महिलेचा गळा आवळून खून : श्रीगोंदा तालुक्यातील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2018 14:44 IST2018-08-01T14:43:40+5:302018-08-01T14:44:09+5:30
एका ३५ वर्षीय महिलेचा गळा आवळून खून करण्यात आला. पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने तिच्या कंबरेला मोठे दगड बांधून मृतदेह शहरातील आढळगाव रस्त्यावरील औटेवाडी तलावात फेकून देण्यात आल्याचे मंगळवारी निदर्शनास आले.

महिलेचा गळा आवळून खून : श्रीगोंदा तालुक्यातील घटना
श्रीगोंदा : एका ३५ वर्षीय महिलेचा गळा आवळून खून करण्यात आला. पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने तिच्या कंबरेला मोठे दगड बांधून मृतदेह शहरातील आढळगाव रस्त्यावरील औटेवाडी तलावात फेकून देण्यात आल्याचे मंगळवारी निदर्शनास आले.
मंगळवार ३१ जुलैस दुपारी ४ वाजेच्या सुमारास औटेवाडी तलावातील पाण्यावर तरंगताना मृतदेह आढळला. सुरूवातीस ही महिला पाय घसरून पडली असावी, असा अंदाज व्यक्त करण्यात आला. पण मृतदेह पाण्याबाहेर काढण्याचा प्रयत्न केला असता मृतदेह जागचा हलेना. तेव्हा मृतदेहाच्या अंगाभोवती दोरी गुंडाळण्यात आली होती. त्या दोरीला दोन्ही बाजूने दगड बांधल्याने हा मृतदेह जागचा हलत नसल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी मृतदेह पाण्याबाहेर काढला असता या महिलेच्या अंगावर एकही कापड नव्हते. तिच्या अंगावर, डोक्यावर मारहाणीच्या खुणा असल्याचे प्राथमिक तपासात दिसून आले. इतरत्र खून करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने हा मृतदेह या तलावातील खड्ड्यात टाकून देण्यात आला असावा, पोलिसांचा कयास आहे.
आजुबाजूच्या पोलीस ठाण्यांकडून हरवल्याबाबतची माहिती मागविली आहे. या महिलेची ओळख पटवून खुनाचा तपास करण्यासाठी दोन पथके तयार करण्यात आली आहेत.
बाजीराव पोवार, पोलीस निरीक्षक,श्रीगोंदा.
दोन दिवसांपूर्वी पाण्यात प्रेत
औटेवाडी तलाव पूर्णपणे कोरडा पडला आहे. बाजूच्या शेतकऱ्यांनी पाण्यासाठी रविवारी तलावात खड्डा खोदला आहे. सोमवारी रात्री हा मृतदेह याठिकानी आणून टाकला असावा. बाजूच्या शेतकºयाने खडड्यात डोकावून पाहिले असता त्याला मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसला. या गुन्ह्याच्या तपासासाठी श्रीगोंदा पोलिसांनी ठसेतज्ज्ञ व न्यायवैद्यक पथकाची मदत घेतली आहे.