महिला व बाल कल्याण समिती काँग्रेसला?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:25 IST2021-08-21T04:25:38+5:302021-08-21T04:25:38+5:30
अहमदनगर : महापालिकेच्या महिला व बाल कल्याण समितीचे विसर्जन करण्यासाठी सोमवारी विशेष सभा होत असून, ही समिती आता काँग्रेसला ...

महिला व बाल कल्याण समिती काँग्रेसला?
अहमदनगर : महापालिकेच्या महिला व बाल कल्याण समितीचे विसर्जन करण्यासाठी सोमवारी विशेष सभा होत असून, ही समिती आता काँग्रेसला मिळण्याची शक्यता आहे. सभापतिपदासाठी रूपाली वारे व संध्या पवार यांच्या नावाची चर्चा आहेत.
महापालिकेची सध्याच्या महिला व बाल कल्याण समितीचे विर्सजन करण्याची मागणी स्थायी समितीचे सभापती अविनाश घुले, सदस्य सचिन शिंदे, श्याम नळकांडे आणि समद खान यांनी केली आहे. या मागणीची दखल घेऊन नगरसचिव कार्यालयाने महिला व बाल कल्याण समिती विसर्जन करण्याबाबतचा प्रस्ताव महापौर कार्यालयास सादर केला होता. महापौर रोहिणी शेंडगे यांनी महिला व बाल कल्याण समिती विसर्जन करण्यासाठी सोमवारी सभा बोलविली आहे. या सभेत ही समिती विसर्जित केली जाणार आहे. ही सभा विसर्जित केल्यानंतर नव्याने समिती स्थापन केली जाणार आहे. नव्याने समिती स्थापन करताना सभापती व उपसभापती ही पदे काँग्रेसकडे जाण्याची शक्यता आहे.
महाविकास आघाडीत काँग्रेस सहभागी आहे. महापौर निवडणुकीच्या वेळी काँग्रेसने उमेदवारी अर्ज घेतले होते; परंतु अखेरच्या क्षणी काँग्रेसने माघार घेतली. महापौरपद सेनेकडे, तर उपमहापौरपद राष्ट्रवादीकडे आहे. काँग्रेसला सत्तेत वाटा मिळालेला नाही. महिला व बाल कल्याण समिती देऊन काँग्रेसला सत्तेत सहभागी करून घेतले जाईल, असे बोलले जाते.
.......
सेनेकडून काँग्रेसकडे
महिला व बाल कल्याण समिती सध्या काँग्रेसकडे आहे. सेनेच्या नगरसेविका लता बलभीम शेळके या सभापती, तर उपसभापती सुवर्णा संजय गेणाप्पा या आहेत. या समितीचे विसर्जन झाल्यास शेळके व गेणप्पा यांची पदे संपुष्टात येतील. महिला व बाल कल्याण समिती सेनेकडून काँग्रेसकडे जाण्याची दाट शक्यता आहे.