूज नेटवर्क
अहमदनगर : बलात्कार, ॲसिड हल्ला व इतर अत्याचाराच्या बळी ठरलेल्या ८४ पीडित महिलांना मनोधैर्य योजनेंतर्गत जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत १ कोटी ७६ लाख २५ हजार रुपयांचे अर्थसाहाय्य मंजूर करण्यात आले असल्याचे प्राधिकरणाच्या सचिव रेवती देशपांडे यांनी सांगितले.
पूर्वी महिला बालविकास विभागाकडे असलेली मनोधैर्य योजना ही सुधारित योजना म्हणून कार्यान्वित करण्यात आली आहे. या अंतर्गत पीडित महिलांना अर्थसाहाय्य देण्याचे अधिकार विधी सेवा प्राधिकरण यांच्याकडे सोपविण्यात आले आहेत. या योजनेंतर्गत महिला व बालकांवरील लैंगिक अत्याचार, ॲसिड हल्ला तसेच अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम १९५६ नुसार पोलीस धाडीत मिळून आलेल्या पीडित महिलांना अर्थसाहाय्य दिले जाते. जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीकांत आणेकर, प्राधिकरणाच्या सचिव रेवती देशपांडे यांच्या कार्यकाळात २०२० ते आजपर्यंत या योजनेंतर्गत आलेली १०९ प्रकरणे निकाली काढत ८४ पीडितांना अर्थसाहाय्य मंजूर केले आहे. कोरोनाकाळात मिळालेल्या या अर्थसाहाय्यामुळे पीडितांना मोठा दिलासा मिळाला आहे. पिडितेवर झालेल्या अत्याचाराचे स्वरूप पाहून प्रत्येकी १० लाख रुपयांची मदत दिली जाते. पीडित महिलेने जबाब फिरविल्यास तसेच पोलीस, न्यायालय व जिल्हा मंडळास सहकार्य न केल्यास नुकसानभरपाई नाकारता येते. या योजनेचा पीडितांनी लाभ घ्यावा, असे आवाहन न्या. श्रीकांत आणेकर व सचिव रेवती देशपांडे यांनी केले आहे.
-----------------
पीडिता स्वत: अर्ज करू शकते
अत्याचाराची बळी ठरलेली महिला मनोधैर्य योजनेंतर्गत मदतीसाठी संबंधित पोलीस स्टेशन अथवा ती स्वत: अर्ज करू शकते. या संपूर्ण प्रक्रियेत सदर पीडितेचे नाव गोपनीय ठेवले जाते. तसेच पीडितेला आर्थिक मदतीबरोबर मानसिक आधार, वैद्यकीय व कायदेशीर मदतही दिली जात असल्याचे प्राधिकरणाच्या सचिव रेवती देशपांडे यांनी सांगितले.
.....................
फोटो - २५ पीडित