महिला व बालकल्याण अधिकारी माने चौकशीच्या फेऱ्यात
By | Updated: December 6, 2020 04:21 IST2020-12-06T04:21:38+5:302020-12-06T04:21:38+5:30
जरे यांची ३० नोव्हेंबर रोजी रात्री हत्या झाली तेव्हा त्यांच्यासोबत कारमध्ये माने होत्या. हे हत्याकांड त्यांनी प्रत्यक्ष पाहिले आहे. ...

महिला व बालकल्याण अधिकारी माने चौकशीच्या फेऱ्यात
जरे यांची ३० नोव्हेंबर रोजी रात्री हत्या झाली तेव्हा त्यांच्यासोबत कारमध्ये माने होत्या. हे हत्याकांड त्यांनी प्रत्यक्ष पाहिले आहे. विशेष म्हणजे जरे यांच्या हत्येनंतर माने यांनी पत्रकार बाळ ज. बोठे याला फोनवरून घटनेची माहिती दिली. त्यानंतर माने यांनी स्वत: कार चालवून जरे यांना दवाखान्यात पोहोचविण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे माने यांचा जबाब पोलिसांसाठी महत्त्वाचा आहे. मात्र, माने या अद्याप जबाबासाठी उपलब्ध झाल्या नाहीत.
माने यांनी घटनेनंतर बोठे याला फोन करून माहिती दिली. तोच बोठे हत्याकांडाचा सूत्रधार निघाल्याने माने यांनी बोठे याच्याशी केलेला संपर्कही संशयाच्या फेऱ्यात आला आहे. दरम्यान, जरे यांच्या शवविच्छेदनाचा प्राथमिक अहवाल पोलिसांना प्राप्त झाला असून, यामध्ये गळा चिरूनच हत्या झाल्याचे समोर आले आहे. तसेच जरे यांच्या खांद्याजवळही जखम झाल्याचे अहवालात नमूद आहे. जरे यांची हत्या करण्यासाठी वापरलेला चाकू मारेकऱ्यांकडून जप्त करण्यात आला आहे.
......
सागर भिंगारदिवेच्या घराची झडती, सीसीटीव्ही फुटेज जप्त
जरे यांच्या हत्याकांडात बाळ बोठे याचा साथीदार असलेल्या सागर भिंगारदिवे याच्या केडगाव येथील घराची शनिवारी पोलिसांनी झडती घेतली. यावेळी त्याच्या घरात लावलेल्या सीसीटीव्हीचे फुटेज जप्त केले आहे. तसेच इतर काही वस्तूही त्याच्या घरात मिळून आल्या असल्याचे समजते.
..................
जरे यांची बोठेविरोधात तक्रार
मयत रेखा जरे यांनी २२ डिसेंबर २०१८ रोजी नगर शहरातील कोतवाली पोलिसांना निवेदन देऊन बाळ बोठे याच्या विरोधात तक्रार केली होती. बोठे याने त्याच्या मोबाईलवरून जरे यांच्या मोबाईलवर संदेश पाठविला होता. हा संदेश आपली बदनामी करण्याच्या उद्देशानेच पाठविला असल्याचे जरे यांनी निवेदनात म्हटले होते. जरे यांच्या या निवेदनासंदर्भात पोलिसांनी चौकशी सुरू केली असल्याचे समजते.
....................
बोठेचा शोध लागेना
हत्याकांड घडवून आणल्यानंतर बोठे शहरातून फरार झाला. पोलिसांची पाच पथके त्याचा विविध ठिकाणी शोध घेत आहेत. मात्र, तो अद्याप सापडलेला नाही. पोलीस त्याच्या संपर्कात असलेल्या मित्रांवरही लक्ष ठेऊन आहेत.
..............
फोटो ०५ सागर भिंगारदिवे
ओळी- रेखा जरे हत्याकांडातील आरोपी सागर भिंगारदिवे याच्या केडगाव येथील घराची शनिवारी पोलिसांनी झडती घेतली.